सातारा जिल्ह्यातील अ. भा. मराठी साहित्य संमेलनांच्या आठवणींना उजळा

महाराष्ट्र गीतात आपण गौरवाने, अभिमानाने म्हणतो  की,…. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ! आता त्याच नवी दिल्लीत हे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वीही १९५४ साली ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे झाले होते. महाराष्ट्राला, मराठी भाषेला, संस्कृतीला शास्त्रशुद्ध, चिकित्सक अशा प्रबोधनाचे वैचारिक अधिष्ठान असलेले वाई, जि. सातारा येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ हे होते. तर त्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या हस्ते झाले होते. इतिहासाची पुनरावृत्ती होतेच या अनुषंगाने दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

प्रदीर्घकाळ केंद्र सरकारकडे प्रलंबित ‘अभिजात दर्जा’ मराठीला मिळाल्याने पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाचा योग आला आहे. यामुळेही मराठी माणसांचा आनंद द्विगुणित झाला आहे. स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आहेत हाही योगायोगच आहे. पवार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध नात्याने सर्वाधिक वेळा उपस्थित राहिलेले जाणते रसिक राज्यकर्ते आहेत.

साहित्य संमेलनाचा रंजक व प्रदीर्घ इतिहास

महाराष्ट्र हा प्रदीर्घ साहित्यिक, सांस्कृतिक, संतपरंपरा, प्रबोधन परंपरा, शौर्य, पराक्रम, अध्यात्म यातून घडलेला आहे. मराठी भाषा प्राचीन असल्याचा, म्हणजे साधारणपणे इ.स.पूर्व 300 वर्षापासून म्हणजे 2700 वर्षापासूनचा असल्याचा सर्वमान्य उल्लेख आहे. इ.स.पूर्व 300 मध्ये वररुची (कात्यायन) यांनी ‘प्राकृत प्रकाश’ हा ग्रंथ लिहिला होता. अर्थात तो त्यावेळी रुढ असलेल्या महाराष्ट्री प्राकृत भाषेत होता. याशिवाय त्याकाळी व नंतरही महाराष्ट्रातल्या विविध राजे, संस्थानिक, पराक्रमी योद्धे, लढाईतील विजेते, पराभूत अशा अनेकांनी जे प्राचीन शिलालेख, ताम्रपट, वीरगळ, विविध देवतांची स्तोत्रे, पोथ्या, ओव्या, अभंग, उखाणे इत्यादिमधून मराटी भाषेचे लिखित व बोली स्वरुपात संक्रमण होत गेले. ते महाराष्ट्री प्राकृत, मागधी, अर्धमागधी, पाली, संस्कृत यातूनही होत होते. संत ज्ञानेश्‍वरांनी 12 व्या शतकात लिहिलेली ‘ज्ञानेश्‍वरी’ हे मराठी भाषेचे अमृत लेणे आहे पण ते सन 1845 पर्यंत मौखिक, हस्तलिखित या स्वरुपात होते. कारण मुंबईत मुद्रणकला सन 1830 पासून ब्रिटीशांमुळे सुरु झाली. त्याआधी सेरामपूर येथे सन 1805 पासून मराठीत काही पुस्तके छापली जात होती. परंतु ‘ज्ञानेश्‍वरी’ हा वैश्‍विक साहित्य व मानवी मूल्य असलेला ग्रंथ असल्यामुळे पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ (6 जानेवारी 1832) व पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’ (1 मे 1840) सुरु करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्याचे महत्त्व कळाले होते. म्हणून त्यांनी अनेक ‘ज्ञानेश्‍वरी’ची हस्तलिखिते तपासून एकनाथकृत ‘ज्ञानेश्‍वरी’ची पाठभेदासहित शुद्धीकृत ‘ज्ञानेश्‍वरी’ लिहून सन 1845 साली मुंबईतल्या प्रभाकर छापखान्यात छापून प्रथमच प्रकाशित करुन मुद्रित प्रत उजेडात आणली.

