अ. भा. मराठी साहित्य संमेलन आणि खानदेशातील साहित्य परंपरा…

                          

 बोरी, पांझरा, गिरणा                    

 नांदे तापीच्या कुशीत,

 पिक साहित्याचे डुले

 सोनं खान्देश भूमीत…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पालखी देशभर साहित्य पंढरीच्या रुपाने घुमते आहे. शब्द वारकरी आनंदाने सहभागी होताना ज्ञानाची गंगा वाहते आहे, ग्रंथसार भाषा रसाचा बोलीभाषेच्या अमृताने साहित्य समृध्दतेच्या घागरीतून पाझरतो आहे, लेाकवाङ्मयाची दौलत काळाचा महिमा घेऊन आधुनिक साहित्याची दालने खेालत आहे, प्राकृत वाणीच्या इतिहासाची कौतुके ज्ञानबा-तुकोबाच्या गाथेची पारायणे करत आहे, शब्दांची भाषा, लेखनीच्या अंगाने बोलू लागली की, संवेदनांचे काहूर मानवी मनाच्या गाभाऱ्यात भावगर्भ रचनांनी संचयित साहित्य कोशाला संपन्न करते आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांचे बिगुल वाजते. २१ ते २३ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत पार पडत आहे. संयुक्त १९५४ नंतर ७ दशकांचा टप्पा पार पडल्यानंतर पुन्हा दिल्लीवारी साहित्य संमेलनाला होत आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली दरबारी होते आहे आणि खान्देशी साहित्य परंपरेचा भूतकाळ नजरेसमोर उभा राहतेा आहे. माळवा, दायमाबाद, हरप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीनता टिकवून ठेवणाऱ्या खानदेशी संस्कृतीच्या खानदेशात अभीरांची अहिरानी भाषा आपल्या प्रभाव क्षेत्रातील बारा बोलीभाषा मध्यवर्ती अहिरानी, बागलानी, नंदुरबारी, डांगी, नेमाडी, लाडशिक्की, पावरी भिल्ली, भिलाऊ, भावसारी, लेवा पाटीदारी, गुजराऊ, तडवी अशा मौखिक वाङ्मयाच्या सरिता प्रवाहीत ठेवल्या आहेत. या भाषेतील साहित्य परंपरा प्राचीन काळापासूनची अजरामर आहे. पाटणादेवीच्या जंगलातील रहिवास याची साक्ष देतो. वाडे, ता. भडगाव येथील महालिंगदास अहिरराव महाराजांचे अजरामर साहित्य म्हणजे राजनितिवर आधारीत पंचोपाख्यान, सिंहासन बत्तिसी-वेताळ आणि विक्रमाची कथा, पंचतंत्र-राजपुत्रांसाठीचा अभ्यासक्रम, शालिहोत्र-अश्वचिकित्सा म्हणजे प्राणीशास्त्रावरील पाहिला ग्रंथ, चाणक्यनिती-चाणक्याची राजनिती आणि अर्थशास्त्र या पाच महान ग्रंथांचे लेखन होय. महालिंगदास महाराजांच्या पंचोपाख्यानाचा आधार घेत स्वराज्याचे आज्ञापत्र राज्यघटना लिहिल्याचे शिखर शिंगणापूरचा शंभो महादेव या पुस्तकात रा. चि. ढेरे नमूद करतात. गणिततज्ञ, खगोल शास्त्रज्ञ भास्कराचार्य यांचा चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे निवास राहिलेला आहे.

 

”या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे…

कोणती पुण्य येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे”……

यांसारख्या अजरामर रचना बहाल करणारे सांगवी पळासखेडे येथील निसर्गकवी ना. धो. महानोर…

 

”अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर,

आधी हाताले चटके, तवा मिळते भाकर”….

