मध्यप्रांत-वऱ्हाडात अमरावती लगतच्या यावली गावात जन्मलेल्या व पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (1909-1968) या नावाने प्रसिद्धीस आलेल्या सत्पुरुषाच्या व्यक्तिमत्वात संत, तत्त्वज्ञ व कलावंत असा त्रिवेणी गुणसंगम झालेला होता. वऱ्हाडातील प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आणि लोकसंत गाडगेबाबा या दोन महात्म्यांच्या प्रज्ञा-प्रतिभा तथा जनाभिमुख प्रवृत्तीचा सहज समन्वय राष्ट्रसंतांच्या व्यक्तित्वात झाला असल्याचे त्यांच्या हिंदी, मराठीतील वाङ्मयनिर्मितीवरून लक्षात येते. तसा वयाच्या 8 व्या- 9 व्या वर्षापासूनच त्यांच्या कवित्वाचा आरंभ दिसून येत असला तरी, प्रारंभकाळातील त्यांच्या बहुसंख्य पदरचना या भक्तिगीत वा ‘ईश्वरास आळवणी’ या स्वरूपाच्या असत. मात्र, पुढे वयाच्या वीशी-पंचवीशीनंतर थेट अखेरपर्यंत व्यापक जनतेच्या उपस्थितीत त्यांनी जी वाङ्मयनिर्मिती केली तिचे स्वरूप, आशय व बांधणी दोन्ही बाबतींत वैविध्यपूर्ण आहे. संख्येत तर ती विपुल आहेच ; शिवाय गुणवत्तेतही ती आगळी वेगळी आहे. जनजीवननिष्ठ व प्रासादिक अशी ही निर्मिती मध्ययुगीन संतांच्या काव्यनिर्मितीशी नाते सांगणारी व तरीही आधुनिक काळातील समस्यांशी भिडणारी अशी आहे. त्यामुळे 20 व्या शतकाच्या प्रथमार्धात हिंदी व मराठी साहित्यप्रांतांत रूढ असलेल्या पंडिती कला-निकषांच्या चाकोरीत बसणारी ती नाही. असे असले तरी समकालीन विद्वानांना देखील त्यांच्या ‘या झोपडीत माझ्या-‘, ‘माणूस द्या मज माणुस द्या’, ‘मंदिरात नाही दिसला’, ‘उठा हो दिवस निघाला नवा’, ‘सब के लिए खुला है-‘, ‘बना रहे दरबार’ अशा कितीतरी रचनांनी वेड लावले होते !
हजारोंच्या संख्येतील अशिक्षित / अर्धशिक्षित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी ग्रामीण जनतेसमक्ष राष्ट्रसंत तुकडोजींनी भजन-भाषणांच्या स्वरूपात वाङमयसेवा प्रत्यक्ष सादर केली. त्यांच्या एकेका भजनाच्या कार्यक्रमात परिसरातल्या वीस-पंचवीस खेड्यापाड्यांतील लोक आवर्जून हजर राहात, आणि एक उच्च व आगळा वाङमयानंद तासन्तास अनुभवून परतताना संस्कारांची शिदोरी आपापल्या गावी सोबत घेऊन जात. अशा जनसंपर्क दौऱ्यांच्या सततच्या धावपळीतच राष्ट्रसंतांची सर्व ग्रंथसंपदा आकारास आली आहे.
राष्ट्रसंतांची ग्रंथनिर्मिती –
राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराजांचे मराठी भाषेतील आजतागायत 19 पद्यसंग्रह (भजनावली, अभंगावली इ.) व 9 गद्यसंग्रह प्रसिद्ध असून हिंदी भाषेतील 18 पद्य संग्रह (भजनावली, बरखासंग्रह) व 5 गद्यग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. या व्यतिरिक्त ‘श्रीगुरुदेव’ (मासिक) व ‘सेवक’ तथा ‘सुराज्य’ आदी नियतकालिकांमधून त्या-त्या काळी प्रसिद्ध झालेले वाङमय अद्याप असंग्रहीत स्वरूपातच उपलब्ध आहे. राष्ट्रसंतांच्या एकूण वाड्मयसंभारात विविध आकृतिबंधांमधील हिंदी मराठी काव्यरचना जशा समाविष्ट आहेत तसेच गद्यातील विविध वैचारिक बंधही समाविष्ट आहेत. पद्यरचनांमध्ये-अक्षरगणवृत्त / मात्रावृत्त यांमधील पदरचना (भजने), भावकाव्ये, नाट्यकाव्ये आहेत. तसे अभंग, ओव्या, श्लोक (चतुष्पदी) याबरोबरच गजल, रुबाई, पोवाडे व छंदयुक्त कबित्तही समाविष्ट आहे. उद्देशिका, अन्योक्ती, आध्यात्मिक कूटे जशी त्यात आहेत, तशी स्फुट कणिका, सद्विचारप्रवाह (सुभाषितप्राय) देखील समाविष्ट आहेत.