अशा अनेक ग्रंथ, पुस्तके, लेख, निबंध, इतिहास, चरित्र, कादंबरी, नाटक, कविता, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र इत्यादी माध्यमातून उत्क्रांतित झालेली मराठी भाषा आता अभिजात भाषा हा दर्जा मिळवून आपला विविधांगी विस्तार करीत आहे. त्यामुळे हे सर्व मराठीत लिहिणारे सारस्वत यांना एकत्रित आणून मराठी भाषेची सांघिक सेवा व अस्तित्व अधिक गतिमान व्हावी असा विचार पुण्यामध्ये काही ग्रंथलेखकांच्या समूहामध्ये चर्चेला आला. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था होती. लोकमान्य टिळक, न.चिं. केळकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यासह चिंतामणराव वैद्य, विशूभाऊ राजवाडे आणि पांगारकर आदी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या साक्षीने महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) अधिकृत स्थापना झाली. पुण्याच्या सदाशिव पेठेतील मळेकर वाड्यात सन 1906 मध्ये या संस्थेचे कार्य सुरु झाले. ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था होय. खरं तर या परिषदेची स्थापनाच मुळी पुणे येथील सन 1906 च्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात झाली हे याचे वैशिष्ट्य होय.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ज्याला म्हणता येईल असे पहिले मराठी ग्रंथकार संमेलन पुण्यातील हिराबागमध्ये 11 मे 1878 रोजी झाले. याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पण ही परंपरा दरवर्षी सुरु राहिली नव्हती. दुसरे संमेलन (1885 पुणे), 20 वर्षांनी प्रथमच तिसरे संमेलन पुण्याबाहेर सातारा येथे (1905) आणि चौथे सन 1906 मध्ये परत पुण्यालाच आणि त्यात वर उल्लेखल्याप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही संस्था सुरु झाली. त्यामुळे पुढची संमेलने महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत सन 1964 पर्यंत 45 साहित्य संमेलने झाली. त्यानंतर अस्तित्वात आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाने सन 1965 च्या हैदराबाद संमेलनापासून पुढे रितसर संमेलने घ्यायला सुरुवात केली. सध्या या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, मध्यप्रदेश मराठी साहित्य परिषद, गोवा मराठी साहित्य परिषद, मराठी वाङ्मय मंडळ बडोदा आणि नव्याने कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा अशा घटक संस्था आहेत.

सातारा जिल्ह्याचे साहित्य भाग्य

या पार्श्‍वभूमीवर या संमेलनामध्ये सातारा जिल्हा भाग्यवान आहे. मुळातच अखंड सातारा जिल्ह्याची (सांगलीसह) आणि नंतर सातारा जिल्ह्याची साहित्य परंपरा फार मोठी आहे. सध्याच्या सातारा जिल्ह्यात आंबेडकर अकादमी पुरस्कृत किशोर बेडकिहाळ यांच्या नेतृत्त्वात विचारवेध संमेलने, पार्थ पोळके व विजय मांडके यांची विद्रोही साहित्य संमेलने, फलटण येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेतर्फे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखेतर्फे विनोद कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात सर्वात प्रथम सुरु केलेला मराठी भाषा पंधरवडा निमित्तचे साहित्यिक कार्यक्रम, कृष्णा कोयना संगमावरील कराडमध्ये दिवंगत मोहन कुलकर्णी व आनंद परांजपे यांनी चौफेर व कराड जिमखाना यांच्या माध्यमातून वाङ्मय व नाट्य क्षेत्रातले अनेक कार्यक्रम, कृष्णा काठावरील वाईचे लोकमान्य टिळक वाचनालयाची वसंत व्याख्यानमाला, सातारा येथील कै. वि. ल. चाफेकर यांनी सुरु केलेल्या व आजही चालू असलेल्या ज्ञान विकास मंडळाची व्याख्यानमाला, दिलीपसिंह भोसले व अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले (फलटण) यांनी सुरु केलेली प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमाला, सातारा नगरवाचनालय येथील व्याख्यानमाला, तसेच शिरीष चिटणीस यांच्या दीपलक्ष्मी पतसंस्थेचे साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम, ताराचंद्र आवळे यांच्या माणदेशी साहित्य सभेतर्फे होणारी कवी संमेलने, रविकिरण मंडळाचे प्रवर्तक कवि गिरीश (रहिमतपूर) व राजकवि यशवंत (य. दि. पेंढारकर) (चाफळ) येथील साहित्यिक व कविसंमेलने, अरुण गोडबोले (सातारा) व मधु नेने (वाई) आयोजित समर्थ सांप्रदायातील भक्ती कार्यक्रम, कादंबरीकार राजेंद्र माने व रवींद्र भारती यांच्या अश्‍वमेध संस्थेचे साहित्यिक कार्यक्रम, प्रकाश सस्ते (फलटण) आयोजित छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन इत्यादी वाड्मयीन व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांनी सातत्याने सातारा जिल्ह्याची साहित्यिक व सांस्कृतिक उंची वाढविली आहे.

