धुळे, दि. १६ (जिमाका): सध्याच्या आधुनिक डिजिटल युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. विद्यार्थ्यामध्ये वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक, विचारवंत निर्माण करावे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे, ज्येष्ठांचे टोणगांवकर ग्रंथालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचा समारोप झाला. यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदिश पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ.फुला बागुल, प्राध्यापक डॉ.रमेश माने, अहिराणी कथाकार प्रविण माळी, साहित्यिक सुरेश मोरे, प्रभाकर शेळके, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. दत्ता परदेशी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले की, आज जग वेगाने बदलत आहे आणि इतक्या वेगाने बदलते की एक गोष्ट आपल्याला समजण्याच्या अगोदर दुसरे काही नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आज सोशल मीडिया, व्हॉट्सअप संपत नाही तोवर ए.आय हे नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम वाचन संस्कृतीवर होत आहे. आजच्या युवा पिढीचे वाचन कमी झाले आहे. इंग्रजांनी 200 वर्षापूर्वी देशात इंग्रजी भाषा आणली आणि या इंग्रजी भाषेत आपण सर्व जण गुरफुटून गेलो आहे. यामुळे आज आपण अहिराणी, मराठी भाषा बोलणे विसरून चाललो आहे. या भाषेला टिकविण्यासाठी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि कष्ट आपल्याला करावे लागणार आहे. मुलांना अहिराणी थोडीफार यायला पाहिजे ते शिकविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अहिराणी असो, मराठी असो ही आपली स्वत:ची भाषा प्रत्येकाला येणे आवश्यक आहे. सांस्कृतिक वारसा असणारे भारत वर्ष आपल्याला निर्माण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहे. येत्या काळात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातूनही वाचनालयासाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आज साहित्यिकांची संख्या हळूहळू कमी होत आहे. आपण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवून चांगले कवी, लेखक, विचारवंत, साहित्यिक, विचारवंत निर्माण करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री रावल यांनी सांगितले. यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.
या दोन दिवशीय ग्रंथोत्सवात काल परिसंवाद कार्यक्रमांत ‘ग्रंथानी मला घडविले’ या विषयावर विद्यार्थ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी मार्गदर्शन केले. आज झालेल्या परिसंवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ.फुला बागुल, प्राध्यापक डॉ.रमेश माने यांनी ‘खान्देशातील अहिराणी साहित्याची वाटचाल’ या विषयावर उपस्थित श्रोत्यांना सखोल मार्गदर्शन केले. कथाकथन कार्यक्रमात साहित्यिक सुरेश मोरे यांनी शेतकरी आत्महत्या या विषयांवर ‘यसा दादानी फाशी लीदी’ यावर कथाकथन केले. तर अहिराणी कथाकार प्रविण माळी यांनी ‘आयतं पोयतं सख्यांन’ हे एकपात्री नाटक सादर करुन प्रेक्षकांना हसवुन मंत्रमुग्ध केले.
बहुभाषिक कवी संमेलनात प्रभाकर शेळके, रावसाहेब कुवर, अरुणकुमार जव्हेरी, लतिका चौधरी, के.बी.लोहार, बाळु श्रीराम, प्रविण पवार, चंद्रशेखर कासार, प्रा.एन.डी.पाटील, माया साळुंखे, दत्तात्रय कल्याणकर, कमलेश शिंदे, गुलाब मोरे, अरविंद भामरे, शामल पाटील, सुनिल पाटील, गोकुळ बागुल, यशवंत निकवाडे, ईश्वर परदेशी, दत्तात्रय वाघ, जयराम मोरे, अहमद शेख, संजय धनगड, पौर्णिमा पाठक या कवीनी सहभाग घेतला. कवी संमेलनांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर भामरे यांनी तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदिश पाटील यांनी मानले.
०००