।। एथ ज्ञान हें उत्तम होये ।। (भाग-२)
ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी‘च्या मध्यमातून धर्म आणि तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहचविले. भक्तिमार्गाला शुद्ध केले. अनासक्तीचा गृहस्थाश्रम हा परमार्थाचा श्रेष्ठ मार्ग दाखविला. भक्तीचा सिद्धान्त प्रस्थापित केला. अशा या थोर ग्रंथाचे हिंदी, संस्कृत, बंगाली, ओरिसा, कन्नड, तेलुगू, तमिळ, इंग्लिश, फ्रेंच, रशियन, चिनी भाषेत अनुवाद झालेले आहेत.
या सर्व प्रवासामध्ये अनेकांनी ‘ज्ञानेश्वरी‘ चे परिशीलन केले. त्यामध्ये भाविक, अभ्यासक अशी अनेक माणसे आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांचे कालखंडाच्या दृष्टीने मुद्रणपूर्व आणि मुद्रणोत्तर असे दोन स्वतंत्र भाग मानता येतात. ‘ज्ञानेश्वरी‘ची मुद्रणपूर्व काळातील वाटचाल ही हस्तलिखीत स्वरूपात पारंपरिक पद्धतीने झाली. या हस्तलिखित पाठांच्या सिद्धनाथ, सच्चिदानंद, एकनाथ आणि पाटंगणकर अशा मुख्यतः चार परंपरा मानल्या जातात.
पुढे ब्रिटिशांच्या आगमनानंतर इ.स. १८४५ मध्ये ‘ज्ञानेश्वरी‘ला मुद्रित स्वरूपात बाळशास्त्री जांभेकर यांनी आणले. त्यानंतर इ.स. १८५४ मध्ये परशुरामतात्या गोडबोले यांनी आपल्या नवनीतमधून ‘ज्ञानेश्वरी‘ चे काही वेचे प्रसिद्ध केले. या वेच्यांमुळे ‘ज्ञानेश्वरी‘ची माहिती झाली, अशी कबुली विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमालेतून दिली आहे. याचा अर्थ इ.स. १८७७ ७८ नंतरच्या काळात ‘ज्ञानेश्वरी‘कडे नवशिक्षीतांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर ‘ज्ञानेश्वरी‘च्या आधुनिक पद्धतीच्या अभ्यासाला चालना मिळाली. अशा या अभ्यासाच्या हजारोंवर नोंदी आहेत. ‘ज्ञानेश्वरी‘चा मुद्रणोत्तर काळात अनेक प्रकारांनी आणि पद्धतींनी अभ्यास झाला आहे. यातील अनेक अभ्यास हे मूलगामी, दिशादर्शक आणि वैशिष्ट्यपूर्ण होते. यातून अभ्यासकांची बुद्धिमत्ता, त्यांचा व्यासंग, कष्ट आणि चिकाटीचा प्रत्यय येतो. या परंपरेत तीन उल्लेखनीय, दिशादर्शक प्रयत्न अहमदनगरच्या परिसरात झाले आहेत.
यातील पहिला प्रयत्न भारद्वाज यांचा होता. शेवगाव जि. अहमदनगर येथील शिवराम एकनाथ भारदे यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या ‘सुधारक‘ मधून ५ डिसेंबर १८९८ ते इ. स. १८९९ या कालावधीत भारद्वाज या नावाने ज्ञानदेवांविषयक लेखमाला लिहिली. ही लेखमाला सोळा लेखांची होती. ‘ज्ञानेश्वरी‘ लिहिणारे ज्ञानदेव आणि अभंग लिहिणारे ज्ञानेश्वर हे भिन्न होते, असा या लेखमालेचा उद्देश होता. भारदे यांच्या मताचा प्रतिवाद श्री. र. भिंगारकर यांनी ‘केसरी‘तून; तर कू. ना. आठल्ये यांनी ‘केरळकोकीळा‘तून प्रतिवाद केला. ही लेखमाला ज्ञानदेवांविषयक अभ्यासात क्रांतिकारक ठरली. भारदे यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्दयांना आजही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, असे मानले जाते. या लेखमालेमुळे ‘ज्ञानेश्वरी‘च्या चिकित्सक अभ्यासाला प्रारंभ झाला.
