अहिराणी बोलीचा इतिहास (भाग २)

अहिराणी बोली समृद्ध आहे. पुरातन काळापासून तीला मोठा इतिहास आहे. ती आजही शेतकरी, स्थानिकांमुळे, लोकगीते, अन्य प्रकारे टिकून आहे. तीचा इतिहास, परंपरा आदींचा या भाषेचे अभ्यासक संशोधक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी घेतलेला आढावा, वाचकांना नक्कीच माहितीत भर घालणारा, विचारप्रवर्तक ठरेल…

खानदेशी बोली

१) प्रादेशिक प्रभेद – बागलानी, तप्तांगी, डोगरांगी, वरल्ह्यांगी, खालल्यांगी, नंदुरबारी, जामनेरी / तावडी, दखनी, घाटोयी2) सामाजिक प्रभेद – अहिराणी / खानदेशी,  लेवा पाटीदार,  गुजरी, लोडसिक्की, काटोनी, तडवी, परदेशी, पावरी, महाराऊ  खानदेशात जनमानसात खानदेशी आणि अहिराणी ह्या दोन संकल्पना कधीही नव्हत्या. खानदेशी व अहिराणी हे दोन शब्द अर्थभेदक कधीही ठरले नाहीत. अहिराणी ही खानदेशाची मध्यवर्ती बोली. तिच्या प्रभावाने आजुबाजूच्या प्रदेशातील बोली ह्या त्या प्रदेशाच्या नावाने (प्रादेशिक प्रभेद बागलाणी, घाटोयी, तप्त्यांगी, खालल्यांगी, वरल्ह्यांगी, डोगरांगी, डांगी, जामनेरी इ.) तर जाती, जातीच्या बोली ह्या जाती वा समाजाच्या नावाने (सामाजिक प्रभेद महाराऊ, गुजरी, परदेशी, भिलाऊ, लेवा, पाटीदार, तडवी, इ.) ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र आजही संपूर्ण खानदेशात जनसामान्यात व्यवहार करतांना प्रत्येकजण अहिराणी (खानदेशी) बोलत असला तरी कागदोपत्री, शाळेत नाव दाखल करतांना, जनगणनेच्यावेळी वा कुठलाही फॉर्म भरताना मातृभाषा या रकान्यात ‘मराठी’ हीच मातृभाषा नोंदवितो. (जनगणना अधिकाऱ्यास या बोलीची नोंद घ्यावी असे कधी वाटले नाही. शासनानेही त्या रकान्यात काही बोलींची नावे टाकलेली नाहीत) साधारणतः दोन कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या भू-भगातील लोकांची ही दैनंदिन व्यवहाराची बोली असली तरी आपल्या बोलीविषयी अनास्था, लाज वा ग्राम्यतेचे लक्षण मानने ह्या बाबीमुळे सरकार दरबारी अहिराणी किंवा खानदेशी बोली बोलणारांची खरी संख्या कागदोपत्री आजवरही आलेली नाही.

अहिराणी किंवा खानदेशी बोलीचा उपरोक्त भाषा भूगोल (आधीचा खानदेश जिल्हा, त्यानंतर नासिकचे कळवण, सटाणा, मालेगांव तालुके व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सोयगांव व कन्नड हे तालुक्यातील डोगराखालील खानदेश लगतची गावे) आजवर संशोधकांनी स्विकारला आहे. आता नुकत्याच माझ्या क्षेत्रिय पाहणीतून असे लक्षात आले की ही खानदेशात बोलली जाणारी बोली जशीच्या तशी विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील सुमारे साठ ते सत्तर गांवातून केवळ गवळी समुदायाकडून बोलली जाते. मात्र या लोकांना अहिर वा अहिराणी वा खानदेशी या संकल्पना अद्यापही ज्ञात नाहीत. ते आपल्या या बोलीला गवळी बोली म्हणून संबोधतात. त्यामुळे आता खानदेशी बोलीच्या सामाजिक प्रभेदात गवळी बोली तर प्रादेशिक प्रभेदात वऱ्हाडची अहिराणी म्हणून समावेश करुन सध्याचा भाषा भूगोलाचा विस्तार करावा लागत आहे.

