अभिजात मराठी आणि दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नवी दिल्ली येथे होऊ घातलेले ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलन अनेकप्रकारे ऐतिहासिक आहे. यापूर्वी १९५४ रोजी दिल्लीत झालेल्या संमेलनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ मिळाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर आता ७० वर्षांनी नवी दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीत संमेलन होणार अशी घोषणा झाल्यानंतर ‘यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा’ मिळणार आहे का?” याविषयी दोन्ही बाजूंनी चर्चा झडायला लागल्या आणि केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली. याचे कारण काही का असेना,  प्रा. रंगनाथ पठारे यांच्यासह अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होती ती पूर्ण झाली. आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन…

तसे पाहिले तर दिल्लीसह महाराष्ट्राबाहेर अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली. इंदूर, ग्वाल्हेर, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, भोपाळ, रायपूर, पणजी, बडोदे आणि घुमान ही ती शहरे. ही शहरे महाराष्ट्राबाहेर असली तरी या प्रत्येक शहराचा आणि मराठी माणसाचा, संस्कृतीचा अतिशय निकटचा संबंध आहे. शहाजीराजे भोसले, व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे मराठी दक्षिणेत गेली. शिवाजी महाराज, त्यांचे सरदार, पेशवे, विशेषतः पानीपतच्या युद्धासाठी अनेक मराठी माणसे उत्तरेत गेली आणि युद्धानंतर त्या भागातच थांबली. तेलंगणातही मराठी माणूस महाराष्ट्रातून चौदाव्या शतकापासून जातो आहे, स्थायिक होतो आहे. तिथे अनेक शतकांपासून मराठी वस्ती आहे. तिथल्या भजन-कीर्तनात अनेक मराठी अभंग गायले जातात. चारशे वर्षांची मराठी लेखनाची परंपरा आहे. दखनी भाषा तर मराठीच्या सांगाड्यावर उभी राहिली आहे असे प्रतिपादन डॉ. श्रीधरराव कुलकर्णींनी केले आहे. यामुळे मराठीचा आणि ज्याला आपण साकल्याने ‘महाराष्ट्र धर्म’ म्हणतो त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. त्यामुळे या प्रदेशांना मराठी भाषा तशी नवीन नाही. त्यामुळे संमेलन कुठेही असले तरी मला माझी मायबोली आज आली माहेराला। सभोवती साहित्यिक सुपुत्रांचा मेळा॥ ही सोपानदेव चौधरींची कविता आठवते. सोपानदेव चौधरींनी फार सुंदर वर्णन केले आहे या कवितेते मराठी भाषेचे! डॉ. ना. गो. नांदापुरकरांनीही मराठी भाषा कशी घडत गेली, विकसित होत गेली, जनसामान्यांतून राजदरबारी कशी पोहचली याविषयी फार लोभस शब्दांमध्ये लिहिले आहे.

‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे’, असे कवी कुसुमाग्रजांनी लिहून ठेवले आहे. आपण मात्र दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करुन भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. मराठी भाषेचे संमेलन जसे नियमितपणे होते तसे इतर भाषांचे होत नाही. याबाबत अनेक गैरमराठी साहित्यिकांनी कौतुकोद्गारच काढले आहेत.  गैर-मराठी भाषकांनीही मराठीत उत्तम साहित्यनिर्मिती केली आहे. मराठीपासून दूर गेलेल्या आणि परभाषिक संस्कृतीच्या प्रभावात येणाऱ्यांना मराठीशी पुन्हा जोडून घेण्याची हे संमेलन ही एक उत्तम संधी आहे. पंजाबमधील घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तेव्हा पंजाब आणि महाराष्ट्राच्या सातशे वर्षे जुन्या सांस्कृतिक समन्वयाला उजाळा मिळाला. तसेच दिल्ली येथेही घडेल. इतिहासातच नव्हे तर आजही दिल्ली आणि महाराष्टाचे राजनैतिक, सांस्कृतिक संबंध आहेतच.

मराठी ही प्राकृत भाषांमधील श्रेष्ठ भाषा आहे असा बहुमान कवी दंडीने केला आहे. असे असले तरी अगदी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या काळापासूनच मराठी लयाला जाते आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मराठीचे  स्थान राजदरबारी आणि समाजातही अवनत होत होते. तेव्हा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीही चिंता व्यक्त केली होती. आता ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्याने राजदरबारी तरी तिची हेळसांड होणार नाही अशी आशा आहे. समाजाने मात्र तिला अधिक मान देण्याची गरज आहे. त्यामुळे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठीला तिचे खरे स्थान तेव्हाच मिळेल जेव्हा ती ज्ञानभाषा होईल असे बहुतांश अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र,  मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यास समर्थ नाही, असा विचार करणारेही अनेक आहेत. मराठी भाषा सिद्धांत, विचार, व्याख्या, संज्ञा समर्थपणे मांडू शकते म्हणून ती ज्ञानभाषाही होऊ शकते. प्राचीन मराठीत असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामध्ये ज्ञानविचार आहेत, अनेक ग्रंथ असे आहेत जे व्यापार पद्धती, देशात होणारे व्यापार, देशाबाहेर जाणार्‍या व्यापाराची, व्यापारी मार्गांची माहिती देतात, त्यातून त्यावेळची अर्थव्यवस्था, समाजजीवन, संस्कृती, रीतीभाती या सगळ्यांची माहिती होते, मार्गदर्शन मिळते. ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती देणारे ग्रंथ आहेत. हे ज्ञानच नव्हे का? तेव्हा, गरज आहे ती आपण, सामन्य माणसांनी हे स्वीकारण्याची आणि तसा प्रचार-प्रसार करण्याची. असे केल्यास रोजगाराच्या संधीही आपोआप निर्माण होतील. तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, विज्ञान या ज्ञानशाखांचे लेखनही मराठीत आहेच. म्हणून, अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अजून मौलिक ज्ञान निर्माण होण्याची शक्यता मला दिसते आहे. अनुवादाचे कार्यही मराठीत मोठ्या प्रमाणावर होते आहे. मराठी भाषेतील साहित्याचा इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावा यासाठी मात्र आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

काळ बदलला की भाषा बदलते हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. प्रत्येक काळात भाषा टिकवणे आणि तिचा उत्कर्ष साधणे यापुढे बरीच आव्हाने असतात. त्या आव्हानांमध्ये तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या ओघात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता या अचंबित करणाऱ्या आणि तेवढेच विचार करायला भाग पाडणाऱ्या तंत्रज्ञानाशी आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात तर आपल्या मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करायलाच हवे. इतर भाषांमधले शब्द स्वीकारले की किंवा शब्दांची नवनिर्मिती होत असली की भाषा प्रवाही राहाते असे अभ्यासक म्हणतात. मराठीनेही अनेक भाषांमधील अनेक शब्द सहज स्वीकारले आहेत. पण कोणत्याही तंत्रज्ञानाने भाषा गिळंकृत करू नये याची काळजी मात्र आपणच घ्यायला हवी. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून सगळ्या आव्हानांना तोंड देत मराठीला आणखी पुढे घेऊन जाण्याचे बळ आपल्याला मिळेल, अशी मला खात्री आहे.

०००     

                  

  • प्रदीप दाते, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ, नागपूर, भ्रमणध्वनी 9422144817