छत्रपती संभाजीनगर, दि.१६ (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे उत्तम स्मारक पुतळ्याच्या रुपाने उभे रहावे. तसेच सर्वोपयोगी अद्यावत सभागृह उभारले जावे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकविचाराने अशा लोकोपयोगी कमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ,असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे दिले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशिभिकरण या कामाचे भुमिपूजन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी इतर मागासवर्ग कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, संजय ठोकळ, राजेंद्र जंजाळ तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, पुतळ्याचे सुशोभिकरण व परिसराचा विकास ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कदाचित हे चांगले काम माझ्या हातून व्हावे, असे होणार असावे. आता सर्व लोकप्रतिनिधी हे एक विचारांचे आहेत. अशा चांगल्या कामासाठी आम्ही निधी आणून हे काम पूर्ण करु. समाजहिताच्या या कामाच्या गुणवत्तेत तडजोड करणार नाही. उत्तम दर्जाचे काम करु. पुतळा, परिसर विकास व सभागृह अशा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देऊ,असे आश्वास पालकमंत्री शिरसाट यांनी दिले.
इमाव कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे समाजाला बोध देणारे आहे. हे साहित्य सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. प्रत्येकाने ते वाचायला हवे. अण्णा भाऊ साठे यांचे यथोचित स्मारक आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत,असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक संजय ठोकळ यांनी केले. पंचशिला भालेराव व त्यांच्या कलापथकातील कलावंतांनी अण्णा भाऊ साठे यांची गाणी सादर केली. विनोद साबळे यांनी आभार मानले.
०००