मराठी साहित्याचा प्रांत अतिशय समृद्ध आणि सशक्त आहे. मराठी साहित्याला दीर्घ आणि प्राचीन अशी परंपरा लाभली आहे. आज इतर भाषांमधील जी साहित्य संपदा आहे त्यामध्ये मराठी साहित्य कुठेही मागे नाही. उलट मराठी साहित्याने आपले भावविश्व अतिशय व्यापक केलेले असून जागतिक साहित्याला तोडीस तोड साहित्य मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. समाजातील सर्वच अंगांना स्पर्श करण्याचे कार्य मराठी साहित्याने केले आहे. कविता,कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारांनी मराठी साहित्य बहरलेले आहे. प्रामुख्याने वैचारिक आणि ललित अशा दोन्ही प्रांतात मराठी साहित्याची मुशाफिरी दिसून येते.
या दोन्ही प्रांतात अतिशय विपलु असे लेखन मराठी भाषेत आढळून येते. मराठी साहित्याचा मागोवा ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपण बाराव्या शतकात जाऊन पोहोचतो. बारावे शतक हे मराठी साहित्याच्या दॄष्टीने सुवर्णकाळ होय. याच काळात मराठी साहित्य गंगेचा उगम झालेला दिसून येतो. मराठीचा पहिला लिखित स्वरुपातील ग्रंथ लीळाचरित्र याच काळात लिहिल्या गेला. गद्य निर्मितीचा पाया या ग्रंथाने घातला. याप्रमाणेच धवळे हे आद्य काव्य देखील याच काळात रचल्या गेले. इथून सुरु झालेला मराठी आणि गद्य आणि पद्य साहित्याचा प्रवास अविरतपणे अद्यापही सुरुच आहे. मराठीच्या आरंभकाळाला सुवर्णयुग असे म्हटल्या गेले आहे कारण मानवी जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारा आद्य ग्रंथ लीळाचरित्र एक मानदंड ठरला. पुढे ‘ज्ञानेश्वरी’ सारखे महाकाव्य असेल किंवा नरेंद्राचे ‘रुक्मिनी स्वयंवर’ हे काव्य असेल यांनी मराठी साहित्याला श्रीमंती प्राप्त करुन दिली आहे.
या ग्रंथांचा आदर्श पुढे ठेवतच आजतागायत शेकडो ग्रंथ मराठी भाषेमध्ये निर्माण झाले. महानुभाव साहित्याचे तर मराठी भाषा श्रीमंत करण्यात फार मोठे योगदान आहे. महानुभावांनी मराठी साहित्याला साडेसहा हजार ग्रंथ दिले आहेत. एवढया मोठया प्रमाणात एकाच संप्रदायाने ग्रंथ निर्मिती करावी हे जगाच्या पाठीवर कुठेच घडलेले नाही. महानुभाव साहित्याशिवाय मराठी भाषेचा इतिहास अपूर्णच राहील. एवढे महत्वपूर्ण साहित्य या संप्रदायाने मराठी भाषेला दिलेले आहे. आधुनिक काळात देखील महानुभाव साहित्याची निर्मिती सुरुच आहे. आधुनिकतेशी महानुभाव साहित्याने जुळवून घेतले आहे. संशोधना सोबतच आधुनिक काव्यात चितपरिचीत असलेले कथा, कादंबरी आणि काव्य प्रकार देखील महानुभाव साहित्यिक हाताळत असून ते मराठी साहित्याच्या प्रांतात आपला ठसा उमटवित आहेत- असे असले तरी लीळाचरित्राचे मराठी साहित्यात आगळे वेगळे स्थान आहे हे मान्य करावेच लागेल.
लीळाचरित्र ग्रंथ कसा तयार झाला याविषयी अत्यंत उद्बोधक माहिती आहे. श्रीचक्रधर स्वामींच्या प्रयाणानंतर त्यांचे पट्टशिष्य नागदेवाचार्य व इतर भक्तमंडळी रिद्धपूरला श्रीगोविंदप्रभूंच्या सेवेसाठी येऊन राहिले. स्वामीच्या विरहाचे दुःख सर्वांच्याच अंतःकरणात भरलेले होते. नागदेवाचार्य तर श्रीगोविंदप्रभूंची सेवा आटोपल्यानंतर एकांतात बसून स्वामींच्या लीळांचे स्मरण करीत असतं. हे केवळ विरह दुःखाचे ओवले-पोवलेपण नाही.आचार्य कशाचे तरी निरंतर स्मरण करीत असतात. हे चाणाक्ष म्हाइंभटांच्या लक्षात आले. एके दिवशी त्यांनी नागदेवाचार्यांना विचारले ‘भटो: तुम्ही निरंतर काइसयाचे मनन करीत असा, तुम्हासी केव्हळीही मननावेगळेया न देखो:’ यावर नागदेवाचार्यांनी उत्तर दिले. ‘मी नेहमी स्वामींच्या लीळा मनन करीत असतो. स्वामींच्या सान्निध्यात मी जेव्हा हिरवळीला होतो, तेव्हा एके दिवशी त्यांनी मला तेथून रिद्धपूरला पाठविले. मी जायला निघालो, तेव्हा सर्वज्ञांनी मला म्हटले, वानरेया: एथोनि निरोपीले विचारशास्ञ: अर्थशास्ञ: तयाचे श्रवण: मनन: निदिध्यसन करावे: तेही एक स्मरणचि कीं गा: एथीची चरित्रे आठविजेति: आइकीजेति: तेही एक स्मरणचि कीं गा:’ असे निरुपण सर्वज्ञांनी मला त्यावेळी केले होते.
