दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाची प्रसिध्दी जगभरात – मंत्री डॉ. उदय सामंत

मराठीचा आवाज दिल्लीच्या तख्तावर:मराठी साहित्य महामंडळाचे मनापासून कौतुक

रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): मराठीचा आवाज दिल्लीच्या तख्तावर पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जे प्रयत्न केले त्याचे देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांनादेखील मनापासून धन्यवाद देतो. या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिध्द होईल, याची खात्री बाळगतो, अशा शब्दात मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.

मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तमाम महाराष्ट्राच्यावतीने प्रधानमंत्री मोदी यांना मनापासून धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही आमची वर्षानुवर्षे असलेली मागणी त्यांनी पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये संमेलन होत आहे.

सुमारे 70 वर्षानंतर हे संमेलन होत आहे. मराठीचा आवाज दिल्लीच्या तख्तावर पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने जे प्रयत्न केले, त्याचे देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांनादेखील मनापासून धन्यवाद देतो. नियोजनामध्ये पुणे येथील सरहद संस्थेचे संजय नहार यांनीदेखील अतिशय चांगल्या पध्दतीने जबाबदारी खांद्यावर घेवून दिल्लीमध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्य संमेलन याचा दर्जा उंचाविण्यासाठी ते काम करतात त्यांचे देखील अभिनंदन आहे. या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिद्ध होईल याची खात्री बाळगतो.

०००