मुंबई, दि. १०: भारत हा सर्वांगाने पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण असलेला देश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील समुद्रकिनारे, पर्वतरांगा, अभयारण्ये अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळे आहेत. महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण फळे, फुले, भाजीपाला अशी मुबलक कृषी संपदा असून सिंगापूरने व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढे यावे, महाराष्ट्र आपले स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
सिंगापूरचे महावाणिज्य दूत चिओंग मिंग फुंग यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्याबाबत चर्चा झाली.
राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची श्री.फुंग यांना माहिती दिली. जगप्रसिद्ध हापूस आंबा, स्ट्रॉबेरी, सह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळ, फळे, भाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. सिंगापूरला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्राच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सिंगापूरच्या महावाणिज्यदूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी सिंगापूर करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/