असे असले तरी सोरटी सोमनाथावरील गझनीच्या महंमदाच्या स्वारीनंतर पलायन केलेल्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी देवगीरीला आश्रय घेतला व तेथून त्यांना तामीळनाडूतील मंदिराच्या पौराहित्यासाठी नेले गेले पुढे ते मांसांहारीही बनले व सुताला रंग देण्याच्या व्यवसायातही उतरले. (हा इतिहास के. सी. कृष्णमुर्ती यांनी ‘द मायग्रन्ट सिल्क व्हेव्हर्स ऑफ तामिलनाडू’ या ग्रंथात केला आहे. प्रकाशन फेब्रु. २०१४) त्यांची बोली तेथे सौराष्ट्री म्हणून प्रचलित असून तिच्यात आणि अहिराणीतही बरेच साम्य आढळते. या शिवाय नेपाळच्या नेपाळी बोलीत आणि अहिराणी बोलीतही बरेच साम्य आहे. अधिकचा अभ्यास करुन त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे)

अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि चांदूर बाजार या चार तालुक्यातील मेळघाट अभयारण्याचा मध्य प्रदेशाच्या, अशिरगड किल्ल्यापर्यतचा भागातील वस्तीला असलेले गवळी या जातीच्या लोकांची बोली ही गवळी बोली आहे. या गवळी बोली बोलणारांची संख्या ही सुमारे पन्नास हजाराहून अधिकची आहे. देवगांव, कुकरु, खामगांवसारखी काही गावे ही संपूर्ण गवळी या जातीच्या लोकसंख्येची गावे आहेत. चिखलदरा, सांगोळा, कोहा ढाकण, मोथा, लवादा, देवगांव, धामनगांव गढी, हरीसाल, अंबापाटी, टेंभरु सोजाई, जामली, वस्तापूर, कुलंगणा खुर्द, उपासखेडा, नवाखडा अशाही काही गावांची नावे ही गवळ्यांची वस्ती असलेली गावे सांगता येतील. अभ्यासाअंती असे लक्षत येते की, या सगळ्या गवळ्यांची ही गवळी बोली आणि खानदेशात प्रचलित असलेली अहिराणी बोली ह्या दोन बोली भिन्न वा स्वतंत्र वेगवेगळ्या बोली नसून त्या एकच बोली आहेत. मात्र, खानदेशात ती अहिराणी बोली म्हणून ओळखली जाते तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मेळघाटात ती गवळी बोली म्हणून ओळखली जाते आहे. विशेष बाब ही की आजपर्यंत अहिराणीच्या अभ्यासकांना ज्या प्रमाणे गवळी बोली हे अहिराणीचे वेगळ्या भू-प्रदेशात आढळणारे रुप आहे ही बाब ज्ञात नाही. तशीच गवळी बोलीच्या अभ्यासकांनाही गवळी बोली ही अहिराणी बोलीचेच रुप आहे हे ज्ञात नाही. मात्र शब्दावली, वाक्याची रुपे, विभक्ती प्रत्यय, ही भाषा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासाची सगळी वैशिष्टे ही दोनही बोलीत सारखी आणि एकच आहेत. धारणी, चिखलदरा या भागात या गवळ्यांना अहिराणी हा शब्द ज्ञात नाही. ते आपल्या बोलीला गवळी बोली असेच म्हणतात. हे सारे गवळी लोक कोरकू, कुणबी, गोंड वा कोलामांसोबत राहात असले तरी गवळी बोली ही केवळ गवळी लोकांचीच बोली असून तेच बोलतात. गवळी बोली वर आजवर भाषावैज्ञानिक अभ्यास कुणी मांडल्याचे ज्ञात नाही. भाषा सव्र्व्हेक्षणातही मेळघाटातील या गवळ्ळ्यांच्या बोलीला ग्रिअर्सन पासून आताच्या भारतीय भाषा सर्वेक्षणापर्यंत कुणीही दखल घेतलेली नाही. म्हणजे या मेळघाटात बोलीच्या सर्वेक्षणाचेही आदिवासीप्रमाणे कुपोषण झालेले आढळते.

