बुलढाणा, (जिमाका), दि.१७ : पेनटाकळी प्रकल्पाच्या काठावर गेल्या बारा दिवसांपासून गावठाण हद्दवाढ करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले ग्रामस्थांचे उपोषण गावठाण हद्दवाढ प्रकरणाचा निवाडा मान्य झाल्याने केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेण्यात आले.
पेनटाकळी गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले. सिंचन प्रकल्पाच्या खालच्या बाजूच्या गावाचे पुनर्वसन नियमानुसार होऊ शकत नाही. त्यामुळे गावठाण हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. हद्दवाढ मागणीसाठी पेनटाकळी येथील गावकऱ्यांनी बेमुदत उपोषण आरंभले होते. याची दखल घेत आज केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी उपोषण स्थळी गावाकऱ्यांशी संवाद साधला.
त्यावेळी ते म्हणाले की, भूमी अभिलेख खात्याने संबंधित जागेचे सीमांकन करावे. शासकीय अभियंत्यांची मदत घेऊन आराखडा तयार करण्यात यावा. या जागेवर असलेले अतिक्रमण ग्रामपंचायतने काढावे, त्यासाठी पोलीस निरीक्षक साखरखेर्डा यांनी योग्य तो बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. ग्रामसभा घेऊन सर्वांच्या सहमतीने सदर भूखंडाचे वाटप ग्रामपंचायतने करावे, असे निर्देश दिले.
यावेळी स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
000