मुंबई, दि. 6 : महापारेषणचे विविध प्रकल्प तात्काळ मार्गी लावण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
फोर्ट येथील एम एस ई बी होल्डिंग कंपनी कार्यालय येथे आयोजित महापारेषण कंपनीच्या आढावा बैठकीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या.
यावेळी महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, संचालक सतीश चव्हाण, अविनाश निंबाळकर, सुगत गमरे, तृप्ती मुधोळकर यांच्यासह महापारेषण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील ऊर्जा क्षेत्र स्वयंपूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जेवर विशेष भर देण्यात यावा. महापारेषणच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी, तक्रारींचे निराकरण वेळेत करण्यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्याचे तसेच प्रकल्पांची कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देशही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) च्या कामकाजातील विविध विषयांचा आढावा घेतला. महापारेषणच्या विविध प्रकल्पांची प्रगती, सौर ऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी, तसेच अर्थविषयक बाबींवरही चर्चा करण्यात आली.
००००
राजू धोत्रे/विसंअ/