सक्षम, समर्थ, कल्पक समाजाच्या निर्मितीसाठी संमेलनाला लागणारा निधी ही भांडवली गुंतवणूक –  डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन : वाचन चळवळीसाठी सर्व संस्थांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक

नागपूर,दि. १२: साहित्य संमलने ही सुद्धा एक व्यापक चळवळ आहे. ही चळवळ युवकांनी निर्माण केलेली आहे. साहित्यामधून, वाचनातून भाषिक समाज समृध्द होत जातो. संमेलने हा या समृध्दीचा एक मार्ग आहे. संमेलनाची फलश्रुती ही कोणत्याही आर्थिक फुटपट्टीवर मोजता येणार नाही.  संमेलनासाठी लागणारा निधी  ही उद्याच्या सशक्त समाजासाठी, समाजाच्या कल्पकता वृद्धीसाठी, सहिष्णूतेसाठी, विवेकासाठी केलेली भांडवली गुंतवणूक आहे, असे श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औचित्याने  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने विविध साहित्यिकांशी संवाद साधला जात आहे. महाविद्यालयीन युवकांमध्ये वाचनाची अधिक गोडी निर्माण व्हावी यादृष्टीने साधलेल्या संवादात ते बोलत होते.

वाचनाचे माध्यम हे वैयक्तिक माध्यम आहे. मेंदुतील धिम्या लहरी वाचन करताना सक्रिय असतात. आकलनाला अवकाश त्यामुळे लाभतो, रसग्रहणाची प्रक्रिया त्यातून विकसीत होत राहते. वाचनाद्वारे आपल्या कल्पना शक्तीला, निर्मितीक्षमतेला चालना मिळते. आपण जे वाचतो त्यातील प्रतिमा विश्व मेंदूत साकारली जात असते. एक प्रकारे ही प्रक्रिया आपल्या निकोप मनासाठी अत्यंत आवश्यक असून लेखकासमवेत वाचकांना सहनिर्माता होण्याची संधी यातून मिळते, अशा शब्दात ज्येष्ठ कवी ,साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सरणारी प्रत्येक पिढी ही नव्या पिढीला दोष देण्याच्या भूमिकेत आढळते. परंतु सर्वात जास्त अभिव्यक्ती ही युवा वर्गाकडूनच  होत असते. ते चांगला विचार करतात. महाविद्यालयीन रंगभूमीला समृध्द करण्याचे काम याच मुलांनी केले आहे. मात्र असे असले तरी  ही मुलं वाचनापासून दूर आहेत. त्यांना वाचनाच्या जवळ आणावयाचे असेल तर शालेय जीवनातच मुलांवर  वाचनाचे संस्कार करणे क्रमप्राप्त असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर ज्या सार्वजनिक वाचनालयांनी महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी जी व्यापक चळवळ उभी केली, ती चळवळ गारठल्याची स्थिती आहे. जवळपास 12 हजार 500 सार्वजनिक ग्रंथालये आज महाराष्ट्रात आहेत. साहित्य संस्था, सार्वजनिक ग्रंथालये, शासनाची ग्रंथालये यांनी स्वत:हून पुढे येत विविध उपक्रमांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

०००