अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्लीत होत आहेत. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध ३१ साहित्य संमेलन अध्यक्षांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून मांडलेल्या भाषा विचारांचा चिकित्सक अभ्यास समाविष्ट असलेल्या ग्रंथाचा परिचय करून देत आहेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील महाराष्ट्रातील नव्या पिढीचे समीक्षक डॉ फुला बागूल..
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत’ अ.भा. मराठी साहित्य संमेलनांचे मोठे योगदान आहे. या संमेलनांनी ‘मराठीभाषा व साहित्य समृद्धी बरोबरच मराठी भाषकांचे ऐक्य निर्माण करून महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली १८७८ मध्ये पुणे येथे पहिले ग्रंथकार संमेलन संपन्न झाले. आज या संमेलनांनी शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. भारताची राजधानी असलेल्या दिल्ली येथे ९८ मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाले संपन्न होत आहे. आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात मराठी’ हा सन्मान प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन अधिक उत्साहात होत असल्याचे जाणवते.
या साहित्य संमेलनांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात ‘मराठीभाषासमृद्धी व स्वभाषासरंक्षण’ या जाणिवेतून महत्त्वाचे कार्य केले आहे. १८७८ ते १९४७ या कालखंडात ३१ साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांतून मराठीभाषेच्या जडण-घडणी संदर्भात भाषिक विचार मांडलेत. या विचारांचा चिकित्सक परामर्श संशोधनाच्या भूमिकेतून प्रा डॉ. प्रभाकर जोशी यांनी त्यांच्या ‘मराठी साहित्य संमेलन आणि भाषाविचार’ या ग्रंथात घेतला आहे. पुणे येथील स्नेहवर्धन प्रकाशन यांनी हा ग्रंथ अमळनेर येथे झालेल्या ९७ व्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष प्रा.डॉ. रविंद्र शोभणे व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित केला.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांचे राज्य होते. त्यांनी राज्यव्यवहार, शिक्षण क्षेत्रातील भाषिक व्यवहार इंग्रजीतून सक्तीने सुरु केला. मुंबई विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच होते. संस्कृत व मराठी भाषेचा, परिचय इंग्रजीतूनच होत होता. मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळाले होते. इंग्रजी मिश्रित मराठी सर्वत्र रूढ झाली. त्याच काळात विविध संमेलनाध्यक्षांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून भाषा रक्षणाचे व संवर्धनाचे विचार मांडले. या सर्वांनी मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाषिक विचार मांडलेत. या भाषिक विचारात मराठी प्रमाणभाषा, शुद्धलेखन, व्याकरणविचार, भाषाशुद्धीची चळवळ, प्राथमिक, माध्यमिक उच्च शिक्षणाचे माध्यम, मराठीभाषा, मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ, शासनव्यवहारात मराठीचा वापर, परिभाषेची आवश्यकता, लिपीसुधारणा, भाषावार प्रांत रचनेच्या मागणीतून मराठी भाषकांसाठी महाराष्ट्र प्रांतरचना, मराठीचे अभिजात भाषा म्हणून असलेले वैभव इत्यादी प्रश्नांच्या संदर्भातील विचार आपल्या अध्यक्षीय भाषणांतून विविध संमेलनाध्यक्षांनी जे थोर साहित्यिकही होते , त्यांनी मांडले आहेत. या लेखकांमध्ये ह. ना आपटे, माधवराव पटवर्धन, न. चिं. केळकर, श्री. कृ.कोल्हटकर, शि.म. परांजपे, वा.म.जोशी, सयाजीराव गायकवाड, भवानराव पंत प्रतिनिधी, श्री.व्यं.केतकर, वि. दा. सावरकर, द.वा. पोतदार, ना.सी.फडके, वि.स. खांडेकर, प्र.के.अत्रे, न र फाटक, ग.त्र्यं. माडखोलकर इत्यादी प्रसिद्ध साहित्यिकांचा समावेश आहे. त्या काळात महाराष्ट्र एकसंघ नव्हता . मराठी भाषकांना एकत्र आणून त्यांच्यात ‘भावनिक ऐक्य’ निर्माण करण्याचे कार्य या संमेलनाच्या माध्यमातून झालेल्या भाषिकमंथनाने केल्याचा निष्कर्ष प्रस्तुत ग्रंथातून अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेला आहे. अध्यक्षांच्या या भाषिक विचारांची फलश्रुती म्हणजे ‘मराठी भाषकांसाठी स्वतंत्र पुणे विद्यापीठाची स्थापना, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शिक्षणाचे माध्यम मराठी, शासनव्यवहारात मराठी होय. १८७८ ते १९४७ या ७० वर्षाच्या कालखंडात ३१ संमेलनाध्यक्षांनी मराठी भाषिक प्रश्नांच्या संदर्भात केलेल्या विचारमंथनाचे साधार विवेचन या ग्रंथात लेखकाने केले आहे. स्वातंत्र्यपूर्वकालीन भाषिक प्रश्नांची शास्त्रशुद्ध मांडणी प्रस्तूत ग्रंथात असल्यामुळे तत्कालीन भाषिक जडणघडणीच्या अभ्यासासाठी प्रस्तुत ग्रंथ मार्गदर्शक ठरतो.
मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार(१८७८ ते १९४७) प्रा .डॉ प्रभाकर ज. जोशी, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
पुस्तक परिचय
प्रा.डॉ.फुला बागुल, साहित्य समिक्षक, शिरपूर, धुळे
मो 982 2934874 /9420605208
0000