अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने तपासणीमध्ये वाढ करून दोषींवर कठोर कारवाई करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगलीदि. १७ (जि. मा. का.) : अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी. तपासणीमध्ये वाढ करून कायद्याचा धाक निर्माण करावा व कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

अमली पदार्थ टास्क फोर्सच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थांच्या दुष्परिणामसंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी. त्यासाठी अमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफीत तयार करून याबाबत शाळा महाविद्यालयातील मुले, युवकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील  बंद कारखाने तपासणी मोहिम तातडीने पूर्ण करावी. जे उद्योग बंद आहेत, ज्या उद्योगासाठी परवाना घेतला आहे तो उद्योगच तेथे सुरू आहे का याची तपासणी करून विहीत नियमांनुसार कार्यवाही करावी. कारवाई करण्यासंदर्भात काही अडचण येत असेल तर संबंधित विभागास कायद्यात सुधारणा करण्याबाबत कळवावे.सांगली, मिरज शहरातील सीसीटीव्हे कॅमेरे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी. त्याच्या दुरूस्तीसाठी व अनुषंगिक कामाकासाठी अंदाजपत्रक तयार करावे जेणेकरून त्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळा, कॉलेजच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यावर बंदी आहे. याबाबत महानगरपालिका, नगरपालिका व संबंधितांनी तपासणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. ‍विटा येथील पत्रकारांवर मारहान झालेल्या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सांगून संबंधितांवर एमपीडीए लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटना व त्याअनुषंगाने केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

000000