गदिमा : शब्दसृष्टीचे ईश्वर  

नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर यांच्याबद्दल प्रकाशझोत टाकणारा प्रा. डॉ. मंजिरी महेंद्र कुलकर्णी यांचा लेख… 

            आता वंदू कवीश्वर

ते शब्दसृष्टीचे ईश्वर

असे समर्थ रामदासांनी कवींच्या बाबतीत म्हटलेले आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो ते कविवर्य गजानन दिगंबर उर्फ ग. दि. माडगूळकर हे खरोखरच शब्दसृष्टीचे ईश्वर होते. त्यांना शब्दांचे अक्षरशः वरदान होते. त्यांना एकदा एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता की “अण्णा, तुम्हाला असे अचूक, समर्पक आणि चपखल असे शब्द त्या त्या ठिकाणी कसे सुचतात ?” त्यावेळी अण्णा म्हणाले होते, “मला स्वत:लाही त्याबद्दल आश्चर्य वाटते. मात्र माझ्यासमोर शब्द अक्षरश: फेर धरून नाचतात आणि ‘मला घ्या मला घ्या, माझा कवितेमध्ये उपयोग करा’ असे जणू म्हणतात”. इतकी शब्दांवर अण्णांची हुकमत होती.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात माडगूळ नावाचे गाव आहे. ते अण्णांचे गाव. आजही तेथे अण्णांच्या आठवणी सांगणारे काहीजण भेटतात. अण्णा त्यांच्या शेतामध्ये बसून शब्दसाधना करीत असत. त्या ठिकाणाला बामणाचा पत्रा असे म्हटले जाते. ते बामणाचा पत्रा हे ठिकाण आजही आपल्याला तेथे पहायला मिळते.

अण्णा हे स्वातंत्र्यसैनिक. महात्मा गांधीजींच्या आदेशाने ज्यांनी स्वातंत्र्ययुद्धात त्यावेळी उडी घेतली, त्यामध्ये अण्णा अग्रेसर होते. त्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात कलावंतांनी ठिकठिकाणी मेळे सुरू केले होते. या मेळ्यांमध्ये कथानक असे. तसेच ते कथानक विविध गीतांनी सजवलेली असे. स्वातंत्र्ययुद्ध, समाजासमोरचे प्रश्न, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले प्रतिसरकार, ब्रिटिशांच्या दंडुकेशाहीचा आणि समाजातील सावकारशाहीचा बिमोड असे अनेक विषय या गीतांमधून मांडले जात असत.

काँग्रेस सेवादलाच्या अनेक बैठका सांगली जिल्ह्यात (त्यावेळचा सातारा जिल्हा) त्यावेळी होत असत. विशेषतः आटपाडी, कुंडलमध्ये अशा बैठका सातत्याने होत असत. कारण कुंडल हे त्यावेळी औंध संस्थानमध्ये होते. त्या संस्थाचे अधिपती श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी आणि त्यांचे चिरंजीव बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांचा स्वातंत्र्ययुद्धाला पूर्ण पाठिंबा होता. क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड, शाहीर शंकरराव निकम यांच्यासोबतीने अण्णा स्वातंत्र्य सैनिकांच्या अनेक बैठकांना हजर असत.. पूज्य साने गुरुजीही अशा बैठकांसाठी यायचे आणि त्यावेळी सेवादलाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करायचे. अण्णा अनेक स्फूर्तीदायक अशी गीते रचत असत. त्या गीतांचे गायन त्यावेळी अतिशय प्रसिद्ध असलेल्या मेळ्यांमध्ये आणि काँग्रेस सेवादलाच्या बैठकांमध्ये आंदोलनांमध्ये होत असे. त्या गीतांमुळे स्वातंत्र्यसैनिकांना प्रेम मिळत असे.

अण्णांनी नंतर मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन तसेच पटकथालेखन सुरू केले. अतिशय भावमधुर अशी गीते अण्णांनी लिहिलेली आहेत. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, हे गीत आजही म्हणजे जवळजवळ 60 ते 65 वर्षानंतरही लोकप्रिय आहे. तमाशाप्रधान, सामाजिक समस्याप्रधान किंवा संतांच्या जीवनावरचे चित्रपट यासाठी त्यांनी लिहिलेल्या गीतांनाही रसिकांची उदंड पसंती मिळाली.

तमाशाप्रधान चित्रपटातही अण्णांनी अनेक सुंदर अशा लावण्या लिहिल्या की त्या आजही लोकांच्या आठवणीत आहेत. ‘ऐन दुपारी यमुनातीरी, खोडी कुणी काढली, बाई माझी करंगळी मोडली’, ‘बाई मी पतंग उडवीत होते’ किंवा ‘काठेवाडी घोड्यावरती’ अशा त्यांच्या अनेक लावण्या गाजलेल्या होत्या. त्याचवेळी अतिशय नितांत सुंदर आणि समाजाचे उद्बोधन करणारी गीतेही त्यांनी चित्रपटांसाठी तसेच नाटकांसाठीही लिहिली होती.

