केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हे वृत्त वाचल्यावर अमराठी कुटुंबातला असूनही मला अतिशय आनंद झाला. कारण अमराठी असूनही माझी वाणी आणि लेखणी या दोघोवर माय मराठी प्रसन्न आहे. ती कशी काय? याच्या तपशीलात जाणार नाही पण आनंदाची अनुभुती मन प्रफुल्लीत करणारी आहे. मात्र सोबतच मराठीला खूप उशिरा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणुन खूप थोडे वाईटही वाटले. कारण हजारो वर्षापासूनचा इतिहास संभाळणारी जगात 10 व्या आणि भारतात 3 –या क्रमांकावर असणारी आणि मानवी जीवनाच्या विविध क्षेत्राशी सबंधीत मौलिक साहित्य पसरवणारी मराठी भाषा अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा मिळविण्यापासून अनेक वर्ष वंचित राहिली. तामिळ भाषेला इ.स.2000 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण मराठीला सर्व निकष पूर्ण करण्याची क्षमता असूनही हा दर्जा मिळविण्यासाठी इ.स.2024 पर्यंत म्हणजे तब्बल 20 वर्षे वाट पहावी लागली हे दुदैवच म्हणावे लागेल. ‘देर आए दुरुस्त आए’ या हिंदी म्हणीप्रमाणे समाधान मानण्यास हरकत नाही.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे सिद्ध झाले की, ही प्राचीन भाषा आहे. या भाषेत अभिजात व दर्जेदार साहित्याची निर्मिती झाली आहे. लिळाचरित्र, विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी, गाथा सप्तशती, तुकारामाची गाथा आणि इतर संत वाङमयाने समृद्ध असे साहित्य मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचा वेध घेणारे आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व वैज्ञानिक क्षेत्रातही मौलिक साहित्याची निर्मिती मराठीतून झालेली आहे. मराठी भाषेला स्वतंत्र अस्तित्व असून तिचे स्वत:चे व्याकरण आहे. साहित्यिक मुल्ये व परंपरेचा मोठा वारसा या भाषेला लाभला आहे. या सर्व बाबी आज अधिकृतरित्या मान्य झालेल्या आहेत. म्हणून मराठी भाषेच्या इतिहासात सुवर्णांक्षराने नोंद करणारा हा क्षण आहे. समस्त मराठी बांधव यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. कारण आपल्यापैकी अनेकांनी या क्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष केला आहे.
भाषा ही पिढ्या न पिढ्या लोकजीवनाचा, सामाजिक मुल्ये व विचारांचा आणि संस्कृतीचा भाग असते. सांस्कृतिक जीवनाची अभिव्यक्ती भाषेच्या माध्यमातून होत असते. ज्यामुळे एखाद्या भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो तेव्हा तिच्या साहित्यिक परंपरेचा गौरव असतो. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर त्या भाषेला शासकीय पाठबळ प्राप्त होते. त्यामुळे संशोधन आणि अध्ययनाला अधिक वाव मिळतो. भाषेचे संवर्धन व तिच्या प्रचार – प्रसाराला नवे आयाम प्राप्त होतात. भाषेच्या विकासाला एक गती प्राप्त होऊन त्या भाषेला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त होते.
अभिजात हा शब्दच मुळात श्रेष्ठत्व दर्शविणारा आणि वर्चस्व वृत्तीचा सूचक मानला जातो. म्हणून मराठी भाषेचा फार मोठा विजय आहे. भविष्यातील आव्हाने पेलण्याची क्षमता व्दिगुणित होणार आणि मराठीची विजयी पताका आता देशभर मिरविणार यात शंका नाही.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळणार आणि नवी ध्येये गाठण्याकरीता त्याचा कसा उपयोग होणार हे खालील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल.
मराठी भाषा आणि बोलींचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल. परिणामी नवीन संशोधन आणि साहित्यसंग्रह यांना चालना मिळेल.
भारतातील 450 विद्यापीठातून मराठी भाषेचे अध्यापन स्थापन करता येईल व त्यातून मराठी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध केली जाऊ शकेल.
मराठीतील प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करण्यास सुरुवात होईल. राज्यातील 12 हजार ग्रंथालये सशक्त होतील. त्यांची दुरवस्था संपेल.
मराठी भाषा जपण्यासाठी, तिच्या उत्कर्षासाठी आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती व विद्यार्थी यांना मोठी मदत मिळू शकेल.
अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेत काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल.
अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषांना दिला जातो. त्या भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान दिले जाते.
मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर इतके सगळे फायदे आता मराठी भाषा व मराठी माणसाला मिळणार आहेत. पण ही तर सुरवात आहे. आपल्याला नवी ध्येये गाठण्याची आणि नवी नवी क्षितीजे पादाक्रांत करण्याची दिशा मिळाली आहे. संधीही उपलब्ध झाली आहे, पण या संधीच सोनं करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. आता गरज आहे. मराठी भाषेला तिच्या पर्वाचा उत्सव साजरा करण्याची आणि तिच्या उज्वल भविष्यासाठी कसोशीने उभे राहण्याची.
आज मराठी भाषेची काय स्थिती आहे ते लपून राहिलेले नाही. त्याची चर्चा करणार नाही पण एक इशारा द्यावासा वाटतो की हीच स्थिती जर कायम राहिली तर अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही काहीच उपयोग होणार नाही.
मराठीला उर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी मराठी माध्यमांच्या शाळा जगणे अत्यंत आवश्यक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. त्यासाठी शासन, समाज, संस्थाचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांना जबाबदारीच्या भावनेने प्रामाणिक प्रयत्न करावे, लागतील याबाबत दुमत असू शकत नाही.
०००
- प्रा. शेख हाशम, 9372028943