नवी दिल्ली येथे होऊ घातलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील साहित्यविषयक आढावा घेतलेला प्रा.नरेश दे.आंबिलकर यांचा विशेष लेख…
भंडारा जिल्ह्याच्या नावाची उत्पत्ती ‘भण भण’या शब्दापासून झाली आहे असे सांगितले जाते. पितळी भांड्याच्या ठोकापिटीतून या जिल्ह्याचे नाव भंडारा पडले असावे. भंडारा जिल्हा तलावांचा, धानाच्या कोठाराचा आणि विविध खाणींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात प्राचीन काळापासून साहित्याच्याही खाणी असल्याचे आढळून येते. भंडारा जिल्ह्याने साहित्यासाठी दिलेल्या योगदानातून या जिल्ह्याचे वेगळेपण अधोरेखांकित होते.
भंडारा जिल्ह्याचे महत्त्व सांगताना कवी द.सा.बोरकर म्हणतात
“ महाराष्ट्राच्या पूर्व क्षितिजी चमचम चमके तारा /
इतिहासाशी नाते सांगतो आमचा भंडारा /
माझा प्यारा भंडारा //
भंडाऱ्याच्या प्रांती होती परगणे प्रसिद्ध /
कालिदास भवभूती नांदले हरीनाथ सिद्ध /
आद्य मराठी ग्रंथ निर्मिला मुकुंदराजे आंभोरा /
इतिहास असे नाते सांगतो आमचा भंडारा /
माझा प्यारा भंडारा “
भंडारा जिल्ह्याचे साहित्यातील योगदान मोठे असल्याचे इतिहासावरून लक्षात येते. नाटक हा कलाप्रकार राजप्रसादातून सामान्य जनतेपर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भवभूती या नाटककाराने केले. भवभूतीचे कार्यस्थान आमगाव तालुक्यातील पदमपुर हे आहे. भवभूतीने सुरू केलेली नाट्यलोकाश्रयाची परंपरा आजही झाडीपट्टीतील नाटकांच्या रुपाने जिवंत आहे. इसवी सन 1188 मध्ये लिहिल्या गेलेल्या आद्य काव्यग्रंथ ‘विवेकसिंधू’ने भंडारा जिल्ह्याच्या साहित्याची मोहर संपूर्ण मराठी साहित्यावर उमटवली आहे. ‘विवेकसिंधू’ या ग्रंथात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीचा व आंभोऱ्याचा उल्लेख पुढील प्रमाणे आहे
वैन्यागंगेचिये तीरी/मनोहर अंबानगरी /
तेथे प्रकटले श्रीहरी/ जगदीश्वरु /
या ओळीतून भंडारा जिल्ह्यातील जीवनदायी वैनगंगा नदीच्या तीरावरील मनोहर असलेली अंबानगरी म्हणजे आजचे आंभोरा हे ठिकाण होय. या ग्रंथाच्या निर्मितीची साक्ष देत आंभोरा आज अभिमानाने उभा आहे.
भंडारा जिल्ह्याने महानुभव संप्रदायाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी यांना पहिला शिष्य दिला. या पहिल्या शिष्याचे नाव आहे नीळोभट्ट भांडारेकर. लीळाचरित्राच्या एकाकातील ‘भांडारेकरां भेटी’ या लीळेत भंडाऱ्याच्या या शिष्याचा सविस्तर उल्लेख आलेला आहे. श्रीचक्रधरस्वामी भंडारा येथे आले असतांना त्यांची नीळोभट्ट भांडारेकर यांच्याशी भेट झाली. श्रीचक्रधरस्वामी यांच्या भेटीनंतर नीळोभट्ट भांडारेकर हे सदैव श्रीचक्रधरांच्या सोबत राहिले. भंडारा येथून जातांना नीळोभट्ट भांडारेकर पत्नीला उद्देशून म्हणाले “एतुले दिस तुम्हांपासि होते: आता जयाचे तयापाठी जात असे:तुम्ही राहा:”
नीळोभट्ट व श्रीचक्रधरस्वामी यांच्या गुरु – शिष्य प्रेमाचे दाखले लीळाचरित्रात पदोपदी आढळतात. ‘भांडारेकारा देहावसान’ या लीळेतून श्रीचक्रधरस्वामी आणि नीळोभट्ट भांडारेकर यांचे नाते किती अतूट होते हे दिसून येते.
मृत्यूसमयी त्यांचे डोके श्रीचक्रधरस्वामींच्या मांडीवर होते. मृत्यूसमयी नीळोभट्ट भांडारेकर श्रीचक्रधरांना म्हणाले “ना:जी:हे सन्निधान जानु उसीसेया: जी जी : आता देह जाए तरि बरवे” . श्रीचक्रधरस्वामींनी नीळोभट्टाचे अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख आहे.
