योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही
तीन वर्षात योजना पुर्ण करण्यात येणार
पंढरपूर (दि.१७) :- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेचे काम सुरु होणार असल्याने १२ गावातील सुमारे १५ हजार ४०० हेक्टर जमीनींना बंदिस्त नलिकेव्दारे शेतीला लवकरच कायमस्वरुपी पाणी मिळणार आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरुपी संपून तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. ह.तु.धुमाळ, भीमा कालवा अधिक्षक अभियंता धीरज साळी यांच्या मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामास शासनाने सुधारीत प्रशासकीय मंजुरी दिली या योजनेकरिता उजनी धरणामधून दोन टीएमसी पाण्याची तरतूद असून या पाण्याद्वारे सांगोला तालुक्यातील १२ गावातील सुमारे १३ हजार ५५ हेक्टर क्षेत्रास व सांगोला शाखा कालवा क्र. ५ अंतर्गत २ हजार ३४५ हे. असे एकूण १५ हजार ४०० हे. क्षेत्राचा सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ब-याच वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असून कायमस्वरुपी दुष्काळ असलेला हा भाग सिंचनाने सुजलाम-सुफलाम होणार आहे. पुढील तीन वर्षात ही योजना पुर्ण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही . राज्यामध्ये सांगोला तालुका हा पूर्णतः दुष्काळमुक्त होण्याचा काम होत आहे. आणि याचे भाग्य मला मिळाले याचा आनंद आहे.पुढील पाच वर्षांमध्ये संपुर्ण महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन शासन कटिबध्द आहे.
सांगोला तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी अविरत प्रयत्न्न केले असून त्यांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळी भागासाठी अविरतपणे संघर्ष करुन माण खटाव तालुका पूर्णतः दुष्काळमुक्त केला आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. माजी आमदार शहाजी पाटील व माजी खासदार रणजिसिंह नाईक-निंबाळकर यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सागितले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सांगोला तालुका पिढयान-पिढया दुष्काळाशी संघर्ष करीत असणारा शेतकरी दुष्काळ संपावयसाठी आस लावून बसलेला आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेच्या कामांमुळे सांगोला तालुका पुर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे. पिढ्यान् पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या मातीचे दुख संपले आहे. माण-खटाव- फलटण -सांगोला तालुक्यातील दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न केला असून ,सद्यस्थित माण-खटाव मध्ये शेतील मुबलक पाणी असून चार ते पाच साखर कारखाने आहेत. सातारा जिल्ह्यातील राजेवाडी तलावातील शिल्लक राहणारे पाणी सांगोला तालुक्याला देणार असून, दुष्काळ भागातील तुमचा सहकारी म्हणून कायम तुमच्या बरोबर उभा राहिन असेही त्यांनी यावेळी सांगतिले. तसेच दुष्काळी भागाच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब विखे पाटील होते.. ज्या, कुटुंबातील माणसाने पाण्यासाठी संघर्ष केला होता. त्या बाळासाहेब विखे पाटील यांच्या मुलांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होतोय. याचा अभिमान वाटत असल्याचे पालकमंत्री श्री गोरे यांनी सांगितले.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, माजी आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी सर्व मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेच्या संकल्प चित्राची पाहणी केली.
00000000