लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी – एक अभिमानास्पद वारसा

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती एक संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी” हे वाक्य उच्चारताना हृदय अभिमानाने भरून येते, कारण ही भाषा संत, साहित्यिक, योद्धे आणि समाजसुधारकांनी समृद्ध केलेली आहे.

महाराष्ट्राच्या साहित्यपरंपरेचा अभिमान :

“बोलतो मी मराठी!” हे केवळ वाक्य नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा गर्जनाट्य उद्घोष आहे. ही भाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर संतांचा अभंग, शाहिरांचा पोवाडा, कीर्तनाची गोडी, बखरींचा इतिहास, नाटकाची रंगत आणि साहित्याचा अमूल्य ठेवा या साऱ्यांचे संचित आहे. मराठी भाषेचा हा प्रवास हजारो वर्षांचा आहे, आणि आजही ती तितक्याच जोमाने पुढे चालत आहे.

मराठी भाषेचा प्राचीन वारसा:

मराठी भाषा ९व्या-१०व्या शतकापासून लेखी स्वरूपात आढळते. शिलालेख, ताम्रपट, आणि संतसाहित्य हे याचे जिवंत पुरावे आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी भाषेला भावनिक आणि तात्त्विक खोलवर रुजवले, तर शाहिरांनी तिला जोश आणि चैतन्य दिले. शिलाहार आणि यादव काळातील शिलालेख: यामध्ये मराठीचा लिखित वापर दिसतो.

संत साहित्य

ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, अमृतानुभव यांसारख्या ग्रंथांनी भाषा लोकांपर्यंत पोहोचवली. शिवकालीन पत्रव्यवहार: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी प्रशासनाची भाषा बनली. शाहीर, भारूड आणि लोकसाहित्याचा ठेवा: मराठी लोकसाहित्य हे जनसामान्यांच्या भावना व्यक्त करणारे माध्यम आहे. शाहीर तुकडोजी महाराज, शाहीर रामजोशी आणि अनंत फंदी यांचे पोवाडे

तमाशा आणि लावणीच्या माध्यमातून लोकजागृती करणारी परंपरा

भारूड, कीर्तन, गोंधळ, गवळण, ओव्या यांसारखी विविध लोकसाहित्याची रूपे हे साहित्य केवळ करमणुकीसाठी नव्हे, तर समाजप्रबोधन, राजकीय जाणीव आणि सांस्कृतिक ओळख प्रस्थापित करण्यासाठी वापरले गेले.

नाट्यसृष्टी आणि कथा-कादंबऱ्यांचा सुवर्णकाळ नाट्यपरंपरा मराठी नाट्यसृष्टीला विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये “सीता स्वयंवर” या नाटकाने प्रारंभ केला. पुढे, केशवराव भोसले, बालगंधर्व, गणपतराव जोशी, आणि पु. ल. देशपांडे यांनी नाटकाला नवा सन्मान मिळवून दिला.

काही अजरामर नाटके

संगीत नाटक: “संगीत शारदा”, “संगीत सौभद्र”, “संगीत मानापमान”

सामाजिक नाटक: “नटसम्राट”, “तो मी नव्हेच”, “संन्यस्त खड्ग”

विनोदी नाटक: “वाऱ्यावरची वरात”, “तुझे आहे तुजपाशी”

कथा आणि कादंबऱ्या :

हरिभाऊ आपटे: “पण लक्षात कोण घेतो?” (सामाजिक कादंबरी)

वि. स. खांडेकर: “ययाती” (ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कादंबरी)

शिवाजी सावंत: “मृत्युंजय” (महाभारतातील कर्णावर आधारित कादंबरी)

पु. ल. देशपांडे: “बटाट्याची चाळ”, “व्यक्ती आणि वल्ली” (विनोदी साहित्य)

दया पवार, लक्ष्मण माने, नामदेव ढसाळ: दलित साहित्याचे नवे प्रवाह

समकालीन मराठी साहित्य आणि डिजिटल क्रांती

साहित्य आता पुस्तकापुरते मर्यादित राहिले नाही.

ब्लॉग, पॉडकास्ट, ऑडिओबुक, ई-बुक्स यामधून नवी पिढी मराठीत लेखन करत आहे.

“बोलतो मी मराठी” हा केवळ घोष नाही, तर महाराष्ट्राच्या अभिमानाची साक्ष आहे. मराठी भाषा आणि साहित्य हे संस्कृतीचा आत्मा, इतिहासाचा दस्तऐवज आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. आपली भाषा, आपली संस्कृती जपणं ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे. आपण मराठीत वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे आणि बोलले पाहिजे – कारण, जेव्हा मराठी टिकेल, तेव्हाच महाराष्ट्राचा आत्मा जिवंत राहील!

मराठी भाषेचा ऐतिहासिक ठेवा :

मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून झाला असून तिचे अस्तित्व हजारो वर्षांपासून टिकून आहे. चालुक्य, यादव आणि पेशवे काळात मराठीत अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ आणि काव्यसंग्रह रचले गेले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांनी या भाषेत भक्तीची गंगा वाहवली, तर शाहिरी परंपरेतून लढवय्या इतिहास रेखाटला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता दिली आणि तिचा विस्तार केला.

साहित्य, कला आणि लोकसंस्कृती :

मराठी भाषा केवळ लिखित ग्रंथापुरती सीमित नाही, तर ती लोकसंस्कृतीतही खोलवर रुजली आहे. अभंग, ओवी, भारुड, लावणी, गोंधळ, गजर ही महाराष्ट्राच्या मातीतून उमललेली लोककला आजही मराठी संस्कृतीला समृद्ध करत आहे. कालिदास, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत यांसारख्या लेखकांनी मराठी साहित्याला नवे आयाम दिले.

मराठीचा अभिमान आणि जबाबदारी :

मराठी भाषेचा अभिमान बाळगणं ही फक्त भावनिक बाब नसून ती जबाबदारी आहे. तिच्या संवर्धनासाठी मराठी माध्यमातून शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, अधिकाधिक मराठीत लेखन-वाचन करावे आणि पुढच्या पिढीपर्यंत ही भाषा सन्मानाने पोहोचवावी.

“बोलू मराठी, लिहू मराठी, टिकवू मराठी!”

आजच्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर आपली अस्मिता कायम राहील. म्हणूनच, आपण सर्वांनी ठरवूया – “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी!”

शेवटी म्हणावं वाटतं..

शब्दांचा सोहळा, संस्कृतीचा उत्सव!

शब्दांच्या गंधाने भारलेले, साहित्यात न्हालेले,

मराठी मातीचे सोने, आज पुन्हा नटलेले!

 

संतांचे अभंग इथे, ओवींचे गीत झाले,

शाहीरांचे पोवाडे, स्वराज्याचे रक्त झाले.

नाट्याचे पडदे उघडले, हास्यकल्लोळ फुलला,

कादंबऱ्यांच्या पानांतून, काळच जणू रंगला!

 

शब्दांमध्ये इतिहास, शब्दांमध्ये संस्कृती,

साहित्याच्या मांदियाळीत, महाराष्ट्राची कीर्ती!

लेखक, कवी, विचारवंत, साऱ्यांचा मेळा आज,

संमेलनाच्या या स्नेहात, जुळती नवे आवाज!

 

आणि पुन्हा एकदा मराठीचा झेंडा उंचावतो,

बोलतो मी मराठी… अभिमानाने मिरवतो!

०००

 

संकलन:  अनिल कुरकुटे , जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम