आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या ठाणे येथे मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे लोकार्पण

मुंबई, दि. 8 : राज्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग निदान व उपचारासाठी तसेच राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे.

नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे दुपारी १ वाजता या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ८ कर्करोग मोबाईल व्हॅन, ७ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, १०२ क्रमांकांच्या ३८४ रुग्णवाहिका, २ सीटी स्कॅन मशीन, ८० डिजिटल हँड हेड एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच राज्यात ६ डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणाही यावेळी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने राज्यातील आठ मंडळांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून स्थानिक लोकप्रतिनिधीही यामध्ये सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे. या सुविधांमुळे राज्यातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याला प्रतापराव गणपतराव जाधव, केंद्रीय आयुष मंत्रालय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यांच्यासह या कार्यक्रमाला वन मंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार बाळ्यामामा म्हात्रे विशेष निमंत्रित असून स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार दौलत दरोडा, आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार महेश चौगुले, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजेश मोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार किसन कथोरे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार नरेंद्र मेहता, आमदार रईस शेख, आमदार सुलभा गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.