अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विशेष लेख
डॉ. हरिश्चंद्र बोरकर एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. आयुष्य एखाद्या कार्यास झोकून देणे हा त्यांचा विशेष आहे. त्यांची प्रयत्नवादी प्रवृत्ती आहे. जीव ओतून कार्य करण्याची किमया ते आजन्म करीत आहेत. भाषा ही माणसाला जाेडत असते. भाषा विचारविनिमयाचे माध्यम आहे. या भाषेच्या विविध छटा असतात. त्या शोधण्याचे महत्कार्य त्यांनी केले. भाषेला बोली समृद्ध करीत असतात. म्हणून झाडीबोलीचा अभ्यास करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय त्यांनी ठरविले. या बोलीचा भाषा वैज्ञानिक अभ्यास करणे हा आपला जीवनहेतू ठरवून त्यांनी जीवाचे रान केले आहे. आपण जी व्यवहारात बोली बोलतो ही फार पुरातन काळापासून रूढ आहे. विवेकसिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी या महान ग्रंथात या झाडीबोलीतील शब्दांचा आढळ होतांना दिसतो. या बोलीभाषेला मानाचे स्थान प्राप्त करून देण्याचे महान कार्य आदरणीय बोरकरांनी केले आहे.
भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या विदर्भाच्या पूर्वेकडील चार जिल्ह्यात प्रामुख्याने ही झाडीबोली बोलली जाते. व्याकरणशास्त्रदृष्ट्या या बोलीचा शास्त्रीय अभ्यास करण्याचे धाडस बोरकर सरांनी लीलया केले. आणि वन्हाडी, कोकणी, मालवणी, अहिराणी या बोलींच्या बरोबरीने ही बोलीसुद्धा महत्वपूर्ण व श्रेष्ठ आहे. हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. त्यामुळेच त्यांना ‘झाडीबोलीचे प्रणेते’ असे संबोधणे अगदी यथार्थ व योग्य आहे.
आपल्या समाजजीवनातील लोककला जिवंत राहायला हव्यात ही बोरकर सरांची तळमळ आहे. कारण या लोककलांनीच समाजाचे मानसिक व भावनिक भरणपोषण केले आहे. त्यामुळे प्राचीनतम काळापासून लोककलांचे जतन व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. कारण या सर्व कला लोकाश्रयावर अवलंबून असतात. केवळ लोकांचे मनोरंजनच नव्हे तर प्रबोधन करणे हे ही लोककलेचे उद्दिष्ट असते. दंडार, खडीगंमत, डहाका, गोंधळ या सर्व लोककला व लोकनाट्यांकडे बोरकर सरांनी सहेतुकपणे पाहिले व समाजात या लोककला हळूहळू विरून जात आहेत या लोककलेकडे दुर्लक्ष होत आहे हे त्यांच्या लक्षात आले. या लोककलांना जिवंत ठेवायला पाहिजे. म्हणून वाङमयीनदृष्ट्या यांचेही मोठेपण लोकांच्या नजरेला आणण्याचे कार्य बोरकर सरांनी केले आहे. लोककलांच्या संहिता गोळा करणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्या लोककलांना व्यासपीठावर सादरीकरण करून दाखविणे हा एकच ध्यास बोरकर सरांनी घेतला आणि गावागावातील जे लोक कलाकार आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन करून आजच्या वर्तमान काळानुरूप त्यात बदल करून नव्याने त्या लोककला सादर करण्याकडे त्यांनी लोककलाकरांना प्रवृत्त केले त्यामुळे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरही दंडार या लोककलांना सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले. म्हणूनच बोरकर सरांना लोककलांचे संशोधक, महर्षी, गुरू या सन्मानाच्या पदव्या मिळाल्या. ग्रामीण स्तरावर जे लोककलांचे उपेक्षित सादरीकरण करणारे लोककलावंत असतात. त्यांना सन्मानाचे स्थान मिळावे याकरिता बोरकर सर अखंड झटत आहेत. शासनदरबारी त्यांच्या जीवनाचा, स्थितीचा, त्यांच्या उदरनिर्वाहाचा पाढा वाचत राहिले. त्यामुळे शासनाचे एक ठराविक मानधन या लोककलावंताच्या पदरी पडले. हेही बोरकर सरांचे कार्य उल्लेखनीय आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूपैकी त्यांच्यातील लेखक मला महत्वाचा वाटतो. आबालवृद्धांकरिता साहित्य निर्मितीकरिता प्रवृत्त करणे हा सरांचा एक महत्वाचा पैलू आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत ज्ञानाची दारे मोकळी करणे व साहित्याच्या माध्यमातून ते ज्ञानवंत होणे या एका उद्देशातून बोरकर सरांनी प्रचंड ग्रंथनिर्मिती केली आहे. त्यांच्यातील हा लेखक सदैव जिवंत आहे. ‘ज्ञानमहर्षी’ ही उपाधी त्यांना चपखलपणेकल्पकता आणि संमेलनाचे नियोजन या लक्षात ठेवण्यासारख्या बाबी आहेत. एखाद्या बोलीचे सातत्यपूर्ण संमेलने होणे ही कदापिही साधी बाब नाही. हे आयोजनाचे काम बोरकर सरांच्या दूरदृष्टिकोणाचे फलित आहे. नवनवीन लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्याचे सरांचे कार्यही लक्षणीय आहे. माणसात दडलेला कवी, लेखक यांना उजागर करण्याचे काम तसे अवघडच आहे पण बोररकर सरांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून झाडीबोलीची नाममुद्रा प्रतिष्ठित केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील बोलीचे एक व्यासपीठ असावे या उद्देशाने मराठी बोलीचे मंडळ स्थापन करून समग्र बोलींना सन्मान प्राप्त करून देणे, त्यांचे शब्दकोश व व्याकरण स्वतंत्रपणे तयार करणे हा उद्देश या स्थापनेमागील आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध बोलींच्या अभ्यासकांच्या भेटी घेण्याचे काम आपल्या सहकाऱ्यांसोबत बोरकर सरांनी केले. त्यांनी मराठी बोलीच्या अनेक संमेलनाचे आयोजन केले. महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास होण्याकरता हरिश्चंद्र बोरकर सरांची पाऊले लाख मोलाची ठरली आहेत.
