मुंबई, दि. ०७: केंद्र सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे ‘ स्क्रॅपिंग ‘अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.
वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकुण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.वाहनांचे प्रदुषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, २०२१ अंमलात आणला आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.
०००
निलेश तायडे/विसंअ