मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त : अभिमानास्पद बाब

केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या राजधानीत होणारा मराठी भाषेचा जागर केवळ महाराष्ट्र आणि देशापुरता मर्यादित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांसाठी एक अविस्मरणीय क्षण राहणार आहे.

जगातील प्रत्येक भाषेचा जन्म हा संवादाच्या गरजेतून झाला. मराठी भाषासुद्धा त्याला अपवाद नाही. जिचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर महाराज, “माझा मराठीचा बोलु कौतुके | परि अमृतातेही पैजा जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मेळविन ||” असे म्हणतात.  नुकताच, ह्या मायमराठीचा जागर करणारा व मराठी भाषेचा आदर करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कायमचा कोरला जाईल असा सुवर्णक्षण आपण अनुभवला. तो म्हणजे, आपल्या महाराष्ट्राच्या मातृभाषेला, मराठीला अभिजात भाषेचे स्थान लाभले आहे. हा बहुप्रतीक्षित व ऐतिहासिक निर्णय माय मराठीच्या गौरवात अविस्मरणीय भर घालणारा आहे.

मराठी भाषा ही ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्य झाली म्हणजे नेमके काय झाले? हा प्रश्न अद्यापही अनेकांच्या मनात घर करून बसलेला आहे. अभिजात या शब्दाचा शब्दश: अर्थ उत्तम, उत्कृष्ट किंवा श्रेष्ठ असा अर्थ होतो. ‘अभिजात’ हा शब्द भाषेशी जोडला जाताना आपण असे म्हणू शकतो की, भाषेला लागू असणारे उत्तमतेचे निकष पूर्ण करण्यासाठी जी भाषा दुसऱ्या भाषेवर अवलंबून नसते म्हणजेच स्वयंपूर्ण असते, ज्या भाषेला साधारणपणे दीड ते दोन हजार वर्षांचा इतिहास असतो, प्रत्येक काळात साहित्यनिर्मितीला प्रेरणा व चालना देऊ शकेल एवढी भाषासमृद्धी ज्या भाषेकडे असते, ज्या भाषेत मूलतः विविध प्रकारची उत्तम साहित्यनिर्मिती झालेली असते, ती भाषा म्हणजे अभिजात भाषा होय. या सर्व कसोट्यांवर मराठी भाषा उतरली आहे. एकूणच मराठी भाषेची विपुल साहित्यसमृद्धी लक्षात घेता, अभिजात भाषा म्हणून स्थान मिळणे हा मराठी भाषेचा यथोचित सन्मान आहे. तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा, उत्तमतेचा यामुळे गौरव झाला आहे. श्रेष्ठ मराठी कवी कुसुमाग्रज तर मराठी साहित्याविषयी सहजपणे लिहितात,

“रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी

चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी”

मुळात भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. ज्याप्रमाणे वाहती नदी जशी किनाऱ्यांना केवळ स्पर्श करत नाही तर किनाऱ्यावरील काहीतरी घेऊन पुढे जाते. त्याचप्रमाणे भाषासुद्धा स्थळकाळाला अनुसरून बदलत जाते. हीच भाषेच्या समृद्धीची प्रक्रिया आहे. परकीय आक्रमणांमुळे, व्यापारांमुळे, दळवळणामुळे मराठी भाषादेखील अशीच समृद्ध व संपन्न झाली आहे.

वर्तमानकाळातसुद्धा मराठी भाषेत विपुल साहित्यनिर्मिती होते आहे. अनेक लेखक, लेखिका, कवयित्री, कवी भरभरून व्यक्त होत आहेत. या साऱ्या साहित्यिकांसाठी साहित्य संमेलन म्हणजे एक पर्वणीच असते. दरवर्षी नियमित भरणारे, वैभवशाली साहित्यपरंपरेचा वारसा जतन करणारे मराठी सारस्वतांचे संमेलन साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठच असते. यानिमित्त विविध साहित्यप्रवाह, साहित्यप्रकार अशा अनेक साहित्याशी निगडीत विषयांवर ऊहापोह होतो. विविध साहित्यिक चर्चासत्रे, कवीसंमेलने, गझल मुशायरा याप्रकारच्या विविध सत्रांमधून सहभागी होतात.

या सत्रांमुळे भाषेच्या समृद्धीला गती मिळते. यावर्षी भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली नगरीकडे या संमेलनाचे यजमानपद आहे. दिनांक 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी मा. डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन भरणार आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषेचा जागर मनामनातून होत राहो. हजारो वर्षांपासून जतन केलेल्या अभिजात मराठीच्या अमृतकुंभातील साहित्यअमृताच्या वर्षावात समस्त मराठी रसिक न्हाऊन निघतील याविषयी खात्री आहे.

भैरवी देशपांडे

साहित्यिक व लेखिका