जैसी हरळांमाजी रत्नकिळा।
कि रत्नांमाजि हिरा निळा
तैसी भाषांमाजी चोखळा।
भाषा मराठी।।
अशा शब्दात सार्थ अभिमानाने गौरवण्यात आलेल्या मराठी भाषेला दोन हजारांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास असल्याचे विविध पुराव्यांवरून निर्विवादपणे सिद्ध झाले आणि अभिजात भाषा म्हणून तिच्या दर्जावर अखेर गेल्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राजमान्यतेची मोहर उमटली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने मराठी भाषा ही प्राचीन, समृद्ध व श्रेष्ठ असल्याचे योग्य ते दाखले, साहित्य परंपरेची माहिती व इतर दस्तावेज केंद्र सरकारला सादर केले. त्यांची वस्तुनिष्ठता सिद्ध झाल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली दहा वर्षे सुरू असलेल्या लढ्याला यश आले आणि आपल्या मराठीच्या मुकुटात अभिजात भाषा म्हणून श्रेष्ठत्वाचे एक सुंदर मोरपीस खोवले गेले. मराठीवर प्रेम करणाऱ्या साऱ्यांना अभिमान वाटावा असा हा क्षण. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त केल्यामुळे मराठीचा गौरवशाली समृद्ध इतिहास व तिचे सांस्कृतिक वैभव आता जगभर पोहोचेल, असा विश्वास मराठीजनांच्या हृदयात निर्माण झाला आहे.
मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होणे हा गौरव तर आहेच पण त्यासोबतच ती संवर्धित व वृद्धिंगत करण्याची मोठी जबाबदारीही सर्व घटकांची आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभाग संबंधित विद्यापीठांच्या स्थापनेपासूनच आहेत. परंतू स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ मात्र राज्यात अस्तित्वात आले नव्हते. इतर राज्यांचा विचार केला तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अशी विद्यापीठे फार पूर्वीच स्थापन केली गेली आहेत. प्रादेशिक अस्मिता जपण्यासह भाषेचा निरंतर विकास व ती वृद्धिंगत व्हावी यासाठी १९८१ ते २०१२ या कालावधीत तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषा विद्यापीठांची स्थापना झाली व त्या माध्यमातून सर्व शाखांचे शिक्षण त्या राज्याच्या भाषेत तेथे देण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र विद्यापीठ नसल्याची खंत भाषाप्रेमींना जाणवत होती. त्यातून मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही लोकभावना प्रबळ होऊ लागली. महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठाची मागणी तशी जुनीच. १९३३ मध्ये नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात यावर प्रथमच चर्चा करण्यात आली व त्यानंतर १९३९ च्या साहित्य संमेलनात साहित्यिक व भाषेचे अभ्यासक मराठी भाषा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आग्रही असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मराठी ही केवळ लोकव्यवहार व साहित्यनिर्मितीची भाषा म्हणून मर्यादित न ठेवता ती ज्ञानभाषा व आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा म्हणून विकसित करण्याची गरज प्रतिपादित होत असताना त्या दृष्टीने या भाषेसाठी समर्पित स्वतंत्र विद्यापीठ गरजेचे होते.
महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता व मुळात अभिजातच असलेली मराठी जपायची तर तिचा इथून पुढला प्रवास मराठीसाठी समर्पित विद्यापीठातून व्हावा यावर सर्व साहित्यिक व मराठीप्रेमींचे एकमत होते. या लोकभावनेची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीचे बीजारोपण केले. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने जुलै २०२३ मध्ये सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येऊन या प्रयत्नांना गती देण्यात आली. या समितीने अवघ्या दोन महिन्यात सर्वसमावेशक तपशील व अहवाल राज्य शासनास सादर केला. त्या आधारावर मराठी भाषा विद्यापीठ अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठी भाषा विद्यापीठ कुठे स्थापन करावे असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यासाठी वऱ्हाडातील रिद्धपूरशिवाय अधिक योग्य अशी दुसरी जागा कोणती असणार? रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखली जाते. अकराव्या शतकापासून नवे पंथ व भक्तिमार्ग उदयास येत होते. श्री चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकात महानुभाव पंथाची स्थापना केली. जातिनिरपेक्षता आणि अहिंसा हे या पंथाचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रात महानुभाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पंथाचा उत्तरेकडे दिल्ली व पंजाबपर्यंत प्रसार झाल्याचे अभ्यासक सांगतात.