या गवळ्यांच्या या भागातील आगमनाबाबतच्या काही कथाही मिळतात. कौडीण्यपूरहूर रुक्मीनी आणण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या गवळ्यांच्या लवाजम्यासह विदर्भात कूच केली. त्यांच्या सरंक्षणाच्या दृष्टीने बलदेवानेही गवळी आणि त्यांच्या गुराढोरांसह कूच केली. परतीच्या मार्गावर चांदूर बाजार, अचलपूर सारख्या काळ्या जमिनीवर आपल्या गुरांचे पाय फसतात व गुरांना त्रास होतो हे जाणून त्यांनी तो काळ्या जमिनीचा भाग सोडून टणक जमिनीकडे वाटचाल केली. ते मेळघाट आले. रुक्मिणीला घेवून श्रीकृष्ण व गवळी रातोरात परतलेत. मात्र, काही गवळ्यांना आपल्या गुराढोरांसह, लवाजम्यासह परतने शक्य झाले नाही. शिवाय आपल्या गुरांसाठी चारा असलेले घनदाट जंगल त्यांना आवडले. हे गवळी परत मथुरेला न जात तेथेच राहिलेत. वन्यजीवांकडून आपल्या गुरांचे सरंक्षण करण्याच्यादृष्टिने त्यांनी मातीच्या भिंतीची तटबंदी बांधून गाविलगड किल्ला बांधला. गाविलगड हा गवळ्यांचा किल्ला. पुढेही चिखलदऱ्याहून इंग्रजांनी या गवळ्यांना हुसकावून जंगलात पिटाळले. अशिरगड, नरनाळा आणि गाविलगड ही किल्ले गवळी आपले किल्ले समजतात. अशिरगडची आशादेवी ही त्यांचे कुलदैवत मानतात. ते कृष्णाला आपले पूर्वज मानतात. केवळ बोलीच नव्हे तर त्यांच्या रुढी परंपरा, विवाह विधी, सण उत्सव, हे खानदेशातील अहिराणी भार्षिक लोकांप्रमाणेच आहेत. या विदर्भातील गवळ्यामध्ये खेडके, हेकडे, शेडके, शनवारे, सावडे, गायन, तोटे अशी आडनावे आढळतात. मात्र, अशी आडनावे खानदेशातील अहिराणी भाषकांत आढळत नाहीत. खानेदशातील अहिराणी भाषिक हे विविध जातीचे असून कुणबी, मराठा, सोनार, शिंपी अशा विविध जातीत विभागले गेले आहेत. या गवळ्यांनी आपल्या दुग्धव्यवसायाशी संबंधित जी धार्मिक विधी आजही जपून ठेवलेली आहेत ती खानेदशात नावालाच आढळतात. विदर्भातील हे गवळी गुलाबाई, गौराई, भालदेव, विवाहाची गाणी, जात्यावरची गाणी हे सगळ आजही जपून आहेत. मात्र खानदेशात महत्त्वाचा समजला जाणरा कानबाईचा उत्सव या विदर्भातील गवळी जमातीत आढळत नाही. खानदेशातील या अहिराणी भाषकांप्रमाणे त्यांचा संपर्क बाहेरच्या जगाशी कमी आलेला असल्याने खानदेशीच्या मानाने त्यांच्यात सांस्कृतिक वा भाषिक बदल कमीच आढळतो. आजही हे गवळी मुलाच्या जन्मा नंतर कास्य या धातूची थाळी वाजवितात तर मुलीच्या जन्मा नंतर सूप वाजवितात. या गवळ्याचे महत्वाचे सण वा उत्सव म्हणजे गोकुळाष्टमी आणि दिपावलीची गायगोंदन. आपल्या दुग्ध व्यवसायाशी व कृष्णाशी संबंधित हे विधी ते आजही पाळतांना दिसतात. आपल्या जनावरांची हेटी करुन राहणे हे या गवळ्यात आजही आढळते. मात्र खानदेशात हे प्रमाण कमी झाले आहे. खानदेशाप्रमाणे आखाजीला पित्तर जेवू घालणे, विवाह प्रसंगी पूर्वजाना निवतं देणे हे विदर्भातील गवळ्यात आढळते. खानदेशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक जीवनाशी साधर्म्य राखणारे हे गवळी स्वतःला गवळी, गोपालक, श्रीकृष्णाचे वंशज म्हणत असले तरी ते खानदेशातील अहिराहून वेगळे नाहीत हे अहिराविषयी जाणून घेतल्यावर लक्षात येते. विदर्भतील या गवळी जातीवर इतिहासकारांनी विषेश प्रकाश टाकलेला आढळत नाही.

