अहिल्यानगर ही साहित्यनिर्मिती आणि वाचनसंस्कृतीची प्रेरणाभूमी आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रणेते श्री चक्रधरस्वामी गुजरातमधून महाराष्ट्रात आले. श्रीरामपूर तालुक्यातील सराला गावातील म्हाइंभट यांनी डोमग्राम येथे श्री चक्रधरस्वामींची भेट घेतल्यानंतर प्रभावित होऊन इ.स. १२८७ मध्ये ‘लीळाचरित्र’ ग्रंथ लिहिला. आळंदीहून येऊन संत ज्ञानेश्वरांनी १२९० मध्ये नेवासा येथील पैस खांबाला टेकून ‘गीता टीका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली.
नंतरच्या काळात नगर जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांनी हा साहित्यनिर्मितीचा प्रवास पुढे नेला. नेवासा तालुक्यातील तरवडी गावी मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’ वृत्तपत्र सुरू करून सामाजिक प्रबोधनाला गती दिली. मध्ययुगीन व अर्वाचीन काळात मराठी वाङ्मयाने जिल्ह्यात साहित्य चळवळीला बळ दिले. र. वा. दिघे यांची लोकप्रिय ‘पाणकळा’ ही ग्रामीण कादंबरी राहुरी परिसराच्या वातावरणातून साकारली.
अशोक नगर येथे गोविंदराव आदिक यांच्या प्रेरणेतून ‘साहित्यशिल्प’ची स्थापना झाली. नामदेवराव देसाई, प्रा. विजयराव कसबेकर, सुमती लांडे, बाबुराव उपाध्ये, शिवाजी काळे इत्यादी साहित्यिक घडले. २६ जानेवारी १९७६ रोजी श्रीरामपूर येथे ‘दैनिक सार्वमत’ सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक साहित्यिक लिहू लागले. १९८२ मध्ये अशोक नगर येथे मोठा साहित्य मेळावा झाला. दया पवार, नामदेव ढसाळ, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखनामुळे प्रेरणा मिळाली. संगमनेर तालुक्यातील बोटा येथे १९७८ मध्ये पहिले ग्रामीण साहित्य संमेलन झाले. प्रवरानगर येथे १९८० मध्ये तिसरे ग्रामीण साहित्य संमेलन पार पडले. १९७८ पासून मी साहित्य चळवळीत सक्रिय आहे.
जिल्ह्यात गावागावांत साहित्य मंडळे सुरू झाली. मराठी भाषा आणि साहित्यनिर्मितीला बळ मिळाले. गोविंदराव आदिकांचे ‘श्रीरामपूर टाईम्स’, कुलकर्णी बाप्पा यांचे ‘जनसत्ता’, तसेच ‘दै. गावकरी’, ‘लोकमत’, ‘नवा मराठा’ यांसारखी वृत्तपत्रे साहित्य प्रेरणा देत होती. २७ जानेवारी १९८३ रोजी ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुरू झाली. १९८५ मध्ये श्रीरामपूर येथे सुमती लांडे यांनी ‘शब्दालय’ दिवाळी अंक सुरू केला. त्यात माझे ४० पानांचे ‘पोरका’ आत्मकथन प्रकाशित झाले. त्याच काळात खंडाळा येथे कवी एकनाथ डांगे यांनी ‘अक्षर साहित्य सांस्कृतिक मंडळ’ सुरू केले.
संजयकुमार आरणे यांनी चितळी येथे ‘भावगंध’ सुरू केले. ९ मे १९९० रोजी मी साहित्य प्रबोधनाची सुरुवात केली. तसेच श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठान स्थापन करून विविध साहित्यिक उपक्रम सुरू केले. डॉ. शिवाजी काळे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. २३ एप्रिल २००६ रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त मी ‘वाचनसंस्कृती प्रतिष्ठान’ सुरू केले, त्याअंतर्गत अनेक उपक्रम राबविले.
अहिल्यानगर येथे खासदार यशवंतराव गडाख यांच्या पुढाकाराने ३ ते ५ जानेवारी १९९७ या कालावधीत ७० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात अनेक कवींबरोबर माझेही कवितावाचन झाले आणि तो अनुभव आनंददायी ठरला. शेवगाव येथे कवी लहू कानडे यांनी ‘लोकहक्क फाउंडेशन’च्या माध्यमातून साहित्य उपक्रम सुरू केले. याच चळवळीमुळे शेवगाव येथे ‘शब्दगंध’ या साहित्य उपक्रमाची सुरुवात झाली. आता ‘शब्दगंध’चे १६ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडले.
जिल्ह्यात प्रारंभापासून देवदत्त हुसळे, स. वि. गायकवाड, म. कृ. आगाशे असे अनेक साहित्यिक लिहिते झाले. समीक्षक डॉ. र. बा. मंचरकर, यशवंतराव गडाख पाटील, प्रा. रायभान दवंगे, प्राचार्य डॉ. अशोक शिंदे, राधाकिसन देवरे, डॉ. संतोष पवार, कवी-गीतकार बाबासाहेब सौदागर, कवी बाबासाहेब पवार, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, डॉ. वंदना मुरकुटे, भागवतराव मुठे, बाळासाहेब तनपुरे, डॉ. दादासाहेब गलांडे, कैलास साळगट, डॉ. कैलास दौड, भाऊसाहेब सावंत, मेघाताई काळे, प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर यांच्या संयोजनाखाली ‘पद्मगंधा फाउंडेशन’तर्फे डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्यपुरस्कार दिले जातात. प्रा. गणेश भगत यांच्या साहित्यकार्याच्या स्मरणार्थ ‘स्व. मुळे साहित्य पुरस्कार’ दिला जातो.
जयंतराव येलूलकर यांच्या संयोजनाखाली सावेडी येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा विविध साहित्य उपक्रम राबवते. श्रीरामपूर येथे लेविन भोसले यांचे ‘प्रकाश किरण प्रतिष्ठान’, सुखदेव सुकळे यांचे ‘विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान’ साहित्य पुरस्कार आणि उपक्रम घेतात. प्रा. मा. रा. लामखेडे, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, डॉ. चं. वि. जोशी, डॉ. शारदा महांडुळे (निर्मळ), डॉ. सुधाकर शेलार, प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, जामखेडचे कवी आ. य. पवार, प्रा. दिलीप सोनवणे, श्री. द. सा. रसाळगुरुजी, डॉ. संतोष खेडलेकर, हेरंब कुलकर्णी, प्रा. डॉ. सुनील शिंदे, प्रा. डॉ. राहुल हांडे, डॉ. दत्तात्रय गंधारे, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, यशवंत पुलाटे, सुभाष सोनवणे, प्रा. डॉ. संजय कळमकर, प्रा. शशिकांत शिंदे, शर्मिलाताई गोसावी, सुनील गोसावी, डॉ. अमोल बागूल, कवी आनंदा साळवे अशी कित्येक साहित्यिक, कवी आणि लेखक या प्रेरणेतून लिहिते झाले आहेत.
अहिल्यानगरचा साहित्यिक इतिहास फार मोठा आहे पण ही संदर्भ नोंद केवळ प्रातिनिधिक आहे.
डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर (९२७००८७६४०)