मुंबई, दि. १७ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करून सादर करण्यात यावा. जेणेकरून योजनेची व्याप्ती वाढेल असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १२६ वी बैठक इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात झाली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार, तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत, संचालक मंडळाच्या १२५ व्या सभेच्या इतिवृत्तास व केलेल्या कार्यवाहीस मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर, बैठकीत युवक-युवतींकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण आणि महिलांसाठी महिला समाज सिद्धी योजना सुरू करण्याबाबत, तसेच विभागातील सहायक संचालक यांची नेमणूक करण्याच्या विषयावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने मानधनावर घेण्याबाबतही सूचना श्री.सावे यांनी दिल्या. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, महामंडळाच्या कार्यप्रणाली अधिक सुलभ व प्रभावी बनवावी जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या सर्व महामंडळाची एक सारखी कार्यपद्धती तयार करावी.
0000
शैलजा पाटील/विसंअ