मध्ययुगीन साहित्य निर्मितीत महानुभावांचे योगदान

महाराष्ट्राचा इतिहास पाहिल्यास लक्षात येते की सांस्कृतिकदृष्टया महाराष्ट्र अतिशय प्रगत राज्य आहे. विविध धर्म आणि संप्रदायांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला श्रीमंती प्राप्त करुन दिली आहे. महाराष्ट्रात विविध धर्म आणि संप्रदायांनी अतिशय स्वतंत्रपणे आपल्या तत्त्चज्ञानाचा आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला आहे. यामध्ये वारकरी, महानुभाव, दत्त, शैव, वैष्णव, नाथ, रामदासी, नागेश आदी विविध संप्रदायांचा समावेश आहे. यात बाराव्या शतकापासून आजही आपला प्रभाव कायम ठेवून असणाऱ्या संप्रदायांमध्ये दोन संप्रदाय आहेत. एक म्हणजे वारकरी आणि दुसरा म्हणजे महानुभाव संप्रदाय होय.

आजही महाराष्ट्रातल्या गावा-गावात वारकरी आणि महानुभाव संप्रदायाचे अनुयायी आढळतात. ज्ञानेश्वर ते तुकाराम या संतपरंपरेने वारकरी संप्रदायाला जनमानसात नेण्याचे काम केले. वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेत या संप्रदायाला एक अधिष्ठान प्राप्त करुन दिले. दुसरीकडे वारकरी संप्रदायाच्या आधीच महाराष्ट्रात जम बसविणाऱ्या महानुभाव पंथाची धुरा श्रीचक्रधर स्वामी यांच्या खांद्यावर होती. कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या जंजाळात अडकलेल्या सर्वसामान्य माणसाला भक्तीचा सर्वप्रथम अधिकार मिळवून देण्यात श्रीचक्रधरस्वामींनी पुढाकार घेतला. महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. मध्ययुगीन कालखंडात महानुभावांनी केवळ भक्तीच नाही तर मराठी साहित्य निर्मितीचा देखील पाया रचला आहे. मराठीतील आद्य गद्य व पद्य ग्रंथ निर्माण करणाऱ्या महानुभावांकडे चरित्र, व्याकरण, कथा, भाष्य, महाभाष्य, काव्य, महाकाव्य, आख्यान, टीका, स्थळवर्णने, इतिहास, साधनग्रंथ, तत्त्वज्ञान, आणि स्फुट रचना आदींच्याही आद्यत्वाचा मान जातो. किंबहुना साहित्याला विविधांगीपणे मांडण्याचे काम महानुभावांनी या महाराष्ट्रात सर्व प्रथम केले आहे.

श्रीचक्रधर स्वामी हेच महानुभाव वाङ्मयाचे प्रेरणास्थान

महानुभाव पंथाच्या उदयाचा काळ साधारणपणे बारावे शतक मानला गेला आहे. या काळात महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. हा मराठी भाषेच्या दृष्टीने सुवर्णकाळ मानला जातो. कारण याच काळात महानुभाव वाङ्मय निर्मितीला प्रारंभ झाला. महानुभांवानी मराठीतून वाङ्मय निर्मितीचा पाया घातला. मराठीतील पहिला ग्रंथ ‘लीळाचरित्र’ याच काळात लिहिल्या गेला. महानुभाव पंथाला जनसामान्यात पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य श्रीचक्रधर स्वामींनी केले. गुजरातमधील भडोच येथून स्वामी महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रातील गावागावात जाऊन स्वामींनी परंपरेच्या कडीकुलूपात बंदिस्त असलेल्या धर्म या संकल्पनेला मुक्त केले. सर्वसामान्यांना धर्माची दारे सताड उघडी करुन दिली. धर्म ही कोणा एकाची मक्तेदारी नाही, तो सर्वांसाठी उपलब्ध आहे हे स्वामींनी पटवून दिले. महिला व शुद्रांना देखील धर्माचा अधिकार असल्याचे स्वामींनी ठासून सांगितले. सुमारे ६२ वर्ष स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात परिभ्रमण केले. येथील लोकांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी झाले. त्यांना कुप्रथांपासून निवृत्त केले. त्यांच्यावर योग्य ते संस्कार करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या भाषेत रुचेल आणि समजेल अशा त्यांच्या बोली भाषेमध्ये आदर्श जीवन कसे जगावे याचे निरुपण केले. संपूर्ण महाराष्ट्र स्वामींच्या अलौलिक सामर्थ्य, सौंदर्य व निरुपणाने भारावून गेला होता. स्वामींनी स्वतः कुठलाच ग्रंथ लिहिला नाही.