असे जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या कवयित्री, आसोद्याचे माहेर असलेल्या बहिणाबाई चौधरी, धरणगावचा जन्म असलेले बालकवी, भडगावची कर्मभूमी असलेले केशवसुत, बहादरपूरचे बा. सी. मर्ढेकर, अमळनेरची कर्मभूमी असलेले मातृहृदयी साने गुरूजी, शेंदुर्णीचे दु.आ. तिवारी, अंतापुरचे कवी कमलनयन, शिरपुरच्या स्मिता पाटील, थाळनेरचे आजोळ असलेल्या लता मंगेशकर, मालेगावचे दा.गो.बोरसे, पिंपळनेरचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, चाळीसगावचे रहिवासी तथा जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस यांच्याप्रमाणेच सामान्य माणसांचे असामान्य लेखन जगातील विद्वानांनी संदर्भ म्हणून वापरावे एवढी समृद्धी तथा प्रगल्भता येथील साहित्यिक विचारवंतांमध्ये ठायीठायी भरलेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राच्यविद्यापंडित, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, कृषी संस्कृती, बुध्दविचार व अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची नव्याने वैचारीक मांडणी करणारे विचारवंत कॉ. शरद पाटील होय. दास शुद्रांची गुलामगिरी, रामायण महाभारतातील वर्ण संघर्ष, जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्व, शिवाजींच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद, स्त्री शुद्रांच्या स्वराज्याचा राजा अशी असंख्य प्रकारची साहित्य संपदा त्यांनी निर्माण करून साहित्य विश्वाला तथा वैचारीक चळवळींना अधिक बळ दिले. श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेत प्राध्यापकाची नोकरी करत असताना कवितेच्या प्रांतात पाऊल टाकणारे पुपाजी आपल्या काव्यप्रतिभेने उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे काव्यसमिक्षक होते. कविता रतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य नामवंत कवींना उजेडात आणण्याचे काम पुपाजींनी केले. जेष्ठ गांधीवादी तथा हिंदी, मराठी साहित्यिक म्हणजे डॉ.मु.ब. शहा होय. कवी नागेश मोगलाईकर, नाट्य कलावंत शरद यादव, मुकुंद धाराशिवकर, राम सुतार, दिपक निकम आणि कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, बालसाहित्य व विनोद लेखन अशा विविध साहित्य प्रकारात मुशाफिरी करणारे प्रा. अनिल सोनार हे नाव धुळ्याच्या वैभवात भर घालणारे आहे. ३८ वर्षाच्या भ्रमंतीनंतर लेखनाची साधने गोळी करत इतिहासकार वि. का. राजवाडे यांचा धुळे शहराशी संबंध आल्यानंतर बराच काळ कार्य केले. राजवाडे संशोधन मंडळात वि. का. राजवाडे यांनी जमविलेल्या असंख्य कागदपत्रांचा दफ्तरखाना आहे. आजही धुळे जिल्हा व खानदेशातील साहित्य व वैचारीक चळवळीची परंपरा मोठ्या तपस्येनंतरही अविरतपणे सुरूच आहे.

बोलीभाषा या मराठीला उपनद्यांसारख्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून मराठीची गंगा समृद्ध होताना दिसते आहे. खान्देशातील लोकवाङ्मय गावोगावी संवर्धित केले जात आहे. अशाच प्रकारची कवणे हळद लावल्यानंतर तेलवण पाडताना, आंघोळ करताना, लग्न लागताना म्हटली जातात. जो मौखिक वाङ्मयाचा मोठा ठेवा आहे. जात्यावर दळण दळताना, उखळात कांडण करताना, घरगुती सामान बनवताना, गोंधळाला व खास करून मरणाच्या देखील ओव्या खानदेशात गायल्या जातात. धुळे जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या आहिराणी भाषेत गप-गफूडा, कोडी, आन्हा, उखाणे, म्हणी, वाकप्रचार, लग्नाची गाणी, जात्यावरील ओव्या, भारुड, गण, गवळण, सणांची गाणी, गौराईचे गाणे, कानबाईचे गाण, गुलाबाईचे गाणे, लावणी, पोवाडा, गद्यगोट, पद्यगोट, लघुगोट, सकी, चुटके, छाप, गद्य चुटका, पद्य चुटका व गोंधळ जागरण, भगताच्या वह्या असा लोकवाङमयाचा साहित्य प्रकार खान्देशातील धुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक व भाषिक उत्कर्षासाठी हातभार लावणारा आहे. भाषा, साहित्य व संस्कृतीची समृध्द परंपरा खानदेशाला लाभली आहे. म्हणून आपण या लिखित, मौखिक व भौतिक साधनांच्या आधारे भाषेचा समृद्ध ठेवा जपून त्यास संवर्धित करण्याची आवश्यकता आहे. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राष्ट्रप्रेम व मानवतावादी विचारांचा समृध्द वारसा जपणाऱ्या खान्देशातील मुल्याधिष्ठित अधिष्ठानाला आपले भविष्यातील संचित माणून जपूया.

अभिजात भाषा म्हणून गणल्या जाणाऱ्या मराठीला समृद्ध करण्यासाठी खानदेशातील साहित्य परंपरा अखिल भारतीय संमेलनात सजावी, नटावी या आशेने पाहते आहे. खान्देशात खूप कमी वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन होत असते. खानदेशातील बोलीभाषा व साहित्याला संमेलनांमध्ये सहभागी करून साहित्यिक दरी दूर करून माणूस म्हणून सर्व भिंती पाडून एकत्रित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची दिशा आखली जावी हीच खानदेशी साहित्य परंपरेची माफक आशा आहे.

०००

  • डॉ. सदाशिव सुर्यवंशी, अध्यक्ष, खानदेश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य, धुळे, भ्रमणध्वनी 9405371313