त्यानंतरचा दुसरा प्रयत्न हा अहमदनगर शहरात झाला. नेवासे येथे ‘ज्ञानेश्वरी‘ची निर्मिती झाली. तेथे अहमदनगरच्या वाङ्योपासक मंडळाने १ एप्रिल १९३४ मध्ये एक साहित्य संमेलन भरवून ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन‘ हाग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाचे नरहर बाळकृष्ण देशमुख हे संपादक होते. १५०३ पृष्ठांचा हा ग्रंथराज दोन भाग, चार खंडात विभागलेला होता. या ग्रंथातून ज्ञानदेवांच्या व्यक्तित्त्वाचे भाषा, साहित्य, समाज, इतिहास, तत्त्वज्ञान, व्याकरण, अध्यात्म, राजकारण, शास्त्र, ज्योतिष अशा अनेक पैलूंतून दर्शन घडविले आहे. याशिवाय ज्ञानदेव आणि ‘ज्ञानेश्वरी‘ विषयक अभ्यासाचे किती पैलू आहेत; याचे दर्शनही घडविले आहे. ज्ञानदेवांविषयक अभ्यासातील नवार्थ दर्शन, अभ्यास आणि चिकित्सेचा ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन‘ने प्रत्यय दिला. भारदेंच्या लेखमालेमुळे ज्ञानदेव व ‘ज्ञानेश्वरी‘ विषयक अभ्यासाच्या चिकित्सेला प्रारंभ झाला; तर ज्ञानदेव आणि ‘ज्ञानेश्वरी‘ विषयक अभ्यास हा किती वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून आणि प्रकारांनी करता येतो, हे दाखविणारा पहिला ग्रंथ म्हणजे ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन‘ होय. मर्यादित साधनांच्या आधारे भाविक आणि अभ्यासकांनी निर्मिलेल्या या ग्रंथात श्रद्धा आणि चिकित्सेचा समन्वय पाहावयाला मिळतो. असा सामूहिक प्रयत्न पूर्वी आणि नंतरही झाला नाही, म्हणून तो अपूर्व ठरला आहे. या ग्रंथाने ज्ञानदेवांविषयक आधुनिक अभ्यासाचा पाया घातला. अशा मुलभूत कार्यामागील ग्रंथनिर्माते आणि त्यातील लेखकांचा द्रष्टेपणा प्रत्ययाला येतो.
अशा या ग्रंथाच्या प्रकाशनार्थ नेवासे येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे ल. रा. पांगारकर हे अध्यक्ष; तर सरदार नारायणराव यशवंतराव मिरीकर हे स्वागताध्यक्ष होते. या संमेलनात ज्ञानेश्वर विद्यापीठाचे कार्य करण्याकरिता सरदार मिरीकर, त्र्यंबक गंगाधर धनेश्वर, अ. बा. रसाळ यांची समिती नेमली गेली. आजवर ज्ञानेश्वर विद्यापीठ काही झाले नाही; पण ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन‘ची मी नव्याने संपादित केलेली नवी आवृत्ती लवकरच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित होणार आहे.
त्यानंतर आणखी एक उल्लेखनीय प्रयत्न नेवासा येथे झाला. ज्ञानदेव आणि त्यांचा कालपट उलगडण्यासाठी नेवासा येथील लाडमोड टेकाडावर उत्खनन व्हावे, अशी तत्कालीन मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांची इच्छा होती. या इच्छेला पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि पुरातत्त्व विभागाच्या पश्चिम मंडळाचे तत्कालीन अधिकारी एम. एन. देशपांडे यांच्यामुळे चालना मिळाली. हे उत्खनन सुरू होण्यापूर्वी डॉ. हं. धी. सांकलिया आणि डॉ. इरावती कर्वे यांनी प्रवरा खोऱ्याची पाहणी केली. त्यानंतर नेवासा येथे लाडमोड टेकडावर १९५४ मध्ये उत्खनन सुरू झाले. त्याचा अहवाल ऑगस्ट १९६० मध्ये From History To Pre-History at Nevasa या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामध्ये नेवासा गावाच्या इतिहासापासून प्रागैतिहासिक काळातील शोध येतो.
