मुंबई, दि. १३ : ‘आरटीई’ २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती. त्यानुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची निवड यादी दि. १४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येत असून लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश घेण्यासाठी दि. १४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत कालावधी देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी दिली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार सन २०२५-२६ या वर्षासाठी दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) यामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
‘आरटीई’ २५ टक्के लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करण्यात येईल. तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला अशी नोंद करण्यात येऊन पालकांकडून हमीपत्र भरुन घेण्यात येईल. काही पालक दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात येतील. यासाठी बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा. तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. खोटी / चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी / चुकीची माहिती भरुन दिशाभूल केल्या प्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
२५ टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबविली जात असून प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. सबब, पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात येत आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी मनपा/ नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे (depmah2@gmail.com), आयुक्त शिक्षण, पुणे (educommoffice@gmail.com) यांच्याकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी, असेही शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी कळविले आहे.
0000
बी.सी.झंवर/विसंअ/