परंतु त्यांनी जे निरुपण केले ते त्यांच्या उत्तरापंथी गमनानंतर त्यांच्या शिष्यांनी शब्दबद्ध केले. यामध्ये सर्वप्रथम निर्मिती झाली ती ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाची. म्हाइंभट या विद्वान शिष्याने लीळाचरित्राची बांधणी केली. या ग्रंथाची निर्मिती एक आश्चर्यच होते. यामध्ये काय नाही? तत्त्वज्ञान, प्रवासवर्णन, लोककथा, चरित्र, नितीकथा, भौगोलिक वर्णन, इतिहास, लोकरिती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कृषीशास्त्र, पाककला, लोकजीवन, राजकारण अशा अनेक विषयांचा परामर्श लीळाचरित्रात घेतला आहे. बाराव्या शतकातील महाराष्ट्राचे अंतरंग उलगडून दाखविण्याचे काम लीळाचरित्राने केले आहे. लीळाचरित्राला महानुभाव वाङ्मयाचा बीजग्रंथ देखील मानला गेले आहे. कारण याच ग्रंथातातून पुढे महानुभावांचे विविध ग्रंथ निर्माण झाले. सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, आचारस्थळ, विचारस्थळ, लक्षणस्थळ अशा विविध ग्रंथांच्या निर्मितीचे मुळ लीळाचरित्रात आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ भाषिकदृष्टयाही अतिशय संपन्न ग्रंथ आहे. व्याकरण, छंद, अंलकार, वाक्प्रचार, म्हणी, यांचा अंतर्भाव लीळाचरित्रात मुबलक आहे. याशिवाय गेयता देखील लीळाचरित्रात अनुभवयास मिळते. त्यामुळेच लीळाचरित्राला महाकाव्य म्हणणे वावगे ठरणार नाही. वरवर हे आपल्याला श्रीचक्रधर स्वामींचे चरित्र असल्याचे वाटते. परंतु ज्यावेळी आपण लीळाचरित्राच्या अंतरंगात शिरतो त्यावेळी असे लक्षात येते की, हे कोणा एका व्यक्तीचे चरित्र नसून अनेक व्यक्तिमत्वाचा कोश ग्रंथ आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील बाराव्या शतकातील यादवकालीन साम्राज्याची स्थिती, संस्कृती, भाषा यांचा देखील मागोवा लीळाचरित्र हा ग्रंथ घेताना दिसतो. हा ग्रंथ निर्माण करुन म्हाइंभट यांनी मराठी भाषेवर मोठे उपकार केले आहेत.

लीळाचरित्रातून इतर ग्रंथांची निर्मिती

लीळाचरित्रापासून स्फूर्ती घेऊन पुढे अनेकांनी वाङ्मय निर्मिती केली. महानुभावांची वाङ्मय निर्मिती ही शास्त्रीय कसोटीवर खरी उतरली आहे. महानुभाव साहित्याचे वैशिष्टय म्हणजे यात जेवढे समृद्ध गद्य वाङ्मय आहे तेवढ‌्याच तोडीचे समृद्ध पद्य वाङ्मय आहे. महानुभावांच्या पद्य वाङ्मयाचा आढावा घेतला तर आपल्या डोळयापुढे सर्वप्रथम ग्रंथ येतो मराठीतील आद्य काव्य ‘धवळे. महादाइसा उर्फ महदंबा हिने रचलेले हे काव्य भक्ती रसाचा झरा आहे. असे असले तरी यादवकालीन महाराष्ट्राचा आरसा म्हणून आपल्याला या ग्रंथाकडे पाहता येते. या काव्याची भाषा अतिशय साधी, सोपी व रसाळ आहे. यादवकालीन महाराष्ट्राची संस्कृती आणि लोकजीवन यांचे दर्शन हे काव्य घडविते. महानुभावांचे साती ग्रंथ हे तर काव्य निर्मितीचे उत्तम उदाहरण आहे. नरेंद्राचे ‘रुक्मिणी स्वयंवर’, दामोदर पंडिताचे ‘वच्छाहरण’, भास्करभट बोरीकरांचे ‘उद्धवगीता’ व ‘शिशुपाळवध’, नारायणबास बहाळे यांचे ‘रिद्धपूरवर्णन’, विश्वनाथबासांचा ‘ज्ञानप्रबोध’ आणि रवळोबासांचे ‘सहृयाद्रीवर्णन’ हे मराठीतील उत्तम महाकाव्य म्हणून ओळखले जातात. या काव्य ग्रंथांचा विचार केल्याशिवाय मराठी भाषेचा इतिहास पुर्ण होवू शकत नाही. विशेष म्हणजे अतिशय प्रतिभासंपन्न कवींनी या काव्यग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांचे अनंत उपकार या मायमराठीवर व महाराष्ट्रावर आहेत. ‘रत्नमालास्त्रोत’ आणि ‘तीर्थमाला’ हे देखील महत्त्वाचे काव्यग्रंथ महानुभावांनी मराठी भाषेला दिले. याशिवाय श्रीकृष्णचरित्रपर आख्यान काव्य, श्रीदत्तात्रेय बाळक्रीडा, श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहकथा, संतोषमुनीचे रुक्मिीणीस्वयंवर, गोपाळकवीची भागवतकथा, कृष्णमुनी किंवा डिंभकवीकृत नवखंड रुक्मिीणीस्वयंवर, पंडित लक्षमींद्रकृत रुक्मिीणी स्वयंवर, एल्हणकवीचे रुक्मिीणीस्वयंवर, द्रौपदीस्वयंवर, हंसांबा स्वयंवर, शल्यपर्व आदी विविध काव्यग्रंथांना निर्माण करुन महानुभावांनी मराठी काव्य प्रांताचे दालन समृद्ध केले आहे.

यादवकाळात गद्य ग्रंथांच्या वाटयाला महानुभाव लेखक सोडता इतर लेखक गेल्याचे आढळत नाही. मात्र महानुभावांची गद्य निर्मितीची समृद्ध परंपरा आहे. मुळात महानुभावांची वाङ्मय निर्मितीची सुरुवातच लीळाचरित्रासारख्या समृद्ध ग्रंथाने झाली असल्यामुळे पुढे त्याचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते. म्हाइंभटांनी ‘गोविंदप्रभूचरित्र’ हा वऱ्हाडी भाषेचा उत्तम नमुना असलेला ग्रंथ लिहिला. महानुभावांचे पहिले आचार्य नागदेवाचार्य व इतर आचार्यांचे आणि स्वामींच्या भक्तांचे दर्शन घडविणारा ‘स्मृतिस्थळ’ हा एकापेक्षा अधिक व्यक्तींचे चरित्र असलेला मराठीतील पहिला ग्रंथ  आहे. हा ग्रंथ देखील यादवकालीन महाराष्ट्राचे समाजजीवन चित्रित करतो. केसोबास यांनी ‘सूत्रपाठ’ आणि ‘दृष्टांतपाठ’ हे अद्वितीय ग्रंथ लिहून मराठी भाषेत तत्त्वज्ञानपर ग्रंथ लिखाणाचा पाया रचला. ‘दृष्टांतपाठ’ हा मराठी कथा साहित्यातील एक अनमोल ग्रंथ आहे. सूत्रपाठातूनच पुढे आचारस्थळ, विचारस्थळ, लक्षणस्थळ या स्थळ ग्रंथांची निर्मिती झाली. याच ग्रंथांवर पुढे भाष्य ग्रंथ लिहिल्या गेले ज्याला ‘बंध’ असे म्हणतात.

टीकाग्रंथात देखील महानुभावांचा हातखंडा आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेवर महानुभावांनी सर्वाधिक टीका लिहिल्या आहेत. वि. ल. भावे यांच्या कवी-काव्य सुचीत ३१ गीताटीका महानुभावांनी लिहिल्या असल्याचा उल्लेख आहे. कृष्णदास महानुभावांनी ७८ गीताटीकांचा शोध लावला आहे. त्यापैकी सुमारे ४० गीताटीका उपलब्ध आहेत. यापैकी बहुतेक टीका या मराठी भाषेत आहेत. काही गीता टीका या हिंदी भाषेत आहेत.

स्थळवर्णनात देखील महानुभाव मागे नाहीत. ‘डोमेग्रामवर्णन’, ‘ऋद्धिपूरवर्णन’, ‘प्रतिष्ठाणवर्णन’, ‘पांचाळेश्वर-आत्मतीर्थ महात्म्य’ आदी स्थळवर्णनपर ग्रंथ महानुभावांनी मराठीला दिलेत. या स्थळवर्णनपर ग्रंथांमधून यादवकालीन महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला अभ्यासावयास मिळतो. साधनग्रंथ ही देखील महानुभावांची एक स्वतंत्र निर्मिती आहे. यात लक्षणरत्नाकर, भीष्माचार्याचे पंचवार्तिक, हेतुस्थळ, निरुक्तशेष, गोपीभास्करचा प्रश्ऩार्णव, स्थानपोथी आणि तीर्थमालिका, टीपग्रंथ, सरवळे यांचा समावेश आहे. याशिवाय महानुभावांच्या काही स्फुट रचना देखील आहेत. यात चौपद्या, पदे, धुवे, लोकगीते, स्त्रोते, आरत्या आदींचा समावेश आहे.

महानुभाव ग्रंथकारांनी केवळ काव्यग्रंथ ओवीबद्ध करुन एका छंदाची प्रतिष्ठा केली नाही तर छंदशास्त्रामध्ये अनेक वृत्त व अलंकार यांची भर घातली आहे. पाणिनीच्या तोडीचे व्याकरण शास्त्र निर्माण करुन मराठी ही संस्कृतची बटीक नाही तर एक समृद्ध भाषा आहे हे महानुभावांनी सिद्ध केले.  सर्वसामान्यांना समजेल अशा मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करुन महानुभावांनी मराठी ही धर्मभाषा बनवून सर्व स्तरातील लोकांना खरा धर्म समजावून दिला. महानुभावांचे हे कार्य खरोखरच महान आहे. मध्ययुगीन कालखंडात महानुभाव साहित्याने दिलेलं योगदान अमूल्य आहे.

प्रा. डॉ. किरण वाघमारे,

सहायक प्राध्यापक

मोबाईल : ९८५०९०२१५४