सांगली, दि. १६, (जिमाका) : शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू. शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करावी. त्यांना चांगली सुविधा द्यावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटर चे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रियांका राठी, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. रुपेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटर चे लोकार्पण झाल्याचे जाहीर करून मंत्री मुश्रीफ म्हणाले, या नविन सुविधेचा गोरगरीब व सामान्य जनतेला लाभ व्हावा. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी याचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी व्यवस्था करावी. शासकीय रूग्णालय व महाविद्यालयामध्ये सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मेरीटवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले होणे, त्यांना चांगली सुविधा देणे व तशा प्रकारचे काम करण्याची शासनाची व आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी तयार करणे हे काम हातामध्ये घेऊ. या रूग्णालयामध्ये विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या वसतिगृह दुरूस्तीसाठी 17 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, असे ते म्हणाले. या रूग्णालयामध्ये हृदयरोग विभाग, मिरजेला कॅन्सर केअर हॉस्पीटल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी, नर्सिंग कॉलेजला इमारत मंजूर होण्यासाठी, सुपरस्पेशालिटी रूग्णालय मंजूर होण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.
खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली व मिरज ची पूर्वीपासून वैद्यकिय पंढरी म्हणून ओळख आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्रात सांगली जिल्हा वैद्यकीय पायाभूत सुविधामध्ये अग्रेसर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवनविन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी चांगल्या सुविधा देऊ. आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी, मिरज येथे नर्सिंग कॉलेज व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होण्यासाठी आवश्यक निधीसाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे ते म्हणाले.
आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे रूग्णालय मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मदतीच्या दरामध्ये वाढ होण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय हे गोरगरीब रूग्णांचा आधारस्तंभ म्हणून उभे आहे. हे हॉस्पीटल चांगले व्हावे गोरगरीब रूग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. सांगली व मिरज शासकीय रूग्णालयामध्ये आवश्यक सोयी सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रूग्णालय व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व रूग्णांना चांगली सेवा मिळावी हे ध्येय ठेवून काम करीत आहोत. डॉक्टरांनी रूग्णांना चांगली सेवा द्यावी, रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
प्रारंभी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटरचे फित कापून लोकार्पण करण्यात आले.
प्रास्ताविकात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांनी रूग्णालयात पुरविण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन उपवैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे यांनी केले.
०००