नाशिक, दि. १६ (जिमाका): पाणी हा जीवनाचा मुलाधार आहे. दर्जेदार व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे भगूर शहरास नियमित पाणीपुरवठ्यासह विकासाला नवी चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आज भगूर नगर नगरोत्थान महाअभियान अभियांनंतर्गत भगूर शहराकरीता 24.38 कोटी निधीच्या पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार सरोज अहिरे, भगूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, भगूर शहर हे एतिहासिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. स्वातंत्रपूर्व काळापासून सन 1925 पासून येथे नगरपरिषद अस्तित्वात असून ती आता शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. भगूर शहराच्या विकासासाठी, शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे गरजेचे होते. चार वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियांनंतर्गत भगूर शहर पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. भगूर शहर हे स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व थीमपार्क करिता शिखर सामितीच्या बैठकीमध्ये 40 कोटींच्या विकास आराखड्यास मंजूरी दिली असून प्रथम टप्प्यामधील कामाकरिता 16 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
नाशिक शहरात आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळाच्या दृष्टीने आता शासन स्तरावर बैठका व नियोजन सुरू झाले आहे. यानिमित्ताने नाशिकसाठी केंद्र व राज्यशासानाकडून जास्तीत जास्त निधी कसा देता येईल यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी प्रयत्नशील राहील. भगूरवासियांना सर्व मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निधी कमतरता भासू देणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी नागरिकांना शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर याच्या स्मारक व थीमपार्कसाठी मंजूर 40 कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले 16 कोटींच्या निधीतून सूरू झालेले स्माराकाचे काम अतिशय दर्जेदार, गुणवत्तापूर्ण होणार आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट साठी 75 कोटींचा आराखडा सादर केला असून त्यास मंजूरी प्राप्त होताच कामे सुरू केली जातील. संत निवृत्तीनाथ महाराज समाधीचा व परसिराच्या विकासासाठी 45 कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केला असून त्यास विशेष बाब म्हणून मान्यता मिळावी,असे आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
०००