नागपूर, दि. १९ : हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची महती लहान थोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून यासाठी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ हा उत्तम उपक्रम असल्याचे प्रतिपादन महसूल तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवजन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. पदयात्रेस मंत्री बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती.
सक्करदरा येथे राजे रघुजी भोसले यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन पदयात्रेस प्रारंभ झाला. तर महाल येथील गांधी गेटस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले व पदयात्रेची सांगता झाली.
मंत्री बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची महती देशभर पोहोचावी आणि विकसीत भारताची संकल्पना अधिक मजबूत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ उपक्रमाचे नियोजन केले असून आज देशभर हा उपक्रम साजरा होत आहे.
छत्रपती शिवाजीराजे हे उत्कृष्ट शासक, प्रशासक होते. जनतेच्या हिताचाच सदैव विचार मनात बाळगून कार्य करणाऱ्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा अंगीकृत करुन महाराष्ट्र आणखी प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास आहे.
महाराजांची वाघनखे महाराष्ट्र शासनाने लंडनहून परत आणली. ही ऐतिहासिक वाघनखे नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये सर्वांना पाहण्यासाठी खुली असून नागरिकांनी दर्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी स्वत: रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र मंत्री बावनकुळे यांना भेट देण्यात आले.
पदयात्रेस श्रीमंत राजे मुधोजी भोसले, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष देशमुख, माजी आमदार विकास कुंभारे, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आदिवासी विभाग अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलिस उपायुक्त महेक स्वामी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
मनपा जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व हंबीरराव मोहिते यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी आभार मानले.
शिवकालीन कलांचे नेत्रदिपक सादरीकरण
गांधीगेट येथील कार्यक्रमात अमोल खंते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेशभूषा साकारुन उपस्थिती दर्शविली होती. या पदयात्रेत ठिकठिकाणी चिमुकल्यांनी शिवकालीन कलांचे सादरीकरण केले. राजे रघुजी भोसले स्मारक सक्करदरा येथे संजूबा हायस्कूलचा विद्यार्थी अजित मोहिते शिवाजी महाराजांवरील उत्कृष्ट पोवाडा सादर केला. पदयात्रेला सुरुवात होण्यापूर्वी या ठिकाणी डॉ. संभाजी भोसले ग्रुप आणि शिवशक्ती आखाडा च्या विद्यार्थ्यांनी आखाडा प्रात्यक्षिके सादर केली. सी. बी. अँड बेरार चौक येथे जिम्नॅस्टिक असोसिएशन नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिकचे प्रात्यक्षिक सादर केले.
विविध शाळा, महाविद्यालयांचा सहभाग
पदयात्रेमध्ये मनपा अग्निशमन पथक, मनपा संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा, केशवनगर माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कमला नेहरू महाविद्यालयातील, डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी, मनोहरराव कामडी महाविद्यालय, गोविंदराव वंजारी महाविद्यालय, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री गजानन विद्यालय नवीन सुभेदार, बाबानानक सिंधी हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुरुषोत्तम थोटे समाजकार्य महाविद्यालय, शासकीय दाभा वसतीगृह या शाळेतील विद्यार्थ्यांसह मनपाचे हिवताप व हत्तीरोग विभागाच्या कर्मचारी, मनपा ज्येष्ठ नागरिक मंडळ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुमारे १५ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देखील पदयात्रेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी माँ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे अशा वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केली होती. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच महाल परिसरातील दादीबाई देशमुख मुलींची शाळा येथे रक्तदान शिबिराचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
०००