नवी दिल्ली येथे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वी १९५४ साली नवी दिल्ली येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झाले होते. तथापि, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाच्या राजधानीत होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची पार्श्वभूमी या संमेलनास आहे. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील साहित्य, साहित्यिक व साहित्य चळवळीवर प्रकाशझोत टाकणारा साहित्य अकादमीचे सदस्य, अविनाश सप्रे यांचा माहितीपूर्ण लेख…
सांगली जिल्ह्याची वाङ्मयीन परंपरा उज्ज्वल आणि अभिमानास्पद आहे. अनेक समकालीन, तरूण लेखक, कवी आपल्या सर्जनाने साहित्याच्या विविध प्रवाहातून सांगली जिल्ह्याची साहित्य संस्कृती वर्तमानात पुढे नेत आहेत.
सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे हे लेखक केशवसुतांचे समकालीन होते. ‘समुद्र’ हे 132 श्लोकांचे त्यांचे दीर्घकाव्य 1884 साली प्रकाशित झाले. यशवंतराव होळकरांच्या जीवन आणि कर्तृत्वाचे वर्णन करणारे यशवंतराव हे खंडकाव्य 1888 साली प्रकाशित झाले. गुणोत्कर्ष, तारामंडल, चित्रवंचना, कृष्णकांचन, उग्रमंगल आणि शिवसंभव ही त्यांची गाजलेली नाटके. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनादिनी (1 मे 1960) चित्रपती व्ही. शांताराम यांनी बाबूराव पेंढारकरांच्या सहकार्याने ‘शिवसंभव’ चा मुंबईमध्ये भव्य स्वरूपाचा प्रयोग केला होता. मिरजेचे ‘खरे वाचन मंदिर’ हे त्यांच्या कार्याचे स्मारक आहे. या ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी होणारी वसंत व्याख्यानमाला एक जुनी आणि नामवंत व्याख्यानमाला असून महाराष्ट्रातल्या नामवंत लेखक, वक्ते, विचारवंत इत्यादिंना या ज्ञानयज्ञातून ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळत असते.
राजकवी साधुदास हे सांगली संस्थानातले एक आदरणीय कवी होते. ‘विहार’, ‘वनविहार’, ‘रणविहार’ अशी त्यांनी रामायणावर आधारित महाकाव्य रचना केली. पेशवे काळावरच्या पौर्णिमा’, ‘प्रतिपदा’ आणि व्दितिया या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या होत.
काव्यविहारी (गद्रे) हे यानंतरचे एक महत्त्वाचे कवी होते. रविकिरण मंडळाच्या काव्यदृष्टीचा आणि रचनापद्धतीचा त्यांच्या काव्यलेखनावर प्रभाव होता. ‘काव्यविहार’, ‘स्फूर्तिलहरी’, ‘स्फूर्तिनिनाद’, ‘स्फूर्तिविलास’ हे त्यांचे काव्यसंग्रह असून नाट्य सुगंध आणि नाटककार देवल व्यक्ती आणि वाङ्मय हे त्यांचे नाट्यसमीक्षा ग्रंथही प्रसिद्ध आहेत.
विलिंग्डन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य गो. चिं. भाटे यांची ‘प्रेम की लौकिक’ ही कादंबरी विषयाच्या वेगळेपणामुळे तत्कालीन कादंबरी विश्वात गाजली होती. त्यांनी प्रवास वर्णन हा वाङ्मय प्रकारही प्राचुर्याने हाताळला. कानडी वाङ्मयात मोलाचे योगदान देणारे प्राचार्य गोकाक आणि प्राचार्य मुगळी यांची वाङ्मयीन कारकीर्द इथेच बहरली. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे प्राथमिक शिक्षणही मिरजेच्या शाळा नं. 1 मध्ये झाले.
उद्योग आणि उन्नतीचे संस्कार मराठी मनावर घडवणारी आणि नव्याने उदयाला येत असलेल्या शिक्षित मध्यमवर्गाची वैचारिक आणि वाङमयीन अभिरूची घडवणारी ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि आणिवा ही सुप्रसिद्ध मासिके सुरवातीला अनेक वर्षे या जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीतून प्रकाशित होत होती. नियतकालिकांच्या इतिहासात या मासिकांना अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. मासिकांचे संस्थापक संपादक शंकरराव किर्लोस्कर आणि नंतरचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचे या संदर्भातले योगदान मौल्यवान आहे.
