अभिजात मराठी: अहिराणी बोलीचा इतिहास (भाग १)

अ. भा. साहित्य संमेलन, नवी दिल्ली: विशेष लेख

नवी दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यकृती, साहित्यिक योगदानास यानिमित्ताने उजाळा देण्यात येत आहे. खान्देशातील नावाजलेले साहित्यिक डॉ. रमेश सुर्यवंशी यांनी अहिराणी बोली भाषेवरील केलेले प्रगल्भ संशोधन व अहिराणी बोली, खानदेश इतिहास,अहिराणी शब्दकोश या विषयावर केलेले लिखाण वाचकांसाठी दोन भागात देत आहोत…

अहिराणी बोली भाषावैज्ञानिक ओळख

खानदेश प्रस्ताविक

अहिराणी ही खानदेश या भू प्रदेशात बोलली जाणारी बोली. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगांव या दोन जिल्ह्यांच्या मिळून होणाऱ्या प्रदेशास आजही खान्देश म्हणून ओळखतात. पूर्वी खानदेश हा मुंबई इलाख्याचा एक जिल्हा होता. प्राचीन काळी खानदेश या प्रदेशाचा विस्तार सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडे सातमाळा व अजिठ्यांचे डोंगर येथ पर्यंत तर पूर्वेकडील वऱ्हाड प्रांत ते निमाड जिल्हा पासून पश्चिमेकडे बडोदे संस्थान व रेवाकाठ जहागिरीपर्यंत होता. याचे अतिप्राचीन नाव ऋषिकदेश. यादवांच्या काळात हा भूभाग सेउनदेश म्हणून ओळखला जात असे. मोगलांच्या कारकीर्दीत हा भाग खानदेश म्हणून ओळखला जाई. व्यवस्थापनाच्या दृष्टिने इ.स. १९०६ मध्ये खानदेश जिल्ह्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खान्‍देश हे दोन भाग पाडण्यात आले. पुढे १९६० पासून पूर्व खान्‍देशास जळगांव जिल्हा व पश्चिम खानदेशास धुळे जिल्हा अशी नावे देण्यात आलीत.

खानदेश इतिहास :

रामायण- महाभारत यांतील उल्लेखलेल्या ऋषकदेश या भूप्रदेशाच्या वर्णनाशी खान्‍देशाचा भू-भाग जुळतो. खानदेश या शब्दाची उत्पत्ती कान्हदेव, कान्हेरदेव, कान्हाचा देश, कानबाई या शब्दांत शोधण्याचा आजवर प्रयत्न झालेला आहे. मात्र त्यात तथ्य वाटत नाही. खानदेश या भू-प्रदेशाहून इतरत्र कान्हाचा किंवा श्रीकृष्णाचा संबंध अधिकचा आहे. तसेच खान्‍देशातील अनेक उत्सवांपैकी कानबाई, कानुबाई हा एक उत्सव आहे. त्यामुळे एखाद्या भू-प्रदेशाला त्या परिसरातील एका उत्सवाच्या नावाने ओळखले जाणे ही शक्यताही कमीच आहे. कान किंवा कानन म्हणजे अरण्य, वन, गवताळ प्रदेश. कान किंवा खान या शब्दाचा अर्थ खाण, खदान, थाळा, मध्ये खोल असणारा भाग, खनि किंवा उत्पत्तीस्थान. सातपुडांच्या रांगा, सह्याद्रीच्या रांगा, चांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी व परिसरातील डोंगर रांगा यामुळे हा परिसर खोल खदाणी सारखा, खाणीसारखा आहेच. गिरणा, तापी, नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांचा हा भाग दाट अरण्याचा, गुरांसाठी विपूल गवत असणारा प्रदेश. येथे विपुलता (खाण) होती, चौफेरुन नैसर्गिक तटबंदीमूळे (भेसळ मुक्त अशी) शुद्धता, व शुद्ध वंश (खान, खानदानी) होती. म्हणून खदाणीचा खाणीचा देश, चांगल्या वंशाचा-खानदानीचा देश, गवताचा-कानन देश या वरुन खानदेश हे नामाभिदान झाले असावे, असल्या व्युत्पत्तीचांही विचार करण्याजोगा आहे.