म्हणून त्यावेळी रिद्धपूरला म्हणजे येथे श्रीप्रभूंच्या सान्निध्यात असताना श्रीप्रभूच्या ज्या खेळक्रीडा पाहिल्या त्या सर्वांचे मी निरंतर स्मरण करीत असतो.’ ‘‘मी जैलागुनी अनुसरलां तैलागुनी मज देखता जीया सर्वज्ञांचीया लीळा वर्तलीया तीया मी आवांकीतेचि असे: जै मज पवाड नसे: सर्वज्ञांच्या सेंवादास्यालागी कव्हणीकडे जाए तरी जीए भक्ते सर्वज्ञांजवळि असेति त्याते एऊनि पुसे: आन मी अनुसरलां नव्हता तै बाइसादेखत जिया लीळा वर्तलीया तीया मीया सर्वज्ञाते पुसीलीया: आन सर्वज्ञे प्रसंग परांत नीरुपीले इतिहास तेही आवांकीत असे: आन सर्वज्ञे जे नीरोपीले परावर नीरुपन तेही आवांकीतूची असे: आन अळजपुरीहून सर्वज्ञे बीजे केले तेथौनि प्रतिष्ठानापर्यंत जीया लीळा वर्तलिया तीया सर्वज्ञे प्रसंगे भक्तापरिवारात सांगीतलीया तीया आठवीतूचि असे: आन सर्वज्ञे जै एकांकी राज्य केले तीया लीळा: सर्वज्ञे प्रसंगे भक्ताप्रती नीरुपीलीया: तीयाही आठवितूचि असे: आन सर्वज्ञे द्वापरिचीया लीळा: श्रीप्रभूचीया लीळा प्रसंगे भक्ताप्रति नीरुपीलिया तीयाही आठवितुची असे:’’
आपण कशाचे मनन करीत असतो याचा वृत्तांत नागदेवाचार्यांकडून ऐकल्यावर दूरदर्षी प्रज्ञावंत म्हाइंभटांच्या मनात एक विचार स्फुरला व तो त्यांनी ताबडतोब बोलूनही दाखविला. आचार्यांना ते म्हणाले, भटो तुम्हासी सर्वज्ञांचा वरु: म्हणौणि सर्वज्ञे नीरोपीले ज्ञान: शास्त्र ज्ञात: सर्वज्ञे जीया केलीया सांगितलीया तीया तुम्हासि आठविताति: तरि आता श्रीचरणा सन्निधानी आम्हांसी: आन पुढे जो सर्वज्ञांचा मार्ग होइल त्यासि तवं इतुके शास्त्र न धरे: तरि सर्वज्ञांचिया लीळा तुम्ही सांगा आन मी लीहिन:’ भटी म्हणीतले: ‘हो कां: लिहीले मार्गासी उपयोगा जाईल: सर्वज्ञाते मार्गाची प्रवृत्ती असे: कां पाः सर्वज्ञे म्हणीतले: शास्त्र घेइजे: मग काळे करुनी उपयोगा जाये:’
लीळाचरित्राच्या रुपाने स्वामींच्या आठवणी लिहून काढण्याचा विचार ज्यावेळी म्हाइंभटांना स्फुरला तो क्षण मराठी साहित्याच्या दृष्टीने अपूर्व क्षण होता यात शंका नाही. या आठवणी लिहून काढण्याचे प्रयोजन जरी महानुभाव पंथा पुरते मर्यादित असले तरी त्यामुळे महाराष्ट्र,मराठी भाषा व मराठी साहित्य यांची म्हाइंभट व नागदेवाचार्य या दोन्ही पंडितांकडून कशी अनमोल सेवा घडली हे आपणास आज अनुभवाला येते.
पुढे नागदेवाचार्यांनी आठवणी सांगायच्या आणि म्हाइंभटांनी त्या लिहून काढायच्या असे ठरले. ‘मग माहिभटी लेखन आरंभीले: भट माहीभट वाजेश्वरी वीजन करीत: ऐसे अवघे भटोबासी लीळा कथन केले: ते माहीभट सा मासा लीहिले:’ आणि अशारितीने सहा महिण्यात लीळाचरित्राचा कच्चा खर्डा तयार झाला. लीळाचरित्राचा खर्डा तयार झाल्यावर त्यातील मजकूर यथार्थ असावा, त्यात कोणतीही चूक किंवा कमी अधिकपणा राहू नये म्हणून ज्या विद्यमान व्यक्तींचा त्यात संबध आला होता त्यांच्याकडून त्या मजकुराची खात्री करुन घेणे आचार्यांना आवश्यक वाटले.
म्हणून म्हाइंभटांना त्यांनी म्हटले, माहीभटो जै मी सर्वज्ञाते अनुसरलां नाही तै बाइसां अवीद्यमान जीया लीळा वर्तलीया तिया तयाचीये अनुभवीचीया तयाते पुसावीया: जानोचेया अनुभवीचीया जानोते पुसावीया: नाथोचीये अनुभवीचीया नाथो ते पुसावीया: येल्होचीये अनुभवीचीया येल्होते पुसावीया: एये जीयाचाची परी ज्या ज्या ज्याचिये अनुभवीचीया लीळा त्या त्यासि पुसाविया: श्रीप्रभूचा सन्निधानी जे भक्त होते त्याचीये अनुभवीचीया लीळा त्याते पुसावीया:’ मग म्हाइंभटांनी आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे गावोगावी फिरुन स्वामींच्या लीळा गोळा केल्या व पुन्हा त्या नागदेवाचार्यांना दाखविल्या व शके ११९७ मध्ये लीळाचरित्र हा ग्रंथ तयार केला.
म्हाइंभटांनी लिहिलेल्या लीळाचरित्राची एकच प्रत होती. लीळाचरित्र म्हाइंभटांनी बाळबोध लिपीत लिहिले होते. त्यावेळी त्याच्या प्रतिलिपी तयार केल्या नाहीत. ही प्रत नागदेवाचार्यांजवळ होती. त्यांच्या निधनानंतर ती बाइदेवबासाकंडे व नंतर कवीश्वरबासाकंडे आली व त्यांच्याजवळ असतांनाच खालशाची धाड आली व त्यावेळी ही आद्य प्रत नाहीशी झाली. सिद्धांते हरिबास व धाकटे सोंगोबास यांच्या अन्वयस्थळात ‘आन तिन्ही रुपेचरित्रे महाइभटीचि केली परि ते लीळासंबंध खालसाचिया धाडीसी नाहीचि जाले:’ असा स्पष्ट उल्लेख आहे. पुढे लीळाचरित्रावर अनेक पिढीपाठ तयार झाले. हे सर्व पाठ लिपीबद्ध होते.
खालशाच्या धाडीत मुळ प्रत नष्ट झाल्यावर त्याच्या पुर्नलेखनाचे काम प्रथम कमळाइसाची शिष्या हिराइसा हिने केले. हिराइसाला एकछंदी प्रज्ञा होती. त्यामुळे एकदा ऐकलेले तिच्या डोक्यात पक्के बसतं असे. तिने लीळा सांगितल्या व पाटकुले मालोबास यांनी लिहून काढल्या. हे पुर्नलेखनाचे काम शके १२३२ मध्ये झाले.
महानुभावांनी अचाट साहित्य निर्मितीचे काम करुन महाराष्ट्र वाङ्eय इतिहास समृद्ध केला आहे. महाराष्ट्राबाहेर पंजाब, काश्मीर, उत्तप्रदेश, आंध्रपदेश किंबहुना अफगाणिस्थान, काबुल- कंदहार पर्यंत महानुभावांनी मराठी भाषा पोहोचविली. सोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीला सर्वदूर नेले. महानुभाव विचारधारा असलेले साहित्यिक आधुनिक साहित्यात संचार करीत असून ते मराठी साहित्य विश्वाला दमदार साहित्यकृती देत आहेत. याची दखल मराठी साहित्य विश्वाने घेणे आवश्यक आहे. काव्यातील अभंग, गझल अशा प्रकारांचा देखील वापर महानुभाव साहित्यिक करीत आहेत. कलगीतुरा याचा देखील अंतर्भाव महानुभाव साहित्यिकांनी केला आहे.
अशाप्रकारे मराठीच्या आरंभकाळी एक सशक्त आणि परिपूर्ण साहित्य निर्मिती करुन मराठी साहित्य निर्मितीचा पाया घालणाऱ्या महानुभाव साहित्यिकांनी आधुनिक काळात देखील आपली साहित्य निर्मिती सुरुच ठेवली असून महानुभावीय विचारधारेच्या ग्रंथ निर्मितीसोबतच इतरही अनेक ग्रंथांची निर्मिती करुन आपली देखील नाळ आधुनिक साहित्यासोबत जुळलेली आहे हे दाखविण्याचा एक उत्तम प्रयत्न या साहित्यिकांनी केला आहे. भविष्यात हा प्रवाह अधिक जोमाने प्रवाहित होत जाईल यात कुठलीच शंका नाही.
प्रा. डॉ. किरण वाघमारे,
सहायक प्राध्यापक