अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महिला विद्यापीठाने शाळांशी संपर्क वाढवावा- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १७ : स्थापनेचे १०९ वे वर्ष साजरे करीत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील, विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील, शाळांशी संपर्क वाढवावा, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला विद्यापीठाचा ७४ वा दीक्षान्त समारोह विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात सोमवारी (दि. १७) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

महिला विद्यापीठाने नुकतेच चंद्रपूर येथे उपकेंद्र सुरू केले असल्याचे नमूद करून विद्यापीठाने आदिवासी भागातील मुलींची उच्च शिक्षणातून होणारी गळती कमी करण्याच्या दृष्टिने या संपूर्ण समस्येचे अध्ययन करावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांशिवाय विद्यार्थिनींना कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा व्यवस्थापन आदी क्षेत्रातील आधुनिक पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन द्यावे, असेही यावेळी राज्यपाल यांनी सांगितले.

पदवीधर विद्यार्थिनींनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले उद्दिष्ट निश्चित करावे त्या दृष्टीने कठोर परिश्रम करावे, प्रत्येकाला निसर्गाने वेगवेगळी कौशल्ये, क्षमता दिल्या असल्यामुळे कोणीही इतरांशी तुलना करीत बसू नये व आपल्या गतीने आपले निर्धारित उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही, परंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस किंवा इतर परीक्षा उत्तीर्ण कराव्या. मात्र समाजातील अशिक्षित तसेच गोरगरीब महिलांची काळजी घ्यावी.विद्यापीठांनी आपले शैक्षणिक वेळापत्रक पुरेसे अगोदर तयार करुन जाहीर करावे, तसेच सर्व परीक्षांच्या व दीक्षान्त समारोहाच्या तारखा अगोदरच जाहीर कराव्या, असे राज्यपालांनी सांगितले

समाज एका महिलेला सुशिक्षित करतो त्यावेळी तिच्या सर्व भावी पिढ्यांना सुशिक्षित करीत असतो, असे सांगताना यशस्वी महिलांनी आपला काही वेळ समाजातील उपेक्षित महिलांच्या कल्याणासाठी द्यावा तसेच आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करू नये असे उद्गार एकात्मिक संशोधन आणि विकास कृतीच्या कार्यकारी संचालिका डॉ. ज्योती पारिख यांनी यावेळी काढले.

कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या अहवालात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विदेशी विद्यापीठांशी सहकार्य, हवामान बदल या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिसंवाद, विद्यापीठाने क्रीडा तसेच इतर क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

दीक्षान्त समारोहाला डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, माजी कुलगुरू डॉ. चंद्रा कृष्णमूर्ती, विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. रूबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक, अधिष्ठाता आणि विभाग प्रमुख, शैक्षणिक आणि अशैक्षणिक कर्मचारी, तसेच स्नातक उपस्थित होते.

दीक्षान्त समारोहात १५,३९२ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण ४६ संशोधकांना पीएचडी तर ७७ स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

००००

Maha Governor presides over 74th Convocation

of SNDT Women’s University

Mumbai Dated 17 : Maharashtra Governor and Chancellor of the state universities C P Radhakrishnan presided over the 74th Annual Convocation of the SNDT Women’s University in Mumbai on Mon (17th Feb)

Executive Director of Integrated Research and Action for Development Smt Jyoti Kirit Parikh, Vice-Chancellor, SNDT Women’s University and HoDs, Prof Dr. Ujwala Chakradeo, Pro-Vice-Chancellor Prof. Dr. Ruby Ojha, Registrar Dr. Vilas Nandavadekar, Director of the Board of Examination and Evaluation, Deans and HoDs, Principals, teaching and non-teaching staff and graduating students were present.

A total of 15,392 students were awarded degrees and diplomas. In all 46 scholars were awarded PhDs while gold medals were presented to 77 students.

0000