नागरिकांचा सर्वांगीण विकासासाठी योजनांचे सुसूत्रीकरण करावे- राज्यमंत्री आशिष जयस्वाल

मुंबई, दि. १८  : नागरिकांच्या एकात्मिक विकासासाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात, ज्यांचा उद्देश समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधणे आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे नियमित मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण आवश्यक आहे, असे वित्त व नियोजन मंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

मंत्रालयात विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करून त्यांचे सुसूत्रीकरण करणे तसेच साधनसंपत्तीच्या स्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याकरिता उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत उच्च स्तरीय समितीची बैठक झाली. त्यावेळी राज्यमंत्री श्री. जयस्वाल बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव आनंद भोंडवे, शिक्षण व नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, ग्रामविकास, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य तसेच महिला व बाल विकास विभाग व इतर योजना राबविताना त्यांचे मूल्यमापन करून प्राधान्यक्रम ठरवून त्याचे सुसूत्रीकरण करावे. प्राथमिकतेच्या क्रमाने योजनांचे सुसूत्रीकरण केल्याने संसाधनांचा योग्य वापर होतो आणि अपेक्षित परिणाम मिळतात, असेही त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की, अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करून योजना राबवण्याचा क्रम ठरवावा . सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधून योजनांची अंमलबजावणी करावी. योजनेच्या लाभाचे स्वरूप तपासून छाननी  करावी, जेणेकरून काही योजना एकत्र करुन राबविल्यास सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळू शकते, असेही राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी सांगितले.

000000

मोहिनी राणे/विसंअ