राजपुरी, ता. जावली येथील सोमनाथ मंदिरातील एक मराठी शिलालेख इ.स. 10 व्या, 12 व्या शतकातील आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्याचा साहित्यिक प्रवास सुमारे 1500 वर्षांपूर्वीपासूनचा आहे. तसेच सातारा जिल्ह्यात नाईक निंबाळकर यांचे फलटण संस्थान व पंतप्रतिनिधी यांचे औंध संस्थान यांनी स्वातंत्र्य पूर्वकाळात कला, नाट्य, वाड्मय, क्रीडा, लेखक, कवि यांना अर्थसहाय्य आणि प्रोत्साहन दिले आहे.

सातारा जिल्ह्याने अनेक प्रसिद्ध साहित्यिक व नाटककार व संत वाङ्मयातील लेखक महाराष्ट्राला दिले आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (वाई), गोपाळ गणेश आगरकर (टेंबू, कराड), कवि गिरीश व नाटककार प्रा. वसंत कानेटकर (रहिमतपूर), प्राचार्य शिवाजीराव भोसले (फलटण), नाटककार शां.गो.गुप्ते (सातारा), ‘उपरा’कार लक्ष्मण माने (सातारा), बेबीताई कांबळे (फलटण), डॉ. आ. ह. साळुंखे (सातारा), पार्थ पोळके (सातारा), आधुनिक कविवर्य बा. सी. मर्ढेकर (मर्ढे), प्रा. दिलीप जगताप (वाई), जयवंत गुजर (सातारा रोड), जगन्नाथ शिंदे (पाचगणी), अरुण गोडबोले (सातारा), वासंती मुजुमदार (कराड), गौरी देशपांडे व जाई निमकर (फलटण), अशोक नायगावकर (वाई), रवींद्र भट (वाई), ना. सं. इनामदार (खटाव), विद्याधर म्हैसकर, दीपा गोवारीकर (कराड), प्रसिद्ध पटकथा लेखक प्रताप गंगावणे व कादंबरीकार डॉ. राजेंद्र माने (सातारा), डॉ. हे. वि. इनामदार (खटाव), रा. ना. चव्हाण (वाई), श्री. के. क्षीरसागर, चिंतामणराव कोल्हटकर व प्रा. श्री. म. माटे (सातारा), प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत (कराड), किशोर बेडकिहाळ (सातारा), बाळशास्त्री जांभेकरांचे चरित्र अभ्यासक रवींद्र बेडकिहाळ (फलटण), प्रा. यशवंत पाटणे (सातारा), ललित लेखक श्रीनिवास कुलकर्णी (कराड), शांतिलाल भंडारी, मिरदेव गायकवाड (कोरेगाव), ऐतिहासिक कादंबरीकार ना. ह. आपटे (कोरेगाव), परदेशस्थ असूनसुद्धा मराठीच्या गाढ्या अभ्यासक डॉ. मॅक्सीन बर्नसन (फलटण, सध्या हैद्राबाद), मराठी कादंबरीचे जनक बाबा पद्मजी व लक्ष्मण मोरेश्‍वर शास्त्री हळबे (वाई), डॉ. न. म. जोशी (पाटण) यांसह अनेक साहित्यिकांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील अ. भा. मराठी साहित्य संमेलने

