विद्यार्थ्यांनो प्रलोभनांपासून सावध रहा- रुपाली चाकणकर

खरे हिरो ‘राष्ट्रपुरुष’ … रिलस्टार्स नव्हे-अमोल सातोडकर

व्याख्यानः’सायबर गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’

छत्रपती संभाजीनगर,दि.१४(जिमाका):  सायबर विश्व हे आभासी विश्व आहे. या विश्वात अनेक प्रलोभने दिलीजातात. महाविद्यालयीन जीवनात या प्रलोभनांचा मोह पडतो. तेव्हा विद्यार्थ्यांनी या प्रलोभनांपासून सावध रहावे. आपण फसवले जातोय असे वाटताच सायबर पोलिसांची, महाविद्यालयाची आपल्या पालकांची मदत घ्या, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले.

सायबर विश्वात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार होत असतात. त्यात अनेक प्रकारे लोकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार होत असतात. आपल्या जीवनाला दिशा देणारे आपले राष्ट्रपुरुष हेच आपले खरे हिरो असून ‘रिलस्टार्स’ नव्हे, अशा शब्दात सायबर तज्ज्ञ अमोल सातोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

येथील देवगिरी महाविद्यालयात राज्य महिला आयोगाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर गुन्हेगारीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’ या विषयावर व्याख्यान पार पडले.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक तेजनकर हे होते.  सायबर सेलचे प्रमुख अमोल सातोडकर, पोलीस निरीक्षक आनंद झोटे, उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, डॉ.रवि पाटील, डॉ. अपर्णा तावरे, ॲड. रेणुका घुले आदी यावेळी उपस्थित होते.

सातोडकर म्हणाले की, सायबर विश्वात आभासी पद्धतीने आपण रममाण होतो. याचाच फायदा घेऊन येथे फसवणुकीचे प्रकार होत असतात. कोणत्याही प्रकारची फसवणूक वा घोटाळा हा देशविघातक कृत्यांसाठीच पाठबळ ठरतो, म्हणून अशा प्रकारांविरोधात कृती करावयास हवी. सायबर विश्वात जे काही आपण शेअर करतो, अपलोड करतो ते कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे काहीही शेअर करतांना खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारीत आर्थिक फसवणूक, सेक्स्टॉर्शन, ब्लॅकमेल करणे अशा विविध कारणांनी फसवणूक होऊ शकते. त्यात प्रामुख्याने महाविद्यालयीन,अल्पवयीन मुलामुलींची फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक असते. सोशल मीडियावरील फॉलोअर्स, मित्रांची गर्दी असण्यापेक्षा आपल्या वास्तविक जीवनातील आणि खऱ्या मित्रांना प्राधान्य द्या. जीवनात काही चांगले करायचे असेल तर आपल्या राष्ट्रपुरुषांचे चरित्र अभ्यासा. आपले खरे हिरो हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. सोशल मीडियावरील रिलस्टार्स नव्हे.

चाकणकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी सायबर विश्वातला आपला वावर हा अतिशय सावध ठेवावा. आपले शिक्षण आणि करियर यास प्राधान्य द्यावे. आरोग्य चांगले ठेवून आपले शरीर निरोगी ठेवा. आपल्या आयुष्यातील कोणताही निर्णय घेतांना आपल्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा.  आपल्याबाबत फसवणूकीचे प्रकार घडल्यास वा कुणी आपल्याला त्रास देत असल्यास १०९८ अथवा ११२ या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा. पोलीस लगेचच आपल्या मदतीला येतील.देशाचे चांगले नागरीक म्हणून स्वतःला घडवा.  युवक युवतींनी बालविवाह, हुंडा पद्धती सारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

डॉ. अपर्णा तावरे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य तेजनकर यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. प्रियंका पाटील हिने आभार मानले.

०००