अशिरगड हे अश्वस्थाम्याचे स्थान होते. तर पांडवाविरुद्ध तोरणमाळचा राजा लढला होता ते तोरणमाळ धुळे जिल्ह्यात आहे असे महाभारतकालीन उल्लेख आढळतात. चाळीसगांव जवळील पाटणे परिसरात आद्य पराष्मयुग व तदनंतर अप्पर पराश्म युगात मानवी वस्ती होती हे उत्खननात सापडलेल्या पाच स्थरांवरुन सिद्ध होते. बहाळ येथे सापडलेली नाणी, घटोत्कच्छ लेण्या, नागद, मूंदखेडे, मेहुनबारे, बहुलवाड येथे सापडलेले ताम्रपट, सारजादेवी मंदिरावरील शिलालेख, अंजिठा लेण्या, इ. पुराव्या आधारे खानदेशच्या इतिहासावर प्रकाश पडतो. खानदेशात इ.स.पूर्व चौथे ते इ.स. दुसरे शतकात मौर्याचे राज्य होते. पहिल्या शतकात सातवाहनांची सत्ता होती. ३ रे ते ५ वे शतकांत वाकाटकांची सत्ता होती (वर्षदेव, स्वामीदास, मुलंदा) चौथ्या शतकांत वाकाटकांसोबतच अभीरांचीही सत्ता होती. इ.स. ६५५ ते ७०२ या काळात सेद्रकांचे (निकुम्माल्लशक्ती, नृपती जयशक्ती, नृपती वैरसेन) राज्य होते. या सोबतच सहाव्या शतकांत कलचुरी तर सातव्या शतकांत पुलकेशीचे तर आठव्या शतकात त्रैकूटकांचे राज्य होते. त्या नंतर नवव्या ते बाराव्या शतका पर्यंत राष्ट्रकूट, सोमवंशी, आणि यादव यांचे राज्य होते. पुढे अल्लाउद्दीन खिलजी, अकबर, यांच्या सत्ते नंतर १८ व्या शतकांत (इ.स-१७२०) निझामांचे राज्य होते. १७६० ते १८१८ हा मराठ्यांचा काळ तर १८१८ ते १९४७ हा ब्रिटिशांचा काळ गणला जातो.

अहिर – अहिराणी :

रामायण, महाभारत, मत्स्यपुराण, ब्रहतसांहिता, नासिक लेणे, महाराष्ट्र ज्ञानकोश, डब्ल्यू क्रूक यांचा कास्ट अॅण्ड ट्राइब्ज इन नॉर्थ वेस्टर्न इंडिया, आ. इ. इन्थोव्हेन यांचे ट्राईब्ज अॅण्ड कास्ट ऑफ बॉम्बे इ. ग्रंथावरुन अहिरांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. त्या नुसार खानदेश हा मूळचा अहिरांचा देश. अहिर ही शेतकऱ्यांची, गवळ्यांची एक जात. प्रमुख उद्योग गुरे राखणे. मत्स्यपुराणात सात तर वायू पुराणात दहा अशी अहिर राज्यांची संख्या दिसते. इ.स. १५० मध्ये आध्रांचा ऱ्हास होऊन अभीरांचे राज्य आले. वायव्येकडून ते दक्षिणेकडे सरकत आले. चौथ्या शतकात खानदेशावर अहिरांचे राज्य होते. आठव्या शतकात काठी लोक जेव्हा गुजराथेत आले तेव्हा बराच मुलुख हा अहिरांच्या ताब्यात होता.

या अहिरांची वाणी-बोली ती अहिरवाणी किंवा अहिराणी. खानदेशात अहिराणी ही कृषि जीवन जगणाऱ्याची बोली आहे. खानदेश या जिल्ह्याच्या भूप्रदेशात ती बोलली जाते. म्हणून ती खानदेशी. आता खानदेश जिल्हा हा जळगांव व धूळे या दोन जिल्ह्यात विभागला आहे. मात्र या बोलीचे क्षेत्र या जिल्ह्याच्या क्षेत्राहून हे मोठे आहे. चांदवडचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, वाघुर नदी आणि संह्यपर्वत, अजिंठ्यांचे डोंगर या निसर्गाने तोडून वेगळ्या ठेवलेल्या खोलगट भूभागात, खदाणीत, खाणीत ही खानदेशी, अहिराणी बोलली जाते. या भूभागात मग नासिक, नंदूरबार, औरंगाबाद, जळगांव, धूळे या जिल्ह्याच्या गावांचाही समावेश होतो.