नवी दिल्ली येथील साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्याचे या संमेलनात फार मोठे योगदान आहे. यापूर्वीच्या 97 संमेलनांपैकी 6 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने सातारा जिल्ह्यामध्ये झाली आहेत. सातारा, सांगली सह जेव्हा अखंड सातारा जिल्हा होता, त्यावेळी सन 1905 मध्ये सातारा येथे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे अध्यक्ष होते तत्कालीन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक रघुनाथ पांडुरंग करंदीकर. त्यानंतर सातारा जिल्हा स्वतंत्र झाल्यावर सातारा येथे 1962 – अध्यक्ष : नरहर गाडगीळ, 1975 – कराड – अध्यक्ष दुगाबाई भागवत, 1993 – सातारा – अध्यक्ष : विद्याधर गोखले, 2003 – कराड – अध्यक्ष : सुभाष भेंडे, 2009 – महाबळेश्‍वर – अध्यक्ष : आनंद यादव पण अनुपस्थित. यापैकी सन 1975 चे कराड आणि सन 2009 चे महाबळेश्‍वर येथील संमेलन वादग्रस्त झाले होते. आणीबाणीमध्ये विचार, भाषण आणि लेखन स्वातंत्र्यावर बरीचशी बंधने आली होती. अध्यक्ष होत्या प्रसिद्ध आणि अतिशय स्पष्टवक्त्या आणि बंडखोर स्वभावाच्या साहित्यिका दुर्गा भागवत आणि स्वागताध्यक्ष होते आणीबाणी लादणाऱ्या केंद्र सरकारमधील वजनदार परराष्ट्र मंत्री आणि कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण. त्यामुळे आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवरील हे संमेलन आधीच वादग्रस्त झाले होते. तसेच राजकीय नेत्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर कशाला घ्यायचे हा वादही त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चालू होता. परंतु, यशवंतराव चव्हाणांच्या संयमी व रसिक साहित्यप्रेमीच्या भूमिकेमुळे संमेलन यशस्वी झाले. परंतु, यशवंतरावांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा वावर कितपत असावा याबद्दलचे त्यांनी केलेले भाष्य सर्वच संमेलनाच्या इतिहासातील मार्गदर्शक असे होते ते म्हणाले होते, ‘‘मित्र हो, माझे भाषण संपले आहे. आता फक्त शेवट. प्राचीन काळी तपस्व्यांच्या आश्रमात शिरताना राज्यकर्ते आपली राजचिन्हे काढून साध्या वेशात जात असत. तसेच या शारदेच्या उपवनात येताना भारत सरकारच्या मंत्रिपदाची बिरुदावली मी बाहेर ठेवून आलो आहे. मातृभाषेवर उत्कट प्रेम करणारा एक मराठी माणूस म्हणून मी इथे आलो आहे. आमचा पाहुणचार भाजी – भाकरीचा असला, तरी तो भावमिश्रीत आहे. जिव्हाळ्याचा आहे. सकस आहे, हे ध्यानात असू द्या. तो तुम्ही गोड करुन घ्यावा.’’

महाबळेश्‍वर येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रख्यात ग्रामीण साहित्यिक आनंद यादव होते. परंतु त्यांच्या एका पुस्तकात संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय तसेच संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह (?) मजकूर असल्यामुळे त्यावर महाराष्ट्राच्या साहित्यविश्‍वात प्रचंड खळबळ झाली होती. अखेर आनंद यादव यांचे अध्यक्षीय भाषण छापून तयार होवूनसुद्धा त्यांना अध्यक्षपदावर उपस्थित होता आले नाही. संमेलन अध्यक्षाविनाच हे साहित्य संमेलन पार पडले. परंतु पुरोगामी विचारातील संपन्न असलेल्या आणि सर्वधर्मसमभाव जागृत ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीत असे घडायला नको होते. ही भावनाही साहित्यविश्‍वात होती.