नेवासा परिसरात प्रागैतिहासिक काळापासून म्हणजे दीड लाख वर्षांपासून मानवी अस्तित्व आहे. भटक्या मानवाने नेवासा येथील लाडमोड टेकाडावर इ.स.पूर्व १५०० म्हणजे ताम्रपाषणयुगीन काळात पहिली वस्ती केली. त्यानंतर नेवाश्याच्या सातवाहन काळातील भरभराटीच्या, जागतिक व्यापारी मार्गावरील वस्तीच्या खुणा सापडल्या. त्यानंतर यादव, बहामनी, शिवकाळ, पेशवाई आणि ब्रिटीश अशा काळात नेवासा गावाची वाटचाल झाली. या उत्खननाने नेवासा येथील मानवाच्या अन्नाच्या शोधात भटकण्यापासून ते नागरीकरणापर्यंतच्या अवस्था स्पष्ट केल्या आहेत. नेवासा येथे अनेकप्रकारचे व्यवसायिक होते. व्यापारी मालाची देवाणघेवाण चालायची. तेथे मणी, बांगड्या, शिंपले, काच, हस्तिदंती वस्तू निर्माण होत. धान्य व्यापाऱ्याला धानिक, जलयंत्र चालावणाऱ्याला ओद यांत्रिक, सुगंधी पदार्थांच्या व्यापाऱ्याला गांधीक म्हणायचे. येथे सुवर्णकार, सेलवढकी (पाथरवट), कुलरिक (कुंभार) आदी व्यावसायिक होते. त्यांचे व्यवसायएकमेकांवर अवलंबून असल्यामुळे ते एकसंघ असायचे. विविध व्यवसायांमुळे, व्यापारामुळे नेवाश्यातील लोकांचे जीवनमान, राहणीमान उंचावले होते. त्याचा परिणाम म्हणून याकाळातील नेवासा येथील बांधकामाच्या दर्जात वाढ झालेली दिसते.
‘ज्ञानेश्वरी‘च्या परिशीलनातील हे तीन उल्लेखनीय प्रयत्न अहमदनगरच्या परिसरात झाले आहेत. यातील उत्खननाचा ‘ज्ञानेश्वरी‘शी काय अनुबंध? असा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. या उत्खननाचा ‘ज्ञानेश्वरी‘ तील ‘त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोशक्षेत्र। जेथ जगाचें जीवसूत्र। श्रीमहालया असे ।।‘ (१८.१८०३) या ओवीशी अनुबंध आहे. या ओवीची भाषा, व्याकरण, पाठभेद आदींतून अर्थनिश्चीती करण्याचाही प्रयत्न झाला. या ओवीतील ‘अनादि‘ या शब्दाचा पुरातत्वीय शोध दीड लाख वर्षांपर्यंत जातो. हे एक उदाहरण म्हणता येईल, पण अशा साहित्य, धर्म आणि विज्ञानाच्या शोधातून हाती येणारे ज्ञान हे अपूर्व ठरले आहे. त्याचवेळी, या पुरातत्त्वीय शोधातून हाती आलेल्या तथ्यांचे पुढे काय झाले ? भारदे यांच्या प्रश्नांना कितपत उत्तरे मिळाली ? ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन‘ने घातलेला ज्ञानदेवांविषयक आधुनिक अभ्यासाचा पाया कितपत विस्तारला ? असे अनेक प्रश्न आणि त्यांचे शोधही अनुत्तरीत राहतात.
ज्ञान परंपरेत श्रद्धा – चिकित्सा, भावना बुद्धी अशी कितीतरी द्वंद्वे होती, आहेत आणि राहतील. त्यांचे उल्लेख – अनुल्लेख, त्यांचे समर्थक विरोधक अशा सर्व मत मतांतरांमध्ये आजवरच्या या ज्ञानव्यवहाराचे स्मरण – विस्मरण झाले तर ? तर हा ज्ञानव्यवहार उत्तम राहील का ? म्हणून एक लक्षात घेतले पाहिजे की; ज्ञानदेव, ‘ज्ञानेश्वरी‘ आणि त्यानंतरच्या भाविक, अभ्यासकांच्या प्रयत्नांतून निर्मिलेले हे ज्ञान ‘उत्तम होये‘, त्याला सर्वोत्तम करण्याची जबाबदारी आपली आहे. हे विसरून चालणार नाही.
०००
- प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, ज्ञानेश्वरनगर, पो. भेंडे ता. नेवासा. जि. अहिल्यानगर – ९४०४९८०३२४