राष्ट्रसंतांच्या ललित वाङ्मयात प्रकट चिंतन, प्रवासवर्णन, कथाभास (दृष्टान्त) इतकेच नव्हे तर कथाबंधही आहेत. राष्ट्रसंतांच्या एकंदर जीवन शैलीस साजेशा अशा या ललित बंधांसोबतच वैचारिक लेख, निबंध, व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, पत्रे, शंकासमाधान, आध्यात्मिक निरूपणे त्याचप्रमाणे ‘ग्रामगीता’ सारखी ओवीबद्ध प्रबंधरचना सुद्धा आहे.
ईश्वराशी धागा जोडू पाहणाऱ्या व कोंडलेल्या निराधार विपरीत मनःस्थितीत ईश्वराचा धावा करू पाहाणाऱ्या, आर्त भक्तीपर पदरचनापासून विकसित होत त्यांच्या अंतरात्म्यातील भक्ताने निसर्गाविषयी अकृत्रिम ओढ व्यक्त करणाऱ्या रचना परिसरातील विपरित समाजस्थितीचे दर्शन घडविणाऱ्या रचना अखंडितपणे जनांसमक्ष सादर केल्या आहेत. व्यक्ती, कुटुंब, समूह, गाव, राष्ट्र आणि विश्व यांच्या संदर्भातील आदर्शाचे त्याद्वारे त्यांनी प्रबोधन केले आहे. त्यामुळे स्थूल मानाने पाहू जाता, देवभक्तीवर रचना, देशभक्तीवर रचना, समाजास्थितीत परिवर्तन आणू पाहणाऱ्या आदर्शलक्ष्यी रचना, निसर्ग व पर्यावरणलक्ष्यी भावपूर्ण रचना आणि विश्वमानवतेच्या कक्षेतून स्त्रवणाऱ्या वैश्विक, कालातीत (संत साहित्यपर) रचना असा एकंदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाड्मयाचा व्यापक आवाका दिसून येतो.
प्रस्तुत अभ्यासात आपणास राष्ट्रसंतांच्या वाङ्मयाचे प्रबोधनमूल्य जाणून घ्यावयाचे आहे. त्याकरिता एक आधुनिक जनजीवनदृष्टीचा धर्मनायक म्हणून राष्ट्रसंतांची भूमिका तटस्थपणे समजून घेणे ज्याप्रमाणे आवश्यक ठरते, त्याचप्रमाणे आधुनिक राष्ट्रीय चेतनेचा प्रवर्तक म्हणूनही त्यांची भूमिका समजून घेणे आवश्यक ठरते.