सातारा साहित्य संमेलनामुळे बा.सी.मर्ढेकर आणि

‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकास चालना

सातारा येथे सन 1993 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात मराठी भाषा व्याकरणामधील शुद्ध, अशुद्धता यावर प्रचंड खल झाला होता. अध्यक्ष होते विद्याधर गोखले आणि स्वागताध्यक्ष होते छत्रपती श्रीमंत अभयसिंहराजे भोसले. या संमेलनात मुंबईच्या प्रसिद्ध साहित्यिक आणि आधुनिक कवीवर्य बा. सी. मर्ढेकर चरित्र व साहित्याच्या उपासक असलेल्या श्रीमती विजया राजाध्यक्ष. त्यांनी या संमेलनात सातारा जवळचे बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक मर्ढे (ता.जि.सातारा) येथे व्हावे याबद्दल आवाज उठवला आणि स्वागताध्यक्ष छत्रपती श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांनी तो तात्काळ मान्य केला. एव्हढेच नव्हे तर त्यांचे एक सहकारी साहित्यप्रेमी शिरीष चिटणीस यांना निवडक साहित्यिकांना मर्ढे घेवून जायला सांगितले व नियोजित स्मारकाची जागा पुढे कुठे असावी, स्मारक कसे असावे याचे नियोजन विजयाताईंना विचारुन ठरवावे अशी सूचना केली. त्यानंतर उशिरा का होईना पण महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, म.सा.प. शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी व सातारा येथील पत्रकार हरिष पाटणे यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे तातडीने लक्ष वेधून प्रथमच रुपये 37 लाखाचे अर्थसहाय्य मंजूर करुन घेतले व मर्ढेकर स्मारकाची देखणी इमारत पूर्ण झाली. त्यानंतर किशोर बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धडाडीने मर्ढेकरांच्या मूळ घराचे नूतनीकरणही झाले. आता पुन्हा ज्यांच्या पिताश्रींनी मर्ढे येथील मर्ढेकर स्मारकाला शुभारंभाची संजीवनी दिली, ते काम पुढे नेण्यासाठी दिवंगत श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र आता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले आहेत. त्यांनी मर्ढे गाव राष्ट्रीय नकाशावर आणून तिथे बा.सी.मर्ढेकर यांचे स्मारक राष्ट्रीय पातळीवरचे व्हावे असे प्रयत्न सुरु केले आहेत.

सन 1993 च्या सातारा येथील या साहित्य संमेलनाची आणखी एक फलश्रुती अशी. एक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ  मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे चरित्र व स्मारक यासाठी आग्रही होते. बाळशास्त्री जसे पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’चे व पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’चे संस्थापक संपादक होते तसे मुद्रित स्वरुपात मराठी ग्रंथाचे समीक्षण करणारे, मराठी निबंधाची परंपरा सुरु करणारे व अनेक ग्रंथांचे लेखक होते व ‘ज्ञानेश्‍वरी’ची पहिली मुद्रित प्रत तयार करणारे मराठी साहित्य व संस्कृतीप्रेमी होते. म्हणून त्यांचे स्मारक कोकणातल्या त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे व्हावे व त्यात साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या संमेलनावेळी केले होते. त्याचे स्वागत व दखल या संमेलनाला खास उपस्थित असलेले प्रसिद्ध कवी, साहित्यिक कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर), नाटककार व लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले, कोकणातले प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी घेतली. त्यामुळे पुढे या स्मारकास चालना मिळाली आणि ते स्मारक रविंद्र बेडकिहाळ, अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेने पुढाकार घेवून सन 1993 मध्ये पूर्ण केले.

