मराठी सारस्वतांचा महामेळाव्याला लेखक, प्रकाशक व भाषा तज्ज्ञांच्या शुभेच्छा
नांदेड दि. १७ फेब्रुवारी :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आणि त्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य होणे हा दुग्ध शर्करा योग आहे. या साहित्य संमेलनाला मराठी साहित्यिक, सारस्वतांचा महामेळावा दिल्लीत भरणार असून मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. यानिमित्ताने नांदेड येथील लेखक, साहित्यिक, संपादक यांनी या संमेलनाला उपस्थित राहून अनेक ग्रंथसंपदाचा आनंद घेणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
तमाम मराठी साहित्यिक, रसिक या संमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतो. आता तो क्षण समिप आला आहे. या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी अनेक मराठी साहित्यिक, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार आहेत. अशा नांदेड जिल्ह्यातील कवि, विचारवंत, मराठी साहित्यीकांच्या बोलक्या प्रतिक्रीया ….
नांदेड येथील मराठी भाषा प्रमुख प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे सांगतात की , ‘माझी मराठी मराठाच मी’ ना.गा. नांदापूरकर यांच्या कवितेतून स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेली निजामी राजवटी विरोधात घोषणा या 98 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आठवण होते. एके काळी मराठयांनी आपला सैन्य तळ दिल्लीत ठोकला होता, त्याच ठिकाणी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर साहित्य संमेलन होत आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या, सर्व व्यक्तीसाठी तसेच मराठी संस्कृतीचा आग्रह धरणाऱ्यासाठी ही घटना महत्वाची आहे. दिल्ली येथे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उच्चारला जाणारा आवाज जगभर जावा ही मराठी भाषा, संस्कृतीची पताका जगभर फडकविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबत त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऋण व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक ,कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर या सांगतात की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी दिल्ली येथे सुरु आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. मराठी भाषा संत ज्ञानेश्वरानी म्हटल्यासारखे अमृता सोबत पैज जिंकल्यासारखे मधुर आहे. या संमेलनाला मराठी, अमराठी भाषिकांनी पहावे, एकावे, मराठीची मधूरता चाखावी असे आवाहनही त्यांनी केले. साहित्य संमेलन व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाने अचूक मराठी बोलावे, इतर भाषेचे शब्द न वापरता शुध्द मराठी भाषा बोलावी. यामुळे मराठी भाषा जगणार आहे. तसेच या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा साहित्यिक मा. डॉ. ता.रा. भवाळकर यांची निवड झाल्याबाबात त्यांना कवयित्री डॉ. किन्हाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कवि कादंबरीकर मनोज बोरगावकर यांनी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले आहेत की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यादाच दिल्लीत ९८ वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. याबाबत त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले असून दिल्लीकराचे स्वागत केले आहे.
विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून तीजला भिती नव्हती पराभवाची
जन्मासाठी नव्हती कधी हटून बसली, म्हणून तिजला नव्हती मरणाची या सुंदर भावनेने साहित्यीकांचा हात लिहता राहतो. खेड्यात लहान मुले जसे जत्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. तसा तमाम मराठी साहित्यिक या संमेलनाची वाट पाहत असतो. आज हा सोहळा दिल्लीत असून यानिमित्ताने सर्व साहित्यीकांना भेटता येईल, विचाराची शिदोरी बरोबर घेता येईलअसे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रकाशक, संपादक, राम शेवडीकर यांनी या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी सारस्वतांचा मेळावा दिल्लीत भरणार असून यांचे आकर्षण तर सर्वाना आहेच, तसेच अभिमान ही वाटतो असे सांगितले. तसेच दिल्लीत मराठीचा झेंडा असाच उंच फडकत राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या साहित्य संमेलनाच्या सर्व मराठी, अमराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा मराठी भाषा समितीच्या सदस्या प्रा. प्रतिक्षा तालंगकर या आपल्या शब्दातून व्यक्त होतात की, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही कवी कल्पना नसून वास्तव आहे. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हे दाखवून दिलेले आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्या मराठी माणसाची मुले इंग्रजी शाळेत भाषेत शिकतात, त्या मराठी माणसाने घरात, समाजात वावरताना मुलांसोबत मराठीत बोलले पाहिजे. मराठी भाषेचा वारसा देणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे. चला तर मग मराठी भाषेला ज्ञान भाषा बनविण्याची सुरवात आपल्या घरापासून करु यात व समृध्द मराठी भाषा बनवुयात, दिल्लीतील मराठी जागराचा आनंद घेऊ या !
0000