बेलारुससोबत परस्पर सहकार्य वाढीसाठी पुढाकार- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १८ : रिपब्लिक ऑफ बेलारुस सोबत सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढीसाठी राजशिष्टाचार विभागामार्फत पुढाकार घेण्यात येऊन सामंजस्य करार करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील कृषी उत्पादन, प्रक्रिया उद्योग यामध्ये बेलारुसच्या उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

बेलारुसचे महावाणिज्यदूत अलेक्झांडर मात्सुकोऊ यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि बेलारुसमधील परस्पर संबंध वृद्धीबाबत चर्चा करण्यात आली. वाणिज्यदूत कान्स्टान्सिन पिंचुक यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल म्हणाले, मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे. महाराष्ट्रात उत्तम समुद्र किनाऱ्यांसह विविध प्रकारची पर्यटनस्थळे आहेत. राज्यात मुबलक कृषी उत्पादन होत असून उत्तम दर्जा आणि वाजवी किंमत यामुळे आंबा, डाळींब, केळी आदी फळे, भाजीपाला विविध देशात निर्यात केला जातो. बेलारुसच्या उद्योजकांनी राज्यातील शेतीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, त्यांना निर्यातक्षम कृषीमाल उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील सहकार्य करण्यात येईल असे सांगून द्विपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून परस्पर सहकार्याच्या क्षेत्रांची निश्चिती करुन देवाण-घेवाण वाढीवर भर देता येईल, असे त्यांनी नमूद केले.

श्री.मात्सुकोऊ यांनी श्री.रावल यांच्यासमवेत आश्वासक चर्चा झाल्याचे यावेळी सांगितले. बेलारुस मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ तर महाराष्ट्रात नोव्हेंबर ते मार्च हा काळ पर्यटनासाठी उत्कृष्ट असल्याने परस्पर पर्यटनवृद्धीसाठी वर्षभर संधी असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील सिनेसृष्टी जगप्रसिद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