खानदेशात अहिर होते. कालानुरुप त्यांच्या नावांत बदल झाला. मात्र त्यांची अहिराणी, अभिरोक्ती किंवा अभिरी आजही टिकून आहे. अभीर म्हणजे यदुवंशीय; अभीर किंवा अहिर ही गवळ्यांची, गरेचारणाऱ्यांची, कृषि-उद्योग करणाऱ्यांचीएक जात. इत्यादी

इतर भाषिकांनी अहिरांच्या बोलीला अहिरवाणी किंवा अहिराणी म्हणून ओळखले किंवा संबोधले. अहिर हे खानदेशात सर्वत्र पसरलेले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या बोलीवर सुद्धा अहिराणीची छाप पडणे साहजिकच होते. या खानदेशातील अहिराणीला खानदेशी या प्रादेशिक नावाने देखील ओळखले जाऊ लागले.

अहिराणी आणि खानदेशी :

खानदेशात अहिरांचे वास्तव्य होते. अहिरांनी सुपीक जमिनीवर गुरे चारण्या सोबतच शेती व्यवसाय सुरु केला. शेती व्यवसायाला पुरक असे विविध व्यवसाय करणारे इतर लोक अहिरांशी सततच्या संपर्कात येवू लागले. सत्ता, व्यापार, व्यवसाय यातील अहिरांच्या भाषेचे वर्चस्व हे खानदेशभर वाढल्याने अहिराणी ही प्रदेशाच्या नावाने म्हणजे खानदेशी बोली या नावाने ओळखली जाऊ लागली. ती एका जातीची भाषा न राहता ती त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची, प्रदेशाची भाषा झाली. अहिरांशी सततचा इतर भाषिकांचा संपर्क आला. तो इतर भाषिक समाजही त्यांच्या स्वतःच्या बोलींची छाप असणारी अहिराणी, मिश्र अहिराणी बोलू लागला. बोलीचा उल्लेख करतांना ती त्या प्रदेशाची बोली, खानदेशाची बोली म्हणून खानदेशी या नावाने गणली गेली. खानदेशी बोली ही संकल्पना अहिराणी बोली ह्या संकल्पनेपेक्षा विशाल आहे. त्या त्या परिसरातील खानदेशी ही त्या त्या परिसराच्या नावाने संबोधली जाऊ लागली. ज्या ज्या जमातींनी ती भाषा स्विकारली त्या त्या जमातींच्या नावाने ती बोली ओळखली जाऊ लागली. या नुसार खानदेशी बोलीचे सामाजिक आणि प्रादेशिक असे प्रभेद निर्माण झालेत. खानदेशीच्या प्रादेशिक प्रभेदांचा विचार करता, खानदेशाच्या नैऋत्ये कडील बागलाण भागातील ती बागलाणी, उत्तरे कडील तापीच्या परिसरातील ती तप्तांगी, दक्षिणेकडील ती दखनी किंवा डोंगरांगी, पश्चिमेकडील ती वरल्ह्यांगी, पूर्वेकडील ती खाल्ल्यांगी, नेमाड कडील ती नेमाडी, डांगान परिसरातील ती डांगी, तसेच तावडी असे प्रादेशिक प्रभेद आढळतात. तर सामाजिक प्रभेदात, खानदेशात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक जातीच्या स्वतःच्या बोलीची छाप असलेली अहिराणी बोली ही त्या जातीची स्वतंत्र नामधारण करुन सामाजिक प्रभेदाचे रुप बनली. त्यात महारांची ती महाराऊ, लाडशाखीय वाण्यांची ती लाडसिक्की, भिल्लाची ती भिलाऊ, अहिरांची ती अहिराणी, लेवा पाटीदारांची ती लेवा पाटीदार बोली, पावरांची ती पावरी, काटोनी भिल्लांची ती काटोनी, घाटावरुन आलेल्यांची स्वतःच्या बोलींची छाप असलेली ती घाटोयी, गुजरांची ती गुजरी, भावसारांची ती भावसारी, परदेशांची ती परदेशी अशा जाती निहाय अहिराणीच्या सामाजिक प्रभेदांची यादी वाढतच गेली. या सर्व सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेदांना एकाच नावाने सामावून घेणारी विशाल संकल्पना ही “खानदेशी बोली” जी संपूर्ण खानदेशात बोलली जाते.

०००

  • डॉ. रमेश सुर्यवंशी, ‘अभ्यासिका’, वाणी मंगल कार्यालयासमोर कन्नड, जि. औरंगाबाद (महाराष्ट्र) पिन ४३११०३, भ्रमणध्वनी ०९४२१४३२२१८/८४४६४३२२१८