‘मानवी जीवनाचा उत्क्रांतिमार्ग’ (श्री.गुरुदेव जून 1944, पृ.5-8) या लेखात राष्ट्रसंतांनी मनुष्यत्व, साधुत्व आणि देवत्व हे मानवी जीवनाच्या उत्क्रांतिमार्गाने कसे प्राप्त करता येईल याचे विवेचन केले आहे. मानवी मनाच्या मार्गाने पूर्णत्वाकडे जाण्याचा, उत्क्रांति करून घेण्याचा एकमेव महामंत्र सदा सावधानता (विवेक) व कार्यतत्परता हाच आहे. व्यक्तित्व आणि समाष्टित्व हे त्याच्या कार्याचे दोन भाग पडत असून या पद्धतीने मार्गक्रमण करीत असता, त्यामध्ये राष्ट्रसेवा, देशसेवा, धर्मसेवा सहजासहजीच घडून येतात. प्रत्येक मानवाची उन्नती हीच राष्ट्राची उन्नती व हाच विश्वाचा उद्धार आहे. प्रत्येक माणूस मनुष्यत्वाच्या नात्याने एक झाला की त्यांनाच प्रगल्भ राष्ट्रत्व प्राप्त होते आणि अशा सर्व राष्ट्रांचा ओघ सत्यमार्गाने चालावयास लागला की नवे जग किंवा नवयुग (सत्ययुग) निर्माण होते. ‘माझे करणे माझ्याकरिता नाही; ते राष्ट्राकरिताच आहे’ असे समजून कार्यास सुरुवात झाली की प्रत्येक उन्नत व्यक्ती मिळून एक स्वर्गतुल्य राष्ट्र निर्माण होईल. अशाप्रकारे प्रत्येक मनुष्य स्वतःबरोबर समाजास उन्नत करीत पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करील तर त्यातच सृष्टीचा, धर्माचा, देशाचा व मनुष्यत्वाचा उद्धार आहे, अशी राष्ट्रसंतांची भूमिका आहे.
‘व्यक्तिधर्मापेक्षा राष्ट्रधर्म श्रेष्ठ’ (सुराज्य साप्ताहिक, नागपूर, दि.30-08-1947) या लेखात राष्ट्रसंतांनी स्पष्ट केले आहे की, देवभक्ती हा तुमचा व्यक्तिधर्म असून देशभक्ती हा राष्ट्रधर्म आहे. धार्मिकतेबद्दलची त्यांची कल्पना रूढ कल्पनेपेक्षा वेगळी असून त्यांनी धार्मिकतेचा विशिष्ट क्रम सांगितला आहे: व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म, समाजधर्म, ग्रामधर्म व राष्ट्रधर्म, लेखाअखेरीस धार्मिकतेसंदर्भात ते लिहितात- “निरनिराळी देवस्थाने व नानाविध संप्रदायांची कल्पनाच मला पूर्णपणे मिटवून टाकायची असून तिथे मानवतेची कल्पना प्रस्थापित करावयाची आहे. आणि जगाला असे शिकवायचे आहे की माणूस ही आमची जात आहे; माणुसकी हा आमचा धर्म आहे; अन्याय-अत्याचाराचा प्रतिकार करून अखिल जगतात सुख-शांती निर्माण करणे हे आमचे कर्तव्यकर्म आहे…”
‘राष्ट्रधर्माची प्राणप्रतिष्ठा’ (श्रीगुरुदेव, ऑक्टोबर 1947, पृ.4-6) या लेखात राष्ट्रसंतांनी कुटुंबाच्या कल्पनेवरून संपूर्ण राष्ट्राची कल्पना स्पष्ट केली आहे. कुटुंबाच्या वा घराच्या संदर्भात बाहेरच्या आक्रमकांविरुद्ध संरक्षण, देणेघेणे व्यापार-व्यवहार, स्वच्छता-आरोग्य, शिक्षण इत्यादी या राष्ट्राशी समांतर असणाऱ्या विकासासंबंधीच्या बाबींवर भर दिला आहे. पुढे ते म्हणतात “गाव हे सुद्धा एक कुटुंब आहे.” गाव हे एखाद्या आदर्श कुटुंबाप्रमाणे नांदणे कसे शक्य आहे; आणि अशा गावांचे बनलेले प्रांत तसेच देशांचेही समष्टिजीवन सक्षम पद्धतीने चालविणे कसे संभवनीय आहे, याचेच येथे विवेचन केले आहे. यापुढील भागात ते लिहितात- दुसऱ्या देशाची गुंडगिरी व वरचष्मा स्वदेशात चालू देऊ नये तसेच अंतर्गत व्यवस्थेतही एक सूत्रीपणा राखला जावा. विश्व हे एका कुटुंबाप्रमाणे स्वर्गतुल्य सुखात ठेवण्याची जबाबदारी नेते, सत्ताधीश, पुढारी यांची प्रामुख्याने असली तरी, त्यांनी मदतीची हाक दिल्यास मनाने, धनाने, वाणीने, शरीराने व पुत्रबलाने सहाय्य करणे हे प्रत्येक कुटुंबियाचे कर्तव्य असते. या योजनेनुसार व्यवहार करण्याला ते ‘राष्ट्रधर्म’ म्हणतात. लेखाच्या अखेरीस राष्ट्र आणि धर्म यांदरम्यानच्या सूत्राचे सार व्यक्त करताना राष्ट्रसंत म्हणतात- “मित्रांनो ! तुम्हाला ज्या कप्प्यात वा चौकटीत बसावयाचे असेल तद्नुसार कार्य करून दाखवा आणि आपला कुटुंबधर्म, गावधर्म (समाजधर्म) व राष्ट्रधर्म सिद्ध करा, हाच खरा धर्माचा संदेश आहे… माझी भारतीय जनता राष्ट्रनिष्ठ बनो हेच ईश्वरचरणी मागणे आहे!”
‘राष्ट्रोद्धारक सेवाधर्म’ (श्रीगुरुदेव, डिसेंबर 1947) या लेखात राष्ट्रसंत लिहितात- ‘सेवाभावात जगाचे खरे जीवन आहे आणि स्वार्थबुद्धीत त्याचा सर्वस्वी नाश आहे. ‘मनुष्यमात्राची सेवा करणे व आपल्या उद्दिष्टांचे ज्ञान लोकांना देणे; मित्रांना आणि शत्रूंनाही माणुसकी शिकविणे आणि स्वतः आचरून दाखवून तो जिवंत पाठ दुसऱ्यांपुढे ठेवणे हे सेवकाचे कार्य असते. सेवकाची जात सेवा, त्याचा पंथ सत्यता व त्याचा धर्म मानवता ! जिव्हाळ्याची सेवावृत्तीच राष्ट्राला नवजीवन देत असते; तर गुलामी वृत्तीचे भाडोत्री लोक प्रसंगी आपल्या सहित देशाचा नाश करीत असतात. मानवतेच्या या सेवाधर्माला राष्ट्रसंत ‘सतीचे वाण’ संबोधतात; आणि ‘सेवक व्हा!’ हाच आज भारतमातेचा आदेश आणि निसर्गाचा संदेश आहे, अशी तरुणांना ग्वाही देतात. याच लेखात ते लिहितात, अशी सेवा करण्याची दृष्टी भारतातील सर्व सेवकांना नवतरुणांना प्राप्त झाली तर रामराज्य, सुराज्य, सत्ययुग इत्यादी शब्द मूर्तरूप घेऊन भारतवर्षाचे नंदनवन नव्या नवलाईने फुलवतील; मात्र ते जर आपल्या हजारो मतभेदांच्या, तर्ककुतर्कांच्या चक्रव्यूहात धडपडतच वेळ गमावतील तर सर्वांना पश्चाताप करण्याची पाळी खात्रीने येईल.
‘जिवंत राष्ट्रधर्म’ (युगप्रभात, पृ.10) या शीर्षकाच्या लेखात राष्ट्रसंतांनी अपेक्षा व्यक्त केली आहे- ‘भारत देशाचा धर्म एकच असावा; त्याचा बाणा एकच असावा; त्याची भाषा व त्याची प्रार्थनाही एकच असावी आणि त्याची सर्व संपत्तीही सर्वांची असावी. मानवधर्माचा प्रकाश जगावर पसरविणारा हा देश जगात पूज्य मानला जावा व तो आतूनही तितकाच उज्वल आणि बलवान असावा. मात्र, राष्ट्रधर्म जिवंत असेल तरच देश जागतिक जीवनसंघर्षात विजयी होईल. त्यासाठी सर्वप्रथम देशातील व्यक्ती-व्यक्तीच्या स्वभावातून द्वेष, मत्सर, गटबाजी, चोरी, लबाडी आदी दुर्गुणांचे उच्चाटन होणे व उत्तम विचारांचे शिक्षण मिळणे आवश्यक असते; आणि गावातील सार्वजनिक हिताचे जे जे कार्य असेल ते सगळे आपले आहे, असे कळकळीने समजून सहभाग देणेही आवश्यक असते. हे सर्व जाणून घेण्याचे अर्थात बौद्धिक उन्नतीचे सात्त्विक स्थान ‘सामुदायिक प्रार्थना’ हे आहे. धर्म व देश यांच्या सेवेचा मार्ग प्रशस्त करण्याचे माध्यम सामुदायिक प्रार्थना होय.
