मराठीला नुकताच ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या राजधानीत होणारा मराठी भाषेचा जागर केवळ महाराष्ट्र आणि देशापुरता मर्यादीत न राहता जगाच्या कानाकोपऱ्यातील तमाम मराठी बांधवांसाठी एक अविस्मरणीय क्षण असणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पार पडलेल्या संमेलनाच्या आठवणींया याद्वारे उजाळा देण्याचा प्रयत्न…
चंद्रपूर ही ऐतिहासिक नगरी आहे. प्राचीन काळापासून मौर्य, गुप्त, सातवाहन, राष्ट्रकुट, चालुक्य, वाकाटक, यादव, गोंड आणि मराठ्यांनी या भूमीवर राज्य केले. देवटक येथे सापडलेल्या शिलालेखामुळे मौर्यकालीन इतिहासात अधिक भर पडते. तर भद्रावती येथील विजासन गुंफावरील शिलालेख सातवाहनकालीन इतिहासावर प्रकाश टाकतो. चंद्रिका मंदीर येथील शिलालेखाद्वारे यादवकालीन इतिहास उलगडतो. चंद्रवंशीय माना राजांचे प्रभुत्व संपुष्टात आणून गोंड राजवटीने या भागावर स्थिर शासन प्रस्थापित केले.
असा प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंद्रपूर शहराच्या स्थापनेस 500 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात 3 ते 5 फेब्रुवारी 2012 दरम्यान अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते.
साहित्य हा समाजाचा आरसा मानला जातो. तत्कालीन काळाचे प्रतिबिंब तत्कालीन साहित्यामध्ये उमटते. तसेच समाजमन बदलण्याची ताकदसुद्धा साहित्यात असते. संत ज्ञानेश्वरांपासून खऱ्या अर्थाने मराठी भाषा विकसीत होऊ लागली. त्यानंतरच्या काळात संत, समाजसुधारक, विचारवंत आणि साहित्यिकांनी आपल्या उत्तम साहित्याने त्यात मोलाची भर घातली. एकप्रकारे साहित्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. साहित्य, कला, संगीत, नाटक या बाबींचा तत्कालीन समाजव्यवस्थेवर फार मोठा प्रभाव असल्याचे जाणवते. अलिकडच्या काळात हा प्रभाव कमी होत असला तरी आजही साहित्यावर प्रेम करणारे आपल्या निदर्शनास येतात. जंगलांनी वेढलेल्या, निसर्गाचे वरदान लाभलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातही कवी, साहित्यिक, संशोधक आणि लेखकांनी फार मोठे योगदान दिले आहे.
याच पार्श्वभुमीवर चंद्रपूर येथे 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 फेब्रुवारी 2012 या कालावधीत घेण्यात आले. हे साहित्य संमेलन साधनाताई आमटे यांच्या स्मृतीला समर्पित होते. त्यांना अभिवादन करणारे ‘समिधा’ व स्वागत गीत चंद्रपूर येथील सुप्रसिध्द कमी व नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी यांनी लिहिले होते.
85 व्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते तर संमेलनाचे अध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कृत प्रसिध्द कवी, कादंबरीकार, लेखक व चित्रकार प्रा. वसंत आबाजी डहाके हे होते. संमेलनाचे उद्घाटन न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून हिंदी साहित्यात अत्यंत आदरस्थानी असलेले कथालेखन, कादंबरीलेखन, व्यंगात्मक लिखाण, निबंध लेखन, शोध निबंध तसेच चरित्रात्मक लिखाण करणारे डॉ. महिपसिंग उपस्थित होते.
संमेलनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘हिराई’ स्मरणिकेत ‘संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके : शतकाच्या चित्रलिपीचे महावाक्य’ या प्रा. रणधीर शिंदे यांच्या लेखात वसंत आबाजी डहाके यांचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. तो पुढीलप्रमाणे ‘माझ्यापुरतं बोलायचं तर चंद्रपूरचा परिसर आणि त्या परिसरातील विविध प्रतिमांचं माझ्या कवितेतील प्रतिमांशी काहीएक नातं असावं असं वाटतं. माझी घडण या परिसरात झाली. इथल्या लाल मातीत माझीही लहानशी पावलं उमटली. इथल्या झाडांमध्ये आणि उद्ध्वस्त अवशेषांमध्ये मी वावरलो. इथल्या पावसाच्या झडीनं आणि भाजून काढणाऱ्या उन्हानं, थंडीनं, वाऱ्यानं माझ्यावर चिन्हं कोरली. चंद्रपूरच्या शिवेबाहेर टाकून दिल्यासारख्या अवाढव्य प्रतिमांनी माझ्यावर चेटुक केलं. पुढे कित्येक दिवसांनी मी एका शब्दापुढे दुसरा शब्द ठेवण्याचं साहस केलं. जिथून आपण निघतो, तिथचं परत यावं असं वाटतं’…
संमेलनस्थळाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तर मुख्य प्रवेशद्वारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व मुख्य सभामंडपास दिवंतग मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे नाव देण्यात आले होते. विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर्व पुर्वाध्यक्षांना संमेलनासाठी निमंत्रीत करण्यात आले होते. संमेलनाच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी रात्री रोचित कला अकादमी, पुणे आणि कथ्थक साधना केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मार्कंडा देव नृत्यशिल्पातील साहित्यिक आशय’ हा अभिनव कार्यक्रम सादर करण्यात आला होता.
०००
- राजेश का. येसनकर, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर