मुंबई दि. 12 : जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियान योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करून योजना सुरळीत असल्याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष भेट द्यावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
मंत्रालयातील दालनात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन विषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सुरू असलेल्या 1164 योजनांच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. इतर योजनांची कामे गतीने वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचा काळ्या यादीत समावेश करावा. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची डेटा एंट्री वेळेत करावी. महिला बचत गटांमार्फत कचरा संकलन आणि वर्गीकरण करण्याची उपाययोजना करावी. ग्रामपंचायत कर्मचारी नियुक्ती करून गावस्तरावर स्वच्छता व्यवस्थापन प्रभावी करण्याच्या सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि शौचालयांच्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आढावा बैठकीस जलजीवन मिशनचे संचालक ई. रवींद्रन, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पाणीपुरवठा विभागाचे सहसचिव बी. जी. पवार, मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, स्वच्छ भारत मिशनचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००
राजू धोत्रे/विसंअ/