खानदेशातील बऱ्याच परंपरा या मोडीत निघाल्या, मात्र दुग्धव्यवसायासंबंधीत बऱ्याच परंपरा आजही बोली सोबत या गवळी समाजाने जपून ठेवलेल्या आढळतात. तेही स्वतःला गोपालक समजतात. दोहोचे नाते श्रीकृष्णाशी अन अशिरगड, गावीलगड यांच्याशी आहे. अर्थात यादव, अहिर, गवळी हे एकाच कुलातील.

अहिराणी काल, आज आणि उद्या- अहिराणी ही ऐके काळी खानदेश परिसरातील मुख्य बोली होती. ती व्यवहाराची भाषा होती. अहिरराजे यांची ती प्रमुख बोली. धुळे, नंदूरबार, जळगांव, नासिकचा कळवण, सटाणा, मालेगांव अन छत्रपती संभाजीनगरचा कन्नड व सोयगांव या तालुक्यांचा भाग या परिसरात ती आजही बोलली जाते. या परिसराची लोकसंख्या ही दिड कोटीच्या आसपास आहेच. या शिवाय उर्वरित महाराष्ट्रात आणि गुजरात व मध्यप्रदेशात नोकरी वा व्यापारा निमित्ताने गेलेले सारे खानदेशवासी हे आपल्या घरात अहिराणीच बोलतात. जगाच्या पाठिवर अनेक देशातही खानदेशातील माणूस स्थाईक झालेला आहे. तेथेही तो आपल्या कुटूंबात अहिराणी जपून आहे. पूर्वी अहिराणी बोलणे गावंढळ, ग्राम्यतेचे लक्षण मानले जाई. अलिकडे भाषिक अन प्रादेशिक अस्मिता जोपासली जाऊ लागली आहे. या शिवाय जागतिक स्तरावर विविध विद्यापिठातून बोली भाषेच्या अभ्यासाचे महत्व पटू लागल्याने त्या जतन करण्याकडे, त्यांचे संवर्धन करण्याकडे जगाचा कल वाढू लागला आहे. आजवर प्रमाण भाषांनी बोलींना, बोलीतील शब्दांना दूर ठेवले होते. आता अलिकडे अभ्यासकांना याच बोलीतून प्रमाण भाषा जन्माला येते व बोलींच्या आधारानेच ती वाढते, टिकते हे कळू लागले आहे. त्यामुळे आपली बोली जतन करण्याचा तीचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सामान्य स्तरावरही होऊ लागला आहे.

अलिकडे अहिराणीतून दिनदर्शिका, लग्नपत्रिका, माहिती पत्रके छापली जात आहेत. जे जे मराठीतून असते ते ते आता अहिराणी बोलीतून प्रकाशित होत आहे. सकस वांङमयाचे अहिराणीतून भाषांतरेही होवू लागली आहेत. अहिराणी बोलीचा शब्दकोश, भाषावैज्ञानिक अभ्यास, सुलभ व्याकरण, सचित्र कोश, म्हणी कोश, वाकप्रचार कोश, ओवी कोश अहिराणी बोलीतील  लोकसाहित्य आदी प्रकारचे माझे ग्रंथ प्रकाशित आहेतच. कालऔघात बोली नष्ट होत आहेत असे म्हटले जात असेल तरी जगभर या बोली वाचविण्यासाठीचे प्रयत्न सुरुच आहेत. या बोली वाचवून ठेवण्यात शेतकरी व शेतमजूर यांच मोठा वाटा आहे. हा वर्ग आपली बोली आजी सांभाळून आहे. जगभर बोली वाचविण्याची चळवळ सुरुच आहे. त्या मुळे बोलीच भवितव्य हे उज्वल असेच आहे.

०००

  • डॉ. रमेश सुर्यवंशी, अभ्यासिका‘,

वाणी मंगल कार्यालया समोर, कन्नड

ता. कन्नड जि. औरंगाबाद (महाराष्ट्र) पिन ४३११०३

मोबाईल ०९४२१४३२२१८/८४४६४३२२१८