संमेलन अध्यक्षातही सातारची बाजी

आजपर्यंतच्या 98 संमेलनाध्यक्षांमध्ये 17 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (नव्या व जुन्या) सातारा जिल्ह्याने दिले आहेत; ही सातारा जिल्ह्याची साहित्य क्षेत्रातील फार मोठी अभिमानाची बाब आहे. 1905 मध्ये प्रथमच साताऱ्यात झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष खुद्द सातारचेच प्रसिद्ध वकील व लेखक रघुनाथ पांडुरंग करंदीकर होते. त्यानंतर औंधचे राजे भगवानराव पंतप्रतिनिधी (1935, इंदोर), प्रा. श्री. म. माटे (1943, सांगली), आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर (1949, पुणे), यशंवत पेंढारकर (1950, मुंबई), प्रा. पु. पां. कुलकर्णी (1952, अमळनेर), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (1954, नवी दिल्ली), प्रा. श्री. के. क्षीरसागर (1941, मिरज), न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ (1962, सातारा), औंध संस्थानातील ग. दि. माडगुळकर (1973, यवतमाळ), व्यंकटेश माडगुळकर (1983, अंबेजोगाई), तसेच याच संस्थानमधील शंकरराव खरात (1984, जळगांव), प्रा. वसंत कानेटकर (1988, ठाणे), संतसाहित्यिक डॉ. यू. म. पठाण (1990, पुणे), ऐतिहासिक कादंबरीकार ना. स. इनामदार (1997, तत्कालीन अहमदनगर व आत्ताचे अहिल्यानगर), ज्येष्ठ कवी वसंत बापट (1999, मुंबई), प्रा. रा. ग. जाधव (2004 तत्कालीन औरंगाबाद व सध्याचे छत्रपती संभाजी नगर), साहित्यसम्राट न. चिं. केळकर (1921, बडोदा) यातील काहींचे जन्मगाव साताऱ्यातील तर काहींचे प्रदीर्घ वास्तव्य साताऱ्यामध्ये असे आहे. निवडणुकीशिवाय संमेलनाध्यक्ष ठरावही सातारा जिल्ह्यातूनच सन 2019 पूर्वी संमेलन अध्यक्षाची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांच्या कार्यकारी मंडळ सदस्यांतून होत असे. महामंडळ अस्तित्वात येईपर्यंत (1961) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे संमेलने आयोजित करीत होती. तेव्हा अध्यक्षांची नियुक्ती सन्मानाने होत होती. पण 1961नंतर हळूहळू संमेलन जिथे होईल तिथले प्रादेशिक स्वागताध्यक्ष बहुतांश राजकारणीच होत होते. त्यामुळे स्वागत समितीतील सदस्यांची मते यावर राजकारण होवू लागले. निवडणूक प्रक्रियाही पोस्टल बॅलेटने. त्यानंतर नियोजित संमेलन अध्यक्षांची निवड सर्व घटक संस्थांकडून सुचविलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांमधून महामंडळात सन्मानाने सन 2019 पासून होऊ लागली. या पाठीमागे सातारचे पाठबळ होते हे सातारा जिल्ह्याला अभिमानास्पद आहे. अशा पद्धतीने पहिलीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सन 2019 मधील 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांनी सुचविलेल्या संत वाङ्मयाच्या प्रसिद्ध लेखिका डॉ. अरुणा ढेरे (पुणे) यांची सन्मानाने निवड महामंडळाने केली.

यशवंतराव चव्हाण व महाराष्ट्र शासनाचे बहुमोल योगदान

यशवंतराव चव्हाण हे स्वत: उत्तम रसिक, वाचक, लेखक, समीक्षक, संयमी वक्ता असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचे (1960) पहिले प्रभावशाली मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती, लोककला यासाठी राज्यशासनामार्फत बहुमोल योगदान दिले. त्यामुळे मराठी विश्‍वकोश मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, स्वतंत्र मराठी भाषा विभाग, लोकसाहित्य समिती आदी उपक्रम त्यांनी सुरु केले. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते रसिक साहित्यिक म्हणून उपस्थित राहिले आहेत. अनेक साहित्यिक, नाटककार, कलाकार यांना त्यांनी सहकार्य केले आहे. त्यांच्याशी मैत्र राखले होते. स्वत: त्यांनी 17 ग्रंथ लिहिले आहेत. अनेक ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना लिहील्या आहेत. त्यांची भाषणे म्हणजे अमूल्य विचारांच्या तुषारांचा अमृत संगम अशी असत. साहित्य संमेलनांना राजाश्रय (शासनाचा) त्यांनीच सुरु केला.

आजचे शासनही साहित्याभिमुख आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साहित्य, नाट्य, कला, क्रीडा यासाठी भक्कम अर्थसहाय्य देवून या क्षेत्रातील अनेकांना प्रोत्साहन दिले आहे. विशेषत: या शासनाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निधी गेल्या 2 वर्षांपासून रु. 2 कोटी केला आहे. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून भरघोस अर्थसहाय्याचे अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यातून मराठी भाषा आता ज्ञान भाषा व्हावी यासाठी निश्‍चितच ठोस प्रयत्न होतील. आपली मराठी भाषा किती प्राचीन आहे आणि किती संपन्न आहे याचा प्रसार जिल्ह्याजिल्ह्यातून होईल. मराठी भाषा संशोधनासाठी अनुदान, जिल्हावार मराठी भाषा भवन व साहित्य केंद्र, राज्यातील 42 बोली भाषांमधील साहित्याचा विस्तार, इतर देशी व प्रमुख परदेशी भाषांमधील उत्तम ग्रंथांचे मराठीत अनुवाद, इतर प्रमुख देशी व प्रमुख परदेशी भाषांमधील ग्रंथ मराठी भाषेत होतील. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यातून राज्यातला शैक्षणिक विस्तार वाढेल. मराठीतील साहित्य निर्मिती वाढेल. राज्यातील साहित्य संस्थांना भरघोस आर्थिक बळ मिळेल. हे सारे आपल्या भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाल्यामुळे होईल.

जाता जाता एकच अपेक्षा

उद्घाटन सोहळा ऐतिहासिक असा होणारच आहे. पण संपूर्ण देशातील आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणसांच्या अस्मितेचा ऐतिहासिक जागरही त्यातून होणार आहे. त्यामुळे आपल्या पूर्वसुरींचेही स्मरण यावेळी झाले पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांचे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यातील दूरदृष्टीच्या योगदानाचीही राष्ट्रीय दखल घेतली पाहिजे. त्यांच्या नावाने ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मराठी साहित्य अकादमी’ राज्यशासनाने स्थापन करावी, यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व  अजित पवार यांनी ही मागणी प्रधानमंत्री यांच्याकडून विशेष भरघोस अनुदानासहीत मंजूर करुन घ्यावी. स्वागताध्यक्ष  शरद पवार यांनीही आपल्या स्वागताच्या भाषणात हा मुद्दा अधोरेखित करावा, अशी अनेक साहित्यिकांची अपेक्षा आहे.

तेव्हा या मार्गाचे आतंरराष्ट्रीय मार्गात रुपांतर करण्याचे आव्हान राज्यशासन व साहित्यिक संस्था आणि मराठी भाषाप्रेमी यांनी स्वीकारले पाहिजे. त्याचे प्रवेशद्वार ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मराठी साहित्य अकादमी’’ मधून खुले व्हावे. दिल्लीतील हे संमेलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी व्हावे ही शुभेच्छा !

०००

 

– रविंद्र बेडकिहाळ, फलटण.

(मोबा. 9422400321)

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष आहेत. तसेच गेली 12 वर्षे महाराष्ट्रात प्रथमच फलटण येथे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आयोजनातील प्रमुख संयोजक आहेत.)