आद्यकवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ ग्रंथ आंभोरा येथे निर्माण केला. हे स्थानमहात्म्य व ही मुकुंदराजांची कवित्वनिर्मिती लोकांच्या सदैव स्मरणात राहावी याकरिता बोरकर सरांनी मुकुंदराज गौरव सोहळ्याची योजना आखून तिला प्रत्यक्ष वाङ्मयीन रूप देण्याचे व मुकुंदराजाच्या संतत्वाला व कवित्वाला जनसामान्यांपर्यंत आणण्याचेही काम बोरकर सरांनी केले. हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील महत्वपूर्ण भाग आहे.
कुशल आयोजक, कुशल संघटक याही भूमिकेतून बोरकर सरांच्याकडे पाहिले पाहिजे. झाडीपट्टीचा भाग, त्यातील लोककला, त्यांची बोलीभाषा या जवळून बघायला हव्यात त्यामुळे त्यांच्या भेटीला आपण जावे आणि ते केवळ एकट्याने नव्हे, तर इतर अभ्यासकांनाही आपल्या सोबत घेऊन जावे आणि या ग्रामीण भागाचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवावे याकरिता बोरकर सरांनी वैनगंगा लोकयात्रेचे आयोजन केले. समाजाप्रती कृतज्ञता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. मुंबईला दादरच्या शिवाजी मंदिरात त्यांच्यागौरवसोहळ्यात उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी तिथल्या विद्वान लोकांनी बोरकर सरांच्या महान कार्याची दखल घेऊन त्यांना आपल्या सन्मानाच्या आणि विद्वतेच्या पंक्तीत बसविण्याचे कार्य केले. लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आदरणीय डॉ. प्रभाकर भांडे यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांच्यावरती स्तुतीसुमने उध ळिली आहेत. तेव्हा समूहयात्रेतील आम्ही सारे यात्रेकरू तेथे उपस्थित होतो. हे नमूद करतांना मला या व्यक्तिमत्वाबद्दल सार्थ अभिमान वाटतो.
व्यक्तितील साहित्यिक वृत्ती, काव्यवृत्ती ओळखण्याची किमया बोरकर सरांना साधलेली आहे. महागाव/सिरोली येथील झाडीबोली साहित्य संमेलनाला आलेल्या सौ. अंजनाबाई खुणे यांना त्यांनी व्यासपीठ दिले आणि बाईंनी आपल्या कवित्वाचा गजर सर्व महाराष्ट्रात केला. काव्यनिर्मितीला शिक्षणाची अट शिथील होते. प्रतिभेची गरज असते, हे त्यांनी लक्षात आणून दिले. ‘झाडीपट्टीची बहिणाबाई’ असा सार्थ गौरव अंजनाबाईंचा होत आहे. ही शोधकवृत्ती, लाखमोलाची माणसे शोधून त्यांची काव्यप्रतिमा जागृत करण्याची किमया डॉ. हरिश्चंद्र बोरकरांनी केली आहे. आज त्यांच्या सोबतीला हिरामण लांजे, राजन जायस्वाल, ना. गो. थुटे, बंडोपंत बोढेकर मिलिंद रंगारी ही मान्यवर मंडळी आहेत. आणखी नवनवीन व्यक्ती येतील, जुळतील आणि झाडीबोलीचे उन्नतावस्थेचे कार्य असेच सुरू राहील यात शंका नाही. ही आपली बोली प्रमाणभाषेला शब्दसंपती पुरवित राहील व प्रमाण भाषेला अधिक बळकटी येईल. लोककला या समाजमानसात जिवंत राहतील यांचे श्रेय डॉ. हरिश्चंद्र बोरकर सरांनाच आहे. त्यांच्या महान कार्यात आम्हाला सहभागी होता आले हे आम्ही आमचे अहोभाग्य समजतो. त्यांच्य हातून अशीच साहित्यसेवा, लोकसेवा त्यांच्याकडून घडत राहो ही प्रभूचरणी प्रार्थना.
प्रा. डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे
संत साहित्याचे अभ्यासक, भंडारा
संपर्क क्र. ९६६५६९२३५५