करंजा – उरण येथील जेट्टीचे काम दर्जेदार, वेळेत पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १०:  रायगड जिल्ह्यातील करंजा – उरण येथील मच्छिमार बंदराचे काम वेळेत पूर्ण करताना दर्जेदारही असावे, असे आदेश मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात आज उरण जेट्टीच्या कामाविषयी झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी, मत्स्य आयुक्त  किशोर तावडे, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उरण येथील जेट्टीचे काम करत असताना करण्यात येणाऱ्या कामांची प्राथमिकता ठरवावी, असे आदेश देऊन मंत्री राणे म्हणाले की, सर्वात प्रथम पाणी, वीज, रस्ते आणि लिलाव शेडचे काम करावे. तसेच एकूण राहिलेल्या कामांचे नियोजन करावे. यासाठी एक वेळापत्रक तयार करून त्यानुसार कामे करण्यात यावीत. एकूण 151 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असला तरी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन आणखी काही कामे घ्यावयाची असल्यास त्याचा समावेश करावा आणि सविस्तर सुधारित आराखडा सादर करावा. बंदरातील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य द्यावे आणि पुन्हा गाळ भरू नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा सादर करावा. या कामाच्या प्राशाकीय मान्यतेसाठी पाठपुरवा करावा.

या जेट्टीच्या ठिकाणी एकूण 20 कामे हाती घेण्यात आली आहेत. 151 कोटी रुपयांच्या या कामांमध्ये क्यू वॉल, जोड कालवा, पार्किंग, मच्छी लिलाव हॉल, प्रशासकीय कार्यालय, 2 फिशिंग गिअर शेड, 2 जाळी विणण्याची शेड, मच्छिमारांसाठी निवारा शेड, रेस्टॉरंट, रेडिओ कम्युनिकेशन स्टेशन, गार्ड हाऊस, संरक्षक भिंत, सुशोभिकरण, 1 एमएलडीचा सेवेज ट्रिटमेंड प्लांट, 200 टन क्षमतेचा आईस प्लांट, 100 टन क्षमतेचे फिश कोल्ड स्टोरेज, आरओ प्लांट, विुद्युतीकरण, पिण्याच्या पाण्याची सोय, अग्निसुरक्षा आणि फ्युएल पंप यांचा समावेश आहे.

दरम्यान मंत्री राणे यांनी रेवस ते रेड्डी या किनारी महामार्गाच्या कामाचाही आढावा घेतला. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील कामाचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. या कामाचे भू-संपादन योग्यरित्या करण्याच्या सूचना देऊन मंत्री राणे म्हणाले, हे काम तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावे. या कामाविषयी स्थानिकांना माहिती देण्यासाठी येत्या 12 फेब्रुवारी रोजी अधिकारी यांनी कुणकेश्वर येथे जाऊन ग्रामस्थांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करावी व कामाची सविस्तर माहिती संबंधितांना द्यावी. तसेच संबंधित विभागांच्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या.

कुणकेश्वर येथील हा पूल केबल स्टड प्रकारातील असणार आहे. एकूण 181 कोटी रुपयांचा हा पूल असणार आहे. त्याची लांबी 330 मीटर असून रुंदी 1.8 मीटर असणार आहे. तर जोड रस्तामिळून या संपूर्ण कामाची लांबी 1.580 कि.मी. इतकी आहे. या कामामुळे कुणकेश्वर आणि देवगड परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

०००

 

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/