श्रीचक्रधरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले भंडारा शहरातील पाणीपात्र मंदिर, भोजनता मंदिर, दत्तात्रय मंदिर, पट्टीशाळा, वनदेवबाबा मंदिर तसेच आद्य शिष्य नीळोभट्ट भांडारेकर यांचे घर राहते ही सर्व ठिकाणे आज सर्व महानुभाव संप्रदायाच्या भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहेत.
श्रीचक्रधरांनी झाडीपट्टीतील या भागाला अनेक वेळा भेटी दिल्याचे लीळाचरित्रातील लीळांवरुन स्पष्ट होते. ‘डाकरामी व्याघ्र बीद्रावण’,‘झाडी रामद्रणेचा भेटी’ या लीळा झाडीपट्टीतील आहेत. झाडीपट्टीचा आणि लीळाचरित्राचा संबंध डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी ‘लीळाचरित्रातील अर्थभेद’ या लेखातून उलगडून दाखविला आहे. यात आहाता, बुड्डा, आंबिल, कांजी, वेळण (येरन) गुळ, भेली, अडणी, तिवाई, भावसन, भाणे, सिलीक, सीत, खराटा, पालो, कोर, खांड, फोड, बोडी, पेंडी, पाटनी, वखर, कडप, वाक, पाड, मेर, वागूर, तीज, दर, इसाळ, गडन, लवन, हेंदडा, नोकणे, करु, सुसवणे, वोदरणे, भवणे, आटणे, उमटणे, खिरणे, पाचारणे या झाडीपट्टीतील शब्दांचा नेमका अर्थ सांगितला आहे. झाडीपट्टीतील या शब्दांचा नेमका अर्थ समजून न घेता काही नामवंत अभ्यासकांनी कसा चुकीचा अर्थ सांगितला आहे हे साधार डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी पटवून दिले आहे.
भंडारा जिल्ह्यात मध्ययुगीन काळातील साहित्य सापडत नाही मात्र साहित्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा जिल्हा मध्यंतरीच्या काळात कसा कोरडा राहिला याचे आश्चर्य वाटते. कदाचित काळाच्या उदरात हे साहित्य आजही लपलेले असावे. चिकाटीने शोध घेत राहिल्यास मध्ययुगातील हे साहित्य समोर यायला वेळ लागणार नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वरदहस्त भंडारा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. ग्रामगीतेची प्रयोगशाळा राष्ट्रसंतांनी भंडारा जिल्ह्यातील आमगाव या ठिकाणी उभारली होती. राष्ट्रसंताच्या साहित्यातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे ‘ग्रामगीता’. ग्रामविकासाचे वेगवेगळे उपाय राष्ट्रसंतांनी 41 अध्यायातून सांगितले आहेत. खेडी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होईल या संकल्पनेतून साकारलेल्या ग्रामगीतील बहुतांश प्रयोग हे भंडारा जिल्ह्यातील ‘आदर्श आमगाव’ या ठिकाणी राष्ट्रसंतांनी प्रत्यक्ष करुन पाहिले.
राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील आदर्श गाव हे भंडारा जिल्ह्यातील आमगाव हेच आहे. या आमगावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राबविलेल्या उपक्रमात ग्रामनियोजन वर्ग, न्यायपंचायत, ग्रामपंचायत संमेलन, सामुदायिक कृषी योजना, गौसेवा, महिला सर्वागीण शिक्षण प्रशिक्षण वर्ग यांचा समावेश होता.
आमगावात श्रीगुरुदेव सहकारी धान्य भंडार, श्रीगुरुदेव तेलघाणी, कला मंदिर, चिकित्सा मंदिर, सेवाश्रम, अध्ययन मंदिर, व्यायाम मंदिर, श्रीगुरुदेव जंगल कामगार सोसायटी, श्रीगुरुदेव भारत नवनिर्माण विद्या मंदिर, प्रचार प्रशिक्षण केंद्र यांची स्थापना केली. याच ठिकाणी पहिल्यांदा अत्याधुनिक विद्युतदीप राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरु केले. आमगावातील या सर्व यशस्वी प्रयोगाची नोंद ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायात आलेली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेची प्रयोगशाळा असलेल्या या आमगावाला राष्ट्रसंतांनी राज्यपाल श्रीपट्टाभिसीतारामय्या, आरोग्यमंत्री मा.सा.कन्नमवार, मध्यप्रांताचे अन्नमंत्री दीनदयाल गुप्ता, उद्योगमंत्री अशोक मेहता, विकास मंत्री रा.कृ. पाटील, कृषिमंत्री शंकरराव तिवारी, नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू पंडित कुंजीलाल दुबे, लोककर्म मंत्री राजा नरेशचंद्र, रेल्वेमंत्री व नंतरचे भारताचे प्रधानमंत्री झालेले लालबहादूर शास्त्री, संत गाडगेबाबा, तुकारामदादा गीताचार्य, मंत्री गुलजारीलाल नंदा, मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल, गृहमंत्री कैलासनाथ काटूज, जयप्रकाश नारायण या सर्वाना भेट द्यायला लावून आदर्श गावाची संकल्पना समजून सांगितली.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी आयोजित 18 व्या विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीते’चे प्रकाशन 25 डिसेंबर 1955 ला तुमसर येथील या संमेलनात करण्यात आले. या संमेलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विविध साहित्यसंपदेबद्दल सांगोपांग चर्चा करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात तुकडोजी महाराज म्हणाले होते “हा ग्रामगीता ग्रंथ बिघडलेल्या जीवनाला विशाल मानवतेची जाण करून देईल” राष्ट्रसंतांच्या साहित्य निर्मितीत भंडारा जिल्ह्याचे योगदान किती मोठे होते हे लक्षात येते.
आधुनिक काळात भंडारा जिल्ह्यातील साहित्यिक ना.रा.शेंडे यांचे साहित्यक्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. भंडारा शहरातील गणेशपुर येथील रहिवाशी असलेले ना.रा.शेंडे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते. विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.ना.रा.शेंडे यांनी विपुल साहित्य निर्मिती केली. त्यांनी लिहिलेल्या ‘मी व माझे लेखन’ या पुस्तकात ते म्हणतात “ मी 20 कादंबऱ्या, 8 नाटके, 65 लघुकथा, 150 कविता, एक धर्मग्रंथ, एक चरित्रग्रंथ लिहिला.” मात्र त्यांनी यातील बहुतांश ग्रंथ होळीत जाळून टाकल्याचे त्यांनी ‘मी व माझे लेखन’या ग्रंथात नमूद केले आहे.ना.रा.शेंडे यांनी अनेक संत व राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचे लेखन केले. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ‘माहिती अधिकारी’हे पद मिळाले होते. त्यांचा आज उपलब्ध असलेला व अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिलेल्या ग्रंथ म्हणजे ‘लोकसाहित्य संपदा’ हा आहे. हा ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केला. मात्र आज ना.रा.शेंडे यांचे ग्रंथ दुर्मिळ झाले आहेत.
‘बोलीमहर्षी’या पदवीने सन्मानित असलेले डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचेही साहित्य क्षेत्रातील स्थान फार मोठे आहे. संशोधक, लोककलेचे तारणहार म्हणून डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा नावलौकीक आहे. शासनाचे अनेक साहित्य पुरस्कार त्यांच्या ग्रंथांना मिळाले आहे.त्यांनी साकारलेला ‘झाडीबोली मराठी शब्दकोश’ हा बोलीतील एक मैलाचा दगड आहे. झाडीपट्टीतील लुप्त पावलेल्या लोककलांना त्यांनी पुनरुज्जीवित केले. आज झाडीपट्टीत जेवढे नाट्यप्रयोग होतात तेवढे संपूर्ण महाराष्ट्रात होत नाहीत. त्यांच्यामुळे दंडार, खडीगंमत या लोककलांना संपूर्ण भारतभर ओळख मिळाली आहे. एकंदरीत भवभूतीपासून सुरू झालेला हा साहित्य प्रवाह आजही भंडारा जिल्ह्यात अविरतपणे वाहत आहे
संदर्भ
१) प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास – ल. रा. नसीराबादकर फडके प्रकाशन कोल्हापूर .
२) झाडीबोलीतील मराठी शब्दकोश – डॉ. हरिश्चंद्र बोरकर विजय प्रकाश, नागपूर.
३) ग्रामगीता – वं. राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज साहित्य प्रकाशन समिती अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ मोझरी.
४) लोकसाहित्य संपदा -ना. रा. शेंडे विदर्भ साहित्य संघ प्रकाशन नागपूर
५) मी आणि माझे लेखन -ना. रा. शेंडे श्रीशेष प्रकाशन गणेशपुर.
६) लीळाचरित्र – डॉ. वि. भ. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई
७) झाडीपट्टीत राष्ट्रसंत – डॉ. हरिश्चंद्र बोरकर झाडीबोली साहित्य मंडळ साकोली
०००
- प्रा.नरेश दे.आंबिलकर, मराठी विभाग प्रमुख, नटवरलाल जशभाई पटेल कला वाणिज्य महाविद्यालय मोहाडी, जि.भंडारा भ्रमणध्वनी- 9423112181, ई-मेल ambilkarnaresh@gmail