याच लेखाअखेरीस राष्ट्रसंत भारतीय तरुणांना संदेश देतात “भारतात आजचा हा आपत्काळाचा घनघोर अंधार नामशेष होऊन सत्ययुगाची प्रभात फुलावी अशी तुझी इच्छा आहे ना? तर मग तू जिवंत राष्ट्रधर्म आचरू लाग, हीच त्याची साधना आहे !”
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हिंदी व मराठी गद्य-पद्याचा भाग तथा स्फुट-ललित वाङ्मयातील प्रारंभकाळातील देवभक्तीचा भाग व तांत्रिक, आध्यात्मिक साधनेशी संबंधित गूढरचनांचा भाग वगळता त्यांचे बहुतांश वाड्मय हे इथवर विवेचन केलेल्या धर्मसोपानाचे प्रबोधन करण्याच्या हेतूने निर्माण झाले आहे. त्यांच्या एकूण वाङ्मयसंभाराचा मेरूमणी शोभेल अशा ‘ग्रामगीता’ (1955) या ग्रंथामध्ये राष्ट्रसंतांच्या तोवरच्या 36 वर्षांमधील वाङ्मयनिर्मितीचा परिपाक उतरला असून राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला मानवधर्माचा सोपान (1) व्यक्तिधर्म (2) कुटुंबधर्म (3) संघटनधर्म (4) समाजधर्म (5) राष्ट्रधर्म आणि (6) विश्वधर्म या अनुरोधाने विवेचिला गेला आहे :
तसेच-
विश्व ओळखावे आपणावरून। आपणचि विश्वघटक जाण।
व्यक्तिपासून कुटुंबनिर्माण। कुटुंबापुढे समाज आपुला ।।45।। (अ.1)
समाजापुढे ग्राम आहे। ग्रामापुढे देश राहे।
देश मिळोनि ब्रह्माण्ड होय। गतीगतीने जवळ ते ।।46।। (अ.1)
या शब्दांत या विविध पायऱ्यांमागील सूत्र स्पष्ट केले आहे. या मांडणीप्रमाणे-
व्यक्तिधर्म, कुटुंबधर्म। समाजधर्म, गांवधर्म।
बळकट होई राष्ट्रधर्म। प्रगतिपथाचा ।।16।। (अ.2)
व्यक्ति व्हावी कुटुंबपूरक। कुटुंब व्हावे समाजपोषक ।
तैसेचि ग्राम व्हावे राष्ट्रसहाय्यक। राष्ट्र विश्वा शांतिदायी ।।17।।
याकरिता जी जी रचना। तियेसि धर्म म्हणति जाणा।
देशद्रोह अधार्मिकपणा। एकाच अर्थी ।।18।। (अ.2)
मात्र ‘ग्रामगीता’ ग्रंथाच्या पहिल्याच अध्यायात ग्रामगीतेचे निर्मितिकारण स्पष्ट करताना त्यांनी जो दृष्टान्त वर्णिला आहे, त्यानुसार ‘कासया करावी। विश्वाची मात? प्रथम ग्रामगीताचि हातात। घ्यावी म्हणे।।’ या निष्कर्षावर राष्ट्रसंत स्थिरावलेले दिसतात. याच भूमिकेतून ‘गाव हा विश्वाचा नकाशा’ म्हणून राष्ट्र आणि विश्वाच्या सुबत्तेची / सुव्यवस्थेची परीक्षा ग्रामाच्या व्यवस्थेवरून करण्याचा त्यांचा विचार यापुढील विवेचनात दिसून येतो; त्यामुळे व्यक्तिधर्म ते ग्रामधर्म एवढाच धर्मसोपान येथे राष्ट्रसंत देतात :
विश्वाचा घटक देश। गाव हाचि देशाचा अंश।
गावाचा मूळ पाया माणूस। त्यासि करावे धार्मिक ॥22।।
व्यक्तिधर्म सर्वां कळावा। कुटुंबधर्म आचरणी यावा।
ग्रामधर्म अंगी बाणावा। राष्ट्रधर्माच्या धारणेने ॥23 (अ.2)