कवी सुधांशु आणि कथाकार म. भा. भोसले यांनी औदुंबर येथे सुरू केलेले सदानंद साहित्य संमेलन सत्तर वर्षांहून अधिक काळ अखंडपणे दरवर्षी मकर संक्रातीच्या दिवशी भरत असते. महाराष्ट्रातल्या मुख्य साहित्य संमेलनांव्यतिरीक्त ग्रामीण भागात भरणारे महाराष्ट्रातले हे पहिले साहित्य संमेलन होय. या संमेलनाला महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व ख्यातनाम लेखक, कवी, नाटककार, ललित लेखक, समीक्षक अध्यक्ष म्हणून हजर राहिले आहेत. जिल्हास्तरावरची सर्वात जास्त म्हणजे जवळपास 16 साहित्य संमेलने सांगली जिल्ह्याच्या विविध भागात दरवर्षी नियमितपणे भरत असतात. मराठीतले मान्यवर ज्येष्ठ लेखक या संमेलनांना अध्यक्ष म्हणून आवर्जून येत असतात.
स्फुटकाव्य आणि खंडकाव्य लिहिणारे रविकिरण मंडळाचे एक संस्थापक सदस्य कवी गिरीश (शं. के कानेटकर) यांचे सांगलीमध्ये वास्तव्य होते. त्यांचे सुपुत्र आणि पुढे महाराष्ट्रातले एक ख्यातनाम नाटककार म्हणून प्रसिद्धी पावलेले वसंत कानेटकर यांचे शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले आणि आपल्या काही महत्त्वाच्या नाटकांचे लेखनही त्यांनी इथेच केले.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे हेही विलिंग्डन महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी सांगलीत वास्तव्यास होते. मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि थोर लेखक आणि मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळाला, ते वि. स. खांडेकर मूळचे सांगलीचेच. गणेश आत्माराम खांडेकर हे त्यांचे मूळ नाव. पुढे दत्तक गेल्यावर ते विष्णु सखाराम खांडेकर झाले. त्यांचे शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झाले. नंतरचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विं. दा. करंदीकर यांचे वास्तव्यही शिक्षक म्हणून काही काळ तासगावला होते. सुरवातीच्या कविता त्यांनी इथेच लिहिल्या होत्या. सर्वश्री ग. दि. माडगूळकर, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगूळकर, ना. सं. इनामदार आणि प्रा. म. द. हातकणंगलेकर या सांगली जिल्ह्यातील प्रतिभावंत कवी, लेखक आणि समीक्षकांना मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला.
वंचित, उपेक्षित, बहिष्कृत म्हटल्या गेलेल्या जमातीचे अनोखे दर्शन घडवणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीने बुलंद करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे, लावणीचे अध्वर्यू पठ्ठे बापूराव, अपरिचित अनुभवांचे सशक्त चित्रण करणारे श्री. दा. पानवलकर, दलितांच्या वेदना आणि दुःखांना शब्दरूप देणारे कथाकार बंधुमाधव, ग्रामीण जीवनाचे अंतरंग उलगडणारे चारुता सागर, देवदत्त पाटील, भक्तीरसाचा आविष्कार करणारे कवी सुधांशु, गीतकार पी. सावळाराम, कवी व लोकसाहित्याचे अभ्यासक अशोकजी परांजपे, गीतकार सुधीर मोघे, लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर, तारा भवाळकर, सय्यद अमीन, सुलेखनकार र. कृ. जोशी, जीवनातील विरुपतेचे दर्शन घडविणाऱ्या कमल देसाई, प्राकृत साहित्याचे संशोधक ग. वा. तगारे, पानिपतकार विश्वास पाटील इत्यादींनी आपल्या प्रतिभासामर्थ्याने आणि सौंदर्याने सांगली जिल्ह्याचे नाव आणि लौकिक वृद्धींगत केला आहे. अनिल दामले, शैला सायनाकर, कथाकार वामन होवाळ, कवी अभ्यासक अरुण कांबळे तसेच ललित लेखनाचे नितांत सुंदर रूप दाखवणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. जी. के. ऐनापुरे, साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्राप्त वसंत केशव पाटील आणि बलवंत जेऊरकर, प्रा. वैजनाथ महाजन, कमलेश वालावलकर, संजीव खांडेकर यांच्यासारखे अनेक समकालीन, तरूण लेखक, कवी आपल्या सर्जनाने साहित्याच्या विविध प्रवाहातून सांगली जिल्ह्याची साहित्य संस्कृती वर्तमानात पुढे नेत आहेत…
- अविनाश सप्रे (लेखक साहित्य अकादमीचे सदस्य आहेत)