साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतून काव्यसंग्रह प्रकाशित होणे स्तुत्य उपक्रम  – मंत्री उदय सामंत

नवी दिल्ली, दि. १२ : राजधानी दिल्लीत राहून दिल्लीतील मराठी माणूस मनापासून मराठीपण जपत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उद्या सामंत यांनी आज ‘उजेडाचे प्रवासी’ या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात केले. होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतून कवितासंग्रह प्रकाशित होणे स्तुत्य उपक्रम असल्याचीही भावना मंत्री सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.

सरहद  संस्थेच्यावतीने आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्लीत होत आहे, त्यानिमित्त दिल्लीतील मराठी व्यक्तींनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह ‘उजेडाचे प्रवासी’ चा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र सदनात पार पडला त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते.

यावेळी केंद्रीय सहकार तथा नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, इंदिरा गांधी कला केंद्राचे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी, डॉ. सदानंद मोरे, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, महेंद्र कुमार लड्डा, सरहद संस्थापक संजय नहार आणि कवितासंग्रहाचे संपादक जीवन तळेगावकर उपस्थित होते.

98 साहित्य संमेलन दिल्लीत होत असून अधिकाधिक मराठी लोकांनी या साहित्य संमेलनाचा भाग व्हावा, असे आवाहन मंत्री सामंत यांनी यावेळी केले.

दिल्लीतील मराठी लोक या साहित्य संमेलनाचे राजदूत असून साहित्य संमेलनामुळे उत्साहाचे वातावरण सर्वदूर पसरत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे साहित्य संमेलन विशेष असल्याचाही उल्लेख मंत्री सामंत यांनी यावेळी केला.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी यावेळी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचा भाग होता येत असल्याचा आनंद व्यक्त करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेला अधिक चांगले दिवस येणार असल्याचे सांगितले.

यावेळी दिल्लीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

०००

अंजु निमसरकर/वृत्त वि. क्र.40  /