या अनुरोधाने राष्ट्रसंतांनी व्यक्तिधर्म अत्यंत संक्षेपाने विवेचिलेला दिसतो. राष्ट्रसंत म्हणतात,
‘प्रथम पाया मानव-वर्तन। यास करावे उत्तम जतन ।।48।।’ (अ.1)
‘मुख्य धर्माचे लक्षण। त्याग अहिंसा सत्य पूर्ण।
अपरिग्रह ब्रह्मचर्य जाण। तारतम्ययुक्त ।।19।। (अ.2)
‘निर्भयता शरीरश्रम। परस्परांशी अभेद प्रेम।
पूरक व्हावया विद्या-सत्कर्म। सकालांसाठी ।।20।।’ (अ.2)
अर्थात् व्यक्ती-व्यक्ती धार्मिक व्हावी म्हणजे एकांगी / लहरी बनावी असे नव्हे; तर तिचा भौतिक आणि पारमार्थिक विकास व्हावा. याचाच अर्थ शरीर-मन-वाणी-इंद्रिये-बुद्धी-प्राण या सर्वांच्या विकासाची साधना म्हणजे (व्यक्ति) धर्म होय. आणि या सद्धर्माचे ज्ञान रुजविण्यासाठीच पूर्वसूरींनी आश्रम-व्यवस्थेची योजना केली असल्याचे राष्ट्रसंत विवेचितात. (24-27, अ.2)
राष्ट्रसंतांच्या मते व्यक्तिधर्माचा पाया विद्यार्थीधर्म असून त्यासाठी ब्रह्मचर्याश्रमाची योजना आहे, गृहस्थाश्रम हा गृहस्थ/कुटुंबधर्माचा निदर्शक असून त्यात ऋषिऋण-देवऋण फेडण्यातून कुटुंबसेवा, जीवसेवा व ग्रामसेवा धर्मरूप होण्यासाठी संयम आणि त्यागबुद्धीचे महत्त्व राष्ट्रसंतांनी निरूपले आहे. तिसऱ्या ‘वानप्रस्थाश्रम’ हा समाज वा समूहाच्या कल्याणाचा धर्म असून चौथा ‘संन्यासाश्रम’ हा ग्रामधर्मास इष्ट गरिमा व आकार आणून देणारा ग्रामविकासाशी-पर्यायाने प्रांत तथा देशविकासाशी निगडित धर्म होय. अंततः तो विश्वधर्माशीच जोडून देण्याचे गृहीतक राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या सुरुवातीलाच उघड केले आहे.
ग्रामसेवाचि देशसेवा। देशसेवाचि ईश्वरसेवा।
हाचि अनुभवावया जीवभावा। वानप्रस्थ आश्रम ।।99।। (अ.3)
करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा। वानप्रस्थवृत्ति वाणवूनि जीवा ।
आणि मोक्षासाठी साधावा। संन्यासभाव ।।7।। (अ.4)
झाला वासनेचा नाश। त्यासीच नाम असे संन्यास ।
मग त्याचे सर्व करणे निर्विष। आदर्श लोकी ।।10।। (अ.4)
अशाप्रकारे ‘व्यक्तिधर्म’ ते ‘ग्रामधर्म’ या सोपानाचा सार सांगताना ग्रामगीतेत राष्ट्रसंतांची भूमिका ही गुणसंग्राहकतेची व कार्यतत्परतेची दिसते. ते म्हणतात-
सुखे करावा संसार। साधेल तैसा परोपकार।
चारही आश्रमांचा सार। आचरणी आणावा ।।36।। (अ.4)
आणि या आचरणात संयम, त्याग व विवेक यांबरोबरच सेवाभाव व सेवाधर्म यांस त्यांनी ग्रामधर्माचे सार व संघटनेचे सूत्र म्हणून अतिशय महत्त्व दिल्याचे पदोपदी ध्यानात येते.
डॉ. सुभाष सावरकर
‘जनसाहित्य’, शिल्पकला कॉलनी, शेगाव-रहाटगाव रोड, अमरावती
भ्रमणभाष-९८६०४५१०७५
(संकलन-विभागीय माहिती कार्या.अमरावती)