श्री गोविंद प्रभू महानुभाव पंथाचे आद्यपुरुष व श्री चक्रधर स्वामींचे गुरु. त्यांचे वास्तव्य रिद्धपूर येथे होते. ते अहिंसेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जातात. महानुभाव पंथाच्या प्रारंभिक अनुयांपैकी एक व मूळचे मराठवाड्यातील रहिवासी असलेले म्हाइंभट श्री चक्रधरांच्या पहिल्या भेटीतच प्रभावित झाले. स्वामींच्या विचारांनी प्रेरित होऊन म्हाइंभट्ट कायमचे रिद्धपूर येथे स्थायिक झाले. त्यांनी चक्रधर स्वामींचे विचार व शिकवणुकीचे आयुष्यभर अनुसरण केले.
श्री चक्रधर स्वामींच्या आदेशाने म्हाइंभट्टानी इसवी सन १२७८ मध्ये ‘लीळाचरित्र’ हा मराठी भाषेतील पहिला पद्यग्रंथ रिद्धपूरच्या पावनभुमीत लिहिला. (या ग्रंथ लेखनाच्या कालनिश्चितीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.) विशेष म्हणजे या पंथाने मराठी भाषेला त्यांच्या साहित्यात प्रथम व मोलाचे स्थान दिले. महानुभावांच्या सांकेतिक लीपींबाबतही अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनविली. लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग केला. स्वामींच्या उत्तरागमनानंतर महाराष्ट्रभरातील त्यांचे सर्व शिष्य रिद्धपूरला आलेत. श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र व कार्याच्या स्मरणार्थ तसेच त्यांचे शिष्य व महानुभाव पंथियांना त्यांचे मार्गदर्शन व सहवास लाभत राहावा यासाठी म्हाइंभट्ट यांनी लीळाचरित्राची निर्मिती केली. त्याच काळात श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंद प्रभू, श्री नागदेवाचार्य, केशिराज, म्हाळसा यांच्या प्रतिभेला अंकुर फुटलेत. स्मृतिस्थळ, गोविंद प्रभू चरित्र, दृष्टांत पाठ इत्यादी ग्रंथ येथे निर्माण झालेत. आद्य प्राचीन कवयित्री महदईसा यांनी या भूमित धवळे रचले. ज्याला ‘महदंबेचे धवळे’ म्हणतात. भाष्कर भट्ट, बोरीकर, नरेंद्र पंडित, विश्वनाथ पंडित, दामोधर पंडित, काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी कथा व काव्य निर्मिती केली. कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, शास्त्रीय ग्रंथ, व्याकरण, भाषा विज्ञान, लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वाङ्मय निर्मिती रिद्धपूर येथे झाली. त्या काळी मराठी भाषेतून तत्त्वज्ञानाची शास्त्रशुद्ध मांडणी करणारा महानुभाव पंथ अधिक नावारूपास आला व त्यातूनच ‘मराठी वाङ्मयाचीही काशी’ अशी रिद्धपूरची ओळख निर्माण झाली. खऱ्या अर्थाने मराठी वाङ्मयीन साहित्याची क्रांती येथे घडून आली. या साहित्यातून अध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक पट उलगडला व समाजाला नवी दिशा देण्याचे महान कार्य रिद्धपूर येथून सुरू झाले व मराठी भाषेची नाळ रिद्धपूरशी जोडल्या गेली. मराठी भाषेच्या समृद्ध होण्यात महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे आणि त्यास रिद्धपूर साक्षी राहिले आहे.
