मुंबई, दि. ११: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि ऑगस्ट २०२५ अखेर प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावा यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बोरघाटात वाहतूक कोंडी आणि अपघात होतात. तसेच, पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीला अडथळे येतात. हे लक्षात घेऊन, हा नवीन मार्गिका प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
एकूण सुधारित मार्ग: खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यानचा भाग आहे.
यामध्ये सध्याचे १९ किमीचे अंतर ६ किमीने कमी होऊन १३.३ किमी इतके होणार आहे.प्रवासाच्या वेळेत २०-२५ मिनिटांची बचत,इंधन बचत आणि वायू प्रदूषणात घट,घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे.
या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) पुणे विभागातील अधिक्षक अभियंता राहुल वसईकर, कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे तसेच प्रकल्प सल्लागार, कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
०००
राजू धोत्रे/विसंअ/