प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राजा परांजपे यांनी तयार केलेल्या अनेक चित्रपटांचे पटकथा, संवाद आणि गीतलेखन अण्णांनी केले होते. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील त्यांची सगळी गाणी आजच्या भाषेत सांगायचे तर अक्षरशः हिट झाली होती. ‘तुला पाहते रे तुला पाहते रे, जरी आंधळी मी तुला पाहते रे’, ‘जग हे बंदीशाळा’, ‘थकले रे नंदलाला’ अशी त्या चित्रपटातील गीते अक्षरश महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यावेळी गाजत होती. आजही त्या गीतांची गोडी आहे. अनेक संतांच्या जीवन चरित्रावरील चित्रपटांसाठी अण्णांनी गीते लिहिली आणि तीही तेवढीच मधुर आहेत. संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली ‘उठ पंढरीच्या राजा, वाढवेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला’, तसेच समचरण सुंदर, कासे ल्याला पितांबर’ ही गीते अतिशय लोकप्रिय झाली होती. संत दामाजीपंत यांच्या जीवनावरील चित्रपटात गदिमांनी लिहिलेले ‘निजरूप दाखवा हो, हरिदर्शनासी याहो’ हे गीतही असेच गाजले होते.

गदिमांनी अनेक लघुनिबंध लिहिले आहेत. विशेषतः हस्ताचा पाऊस, जांभळाचे दिवस अशी त्यांची लघु निबंधांची पुस्तके अतिशय प्रसिद्ध आहेत. अतिशय सहज सोपी शैली आणि लोकांना समजेल असे लेखन हे त्यांच्या साहित्याचे सगळ्यात प्रमुख वैशिष्ठ्य आहे. ते नेहमी असे म्हणायचे की माझे लेखन हे सर्वसामान्य लोकांना कळले पाहिजे. केवळ विद्वान किंवा खूप शिकलेल्या लोकांसाठीच नव्हे; तर अगदी खेड्यापाड्यातील सामान्य लोकांसाठी मला लिहायचे आहे.

अण्णांवर लहानपणापासून कीर्तन, तमाशा, भजन, प्रवचन यांचा मोठा प्रभाव झाला होता. संत साहित्याचे त्यांनी उदंड वाचन केले होते. संत ज्ञानेश्वर, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत एकनाथ, संत रामदास अशा संतांच्या साहित्याचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता. उत्तर भारतातील प्रसिद्ध संत कबीर, तुलसीदास, सूरदास आणि मीराबाई यांच्या साहित्याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. साहजिकच त्यांच्या कवितेवर या सर्वांच्या प्रतिमासृष्टीचा आणि प्रतिभेचाही निश्चितच परिणाम झालेला आहे. साहजिकच त्यांची शब्दकळाही त्यामुळे अतिशय ओघवती आणि समृद्ध अशी बनलेली होती.

1952 च्या दरम्यान अण्णांच्या साहित्यिक जीवनात एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आला. तो टप्पा म्हणजे गीत रामायण महाकाव्य. या गीत रामायणाने अफाट लोकप्रियता मिळवली. या गीत रामायणामधील अनेक गाणी ही आठ नऊ कडव्यांचीसुद्धा आहेत. प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे गायन आणि गदिमांची शब्दसंपत्ती यामुळे गीतरामायण हे महाकाव्य अक्षरशः प्रचंड लोकप्रिय झाले. त्यावेळी आकाशवाणीच्या पुणे आणि मुंबई या केंद्रावरून या गीत रामायणाचे कार्यक्रम प्रथम प्रसारित झाले होते. त्याची ठराविक वेळ असायची. पहिल्या दोन-तीन दिवसातच या गीत रामायणाबद्दल लोकांना श्रद्धा आणि प्रेम वाटू लागले. तेव्हा रेडिओ फार कमी होते. त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या एखाद्या घरात रेडिओ असे. त्या घरात आसपासचे लोक तिथे जमायचे आणि त्या रेडिओची अक्षरशः फुले वाहून आणि त्याच्यासमोर उदबत्ती लावून पूजा करायचे. मग गीत रामायण – ऐकायचे. म्हणजे लोकांनी गदिमांच्या या महाकाव्यावर किती प्रेम केले, किती श्रद्धा ठेवली हे आपल्याला यावरून कळून येईल.

गदिमांनी विपुल लेखन केले आहे. कथा, कविता, नाटक, चित्रपट कथा त्यांनी अनेक लिहिल्या. परंतु असे म्हणतात की गदिमांनी फक्त गीत रामायण जरी लिहिले असते तरीसुद्धा त्यांची कीर्ती दिगंत झाली असती. गीत रामायणामध्ये गदिमांनी अनेक ठिकाणी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. वनवासात असताना अयोध्येचा राजा भरत हा प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी येतो. त्यावेळी त्याचे दुःख दूर करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी त्याला अतिशय हळुवार अशा शब्दात उपदेश केला. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हेच ते प्रसिद्ध गीत आहे. गीत रामायणातील अनेक गीते आजही लोकप्रिय आहेत. आजही त्या गीतांचे सातत्याने स्वतंत्र कार्यक्रम होतात. गदिमांच्या या गीतरामायणामुळे त्यांना आधुनिक वाल्मिकी अशी पदवी मिळाली आणि ती सार्थ अशी आहे.

–        प्रा. डॉ. मंजिरी महेंद्र कुलकर्णी