मराठीचा अधिक सखोल अभ्यास, संशोधन व भाषेच्या संवर्धनासाठी या विद्यापीठाची मोलाची भूमिका असणार आहे. विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ.अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात ते प्राध्यापक होते. मराठी व इंग्रजी विभागाचे प्रमुख व अधिष्ठाताही ते होते. साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक असलेले डॉ. आवलगावकर यांचे मध्ययुगीन साहित्य, लोकसाहित्य व समीक्षा या विषयांवर प्रभुत्व आहे. मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये त्यांचा समावेश होता. शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अनेक वर्षांचा त्यांना अनुभव असून, त्यांची अनेक पुस्तके आणि काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. डॉ. आवलगावकरांचे व्यापक अनुभव व शैक्षणिक नेतृत्व विद्यापीठाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल यात शंका नाही
मराठी भाषा विद्यापीठात वैविध्यपूर्ण व बहुभाषिक शिक्षण कसे मिळेल व येथील विद्यार्थी त्याच्या आयुष्यात रोजगारासाठी कसा सक्षम होईल याकडे प्रामुख्याने विद्यापीठाने काटेकोर नियोजन केले आहे. अभिजात मराठी भाषा व साहित्यात येथे स्वतंत्र पदवी व पदविका घेता येणार आहे. मराठीचे लेखन व संवाद कौशल्याधारित अल्पावधीचे अभ्यासक्रम येथे असणार आहेत. शासन दरबारी इंग्रजीचा सर्रास वापर होतो, त्या ऐवजी मराठीला प्राधान्य देत मराठीचा वापर वाढावा यासाठी विशेष अभ्यासक्रमासह मराठी साहित्याचे अध्ययन व अध्यापन यावर विद्यापीठाचा भर असणार आहे. यासाठी इतर राज्यातील विद्यापीठांची कार्यपद्धती, अभ्यासक्रम व त्याचे उपयोजन आदींची सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. परदेशातील साहित्याचे अनुवाद मराठीत व येथील मराठी साहित्य जगभरात अनुवादित स्वरूपात उपलब्ध करता यावे यासाठी अनुवादावर आधारित शिक्षण, इतर भाषेतील साहित्य व मराठी साहित्याचा तौलानिक अभ्यास या विषयांवर येथे अभ्यासक्रम असणार आहे.
आपल्या देशात लिपी स्वरूपातील महत्वपूर्ण दस्तावेज खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून अनेकांचा अद्याप अर्थबोध झालेला नाही. अशा लिपींचा अभ्यास व संशोधन करून देशाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक दस्तावेज जतन करण्याच्या उद्देशाने लिपी आधारित अभ्यासक्रम येथे असणार आहे. मराठीचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम विकसित करण्यात येत आहे. उपयोजित कले अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा व सर्व क्षेत्रांना साहित्याशी जोडणाऱ्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे.
रिद्धपूर येथील विद्यापीठासाठी सुमारे ६० एकर जागा संपादन करण्याबाबत शासनाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षापसून येथे काही अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत व्यवस्थापकीय परिषदेने मंजूरी दिली असून शासनाकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या उभारणीसाठी शासनाने ४ कोटी २५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला असून त्यातील अंदाजे १ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, कार्यालय व सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. उर्वरित प्रस्तावित निधीतून विद्यापीठासाठी आवश्यक त्या सर्व बाबी म्हणजे ग्रंथालय, संदर्भ ग्रंथ कक्ष, अभ्यासिका आदींची निर्मिती करण्यात येणार आहे.
अभिजात मराठीच्या संवर्धनासह तिचे भाषिक सौष्ठव जपून ती अधिकाधिक समृद्ध व्हावी यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून एक नवे पर्व सुरू झाले आहे. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, ‘जगातील सर्व प्रगल्भ भाषांना जे साधलं ते मराठीलाही साधता येईल. फक्त आपला विश्वास हवा, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या आपल्या मायभाषेच्या क्षमतेवर.
अभिजात मराठीचा अभ्यास, संशोधन व विकास करता यावा यासाठी उभारण्यात आलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर असंख्य हृदयात हा विश्वास दृढ झाला आहे!
श्रीमती पल्लवी धारव
सहायक संचालक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर