माय मराठीला अभिजात दर्जा; भाषिक आणि वाङ्मय परंपरेचा मागोवा

सुमारे अडीच हजार वर्षाचा समृद्ध वारसा लाभलेल्या मायमराठीचे संतश्रेष्ठ ज्ञानोबाराया

‘माझा मराठीचे बोलू कवतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।’

असे यथार्थ वर्णन करतात. विमलसुरीचे ‘पौमचरियम’, भद्रबाहुचे ‘आवश्यक निर्युक्ती’, कालिदासाचे ‘शाकुंतल’, प्रवरसेनाचे ‘सेतुबंध,’ शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ आणि ‘पाणिनीच्या कालखंडापासूनचा मराठी भाषेच्या रुपकांचा समृद्ध इतिहास असलेल्या  या भाषेच्या प्राचीनत्वाची आणि अभिजाततेची महती सांगावी तेवढी थोडीच आहे. इ.स.780 च्या सुमारास लिहिलेल्या उद्योतनसुरी यांच्या ‘कुवलमाला’ ग्रंथातील मराठी माणसाचे वर्णन करणारी…

‘दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य |

दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्ठे|’

अर्थात बळकट, ठेंगण्या, धडमुट, काळ्यासावळ्या रंगाच्या काटक, अभिमानी, भांडखोर, सहनशील, कलहशील  व ‘ दिण्णले’ (दिले) ‘गहिल्ले’ (घेतले) असे बोलणाऱ्या मरहठ्यास त्याने पहिले ही मराठीची पाऊलखुण असो की इ.स.वि.सन 1116-17 सालची श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पायथ्याशी घडवलेल्या शिलालेखातील –

‘श्री चावुण्ड राजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले’

हा उल्लेख असो अथवा बाराव्या शतकातील मुकुंदराज स्वामी यांनी लिहिलेला विवेकसिंधु हा मराठी आद्य काव्यग्रंथ किंवा महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींचे शिष्य नागदेवाचार्य आणि म्हाईंभट्ट यांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेचा केलेला खणखणीत पुरस्कार या सगळ्यातून मराठीचा अभिजात, प्राचीन  समृद्ध वारसा ठळकपणे अधोरेखित होतो. कोणतीही भाषा काही एकाएकी प्रगल्भ होत नाही. ती तशी होण्यासाठी प्रवाही असावी लागते, त्यासाठी अनेक शतकांचा कालखंड जावा लागतो. मराठीत आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ ‘गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षे जुना आहे, शिवाय शेकडो शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे मराठीच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात.

मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असे नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे: पुढे कालिदास, म्हाईंभट्ट, नागदेवाचार्य, ज्ञानोबा-तुकारामांसह सर्व संत महात्म्यांनी मराठी भाषेला सुयोग्य वळणे दिली. त्यापुढे मराठीतील अनेक शब्दरत्नाकारांनी फारसी अरबी शब्दांचा मऱ्हाठीत मेळ घालून लिहिल्या गेलेल्या बखरींचा दस्तावेज, पोवाडे, लावण्या, लोकवाङ्मय आणि केशवसुतांनी फुंकलेली तुतारी असा मराठी भाषेचा बदलत गेलेला अविष्काराचा प्रवास प्रवाही व संपन्न राहिलेला आहे. अशा या प्रवाही मराठी साहित्यातील अनेक सारस्वतांनी आपल्या साहित्य साधनेतून, शब्दसामर्थ्यातून या भाषेला सजविले, फुलविले व मोठे करुन मराठीचा वेलू गगणावरी नेला.

या दरम्यान मराठी भाषकांच्या महाराष्ट्रात कैक राजवटी आल्या आणि गेल्या. समाज बदलला, जगणे बदलले त्याप्रमाने मराठीही बदलत गेली. रीत बदलली पण अभिजाततेचा पोत मात्र तोच राहिला आहे.

मुळातच जातिवंत अभिजाततेच्या बळावर हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा निर्माण  करणारी मायमराठी तामीळ, संस्कृत, तेलगू, उन्नड, मल्याळम, उडिया या भाषांच्या बरोबरीने अभिजाततेच्या संगतीत व पंगतीत मागील वर्षापर्यंत बसली नव्हती. ही सल मराठीजणांच्या मनात कायम होती. यासाठी शासन, प्रशासन आणि भाषाप्रेमींच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरू होते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 10 जानेवारी 2012 रोजी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीत प्रा. पठारे यांच्या समवेत प्रा. हरी नरके व अन्य सन्माननिय सदस्य होते. समितीने 52 बोली भाषेपासून नटलेल्या मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करुन  प्राचीन व अभिजाततेचे वस्तुनिष्ठ पुरावे गोळा केले. तसा अहवाल 12 जुलै 2013 रोजी साहित्य अकादमी आणि केंद्र सरकारला सादर केला, या समितीने आपल्या 500 पानी अहवालातून माय मराठीच्या अभिजातता आणि प्राचीनत्वाबद्दल  प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक गैरसमजाचे परिमार्जन केले.

हा अहवाल आणि मराठी भाषाप्रेमींच्या तीव्र मागणीची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्र सरकारने दिनांक 03 ऑक्टोंबर 2024 ला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. शासनस्तरावरून मायमराठी अभिजात असल्याची शिक्के कट्यारीसह मान्यता मिळाली.

अभिजाततेच्या कसोट्यांवर उतरलेल्या आतापर्यंत भारतातील मराठीसह (2024), तामिळ (सन 2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलगू (2008), मल्याळम (2013), उडिया (2014), पाली (2024), पाकृत (2024), आसामी (2024), बंगाली (2024) या 11 वैशिष्ट्यपूर्ण भाषांना अभिजाततेचा दर्जा केंद्र सरकारद्वारे दिला गेला आहे.

भाषेला जेव्हा अशा प्रकारचा दर्जा मिळतो, तेव्हा त्या भाषेची नुसती प्रतिष्ठाच वाढत नाही, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  पातळीवर  संबधित भाषेसंदर्भात अनेक अनुकूल दुरगामी  परिणाम होतात.  त्या भाषेच्या संवर्धनासाठी अधिक चालना मिळते. केंद्र सरकारकडून त्या भाषेच्या विकासकार्यासाठी त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. यातून मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन आणि साहित्य संग्रह प्रकाशित करणे, प्राचीन दुर्मीळ अभिजात ग्रंथ अनुवाद करणे, त्यांचे प्रकाशन करून प्रचार-प्रसार करणे, ग्रंथालयांना बळकट करणे, भाषेचा उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी यांना भरीव मदत करणे इत्यादी भाषासंवर्धनासाठीची कामे केली जातात. यामुळे सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

अभिजात भाषांच्या पंगतीत बसण्याचे रीतसर अहोभाग्य आपल्या मायमराठीला नुकतेच प्राप्त आले असले, तरी भाषा म्हणून मराठी ही अभिजात होती आणि आहेच. मराठीची ही अभिजातता तोलामोलाने टिकून राहायला हवी असेल, तर तिच्या अभिवृद्धीचा गोवर्धन उचलून धरणे की आपल्या सगळ्या मराठी जणांची जबाबदारी आहे.

०००

  • श्रीमती रुपाली उगे, लेखालिपिक, माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूर