शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध – मंत्री डॉ. उदय सामंत

जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन

  • शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे
  • एमआयडीसीच्या रखडलेल्या समस्या सोडवू
  • जिल्ह्यात नवीन उद्योग आणले जातील

परभणी, दि. १४ (जिमाका) : शेतकरी हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो अन्नदाता आहे. त्यांना काही कमी पडू दिले जाणार नाही. बळीराजाच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), परभणी आणि संजीवनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचे उदघाटन मंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार राजेश विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, संजीवनी मित्र मंडळाचे आनंद भरोसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक उपस्थित होते.

अतिशय उत्कृष्ट रितीने कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे, असे कौतुक करुन मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, देशाने दखल घ्यावी, असे हे प्रदर्शन आहे. कृषी प्रदर्शनाचा हा उपक्रम पुढेही असाच सुरु ठेवावा. शेतकऱ्यांसाठी अशी प्रदर्शने उपयुक्त ठरतात. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी. शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करु नये. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. सोयबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. संरक्षण विभागाला सुमारे एक लाख टन कापसाची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कापूस खरेदी करुन त्यांना दिला जाईल. जिल्ह्यातील एमआयडीसीचे रखडलेले प्रश्न उद्योग मंत्री या नात्याने निश्चितपणे सोडविण्यात येतील, यासाठी पुढील पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल. उद्योगासंबंधी ज्या काही समस्या आहेत, त्या सोडविल्या जातील. जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल. रोजगारासाठी जिल्ह्यातून होणारे स्थलांतर थांबविले जाईल. जमलेल्या महिलांना ग्वाही देताना डॉ. सामंत म्हणाले की, राज्य शासन लाडकी  बहीण योजना बंद करणार नाही.

प्रारंभी आमदार राजेश विटेकर आणि आनंद भरोसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी  मान्यवरांच्या हस्ते कृषी संजीवनी प्रगतीशील शेतकरी पुरस्कार-2025 ने जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. चंद्रकांत वरपुडकर, भूषण रेंगे, विजय कोल्हे, अशोक देशमाने, शिवाजीराव खटींग अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. स्वयंसहायता बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील शिल्पा देशमुख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रारंभी मंत्री डॉ. सामंत यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी दिल्या. परभणी शहरातील वसमत रोड येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणात भरविण्यात आलेले भव्य कृषी प्रदर्शन 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे, याचा शेतकरी, नागरिक, विद्यार्थी यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

०००