साल्हेर किल्ला पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

साल्हेर येथे शिवजयंतीनिमित्त अभिवादन   

नाशिक, दि. १९: (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व इतिहासात अधोरेखित आहे. हा किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

आज साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शेरमाळे, उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेढे, तालुका कृषी अधिकारी शांताराम भोये आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, शिवरायांचे विचार समाजासाठी आजही प्रेरक आहेत. त्यांची आदर्श विचारसरणी प्रत्येकाने आत्मसात करावी. साल्हेर किल्ला या ऐतिहासिक वास्तूचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी रोपवेचा प्रस्ताव तातडीने सादर करावा तसेच येथे हरणबारी व केळझर या धरणांवर बोटिंग विकसित करता येईल. गुजरातमधून येणारे व मांगीतुंगी येथे येणारे पर्यटक येथे भेट देतील. त्यामुळे साल्हेरच्या पर्यटन विकासाला व रोजगाराच्या संधीला चालना मिळेल. येत्या काळात साल्हेर येथे कृषी पर्यटनासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले

साल्हेरच्या विकासाच्या दृष्टीने आदिवासी संग्रहालय व शिवसृष्टीसाठी १५० कोटींचा आराखडा प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात ७५ कोटींची शासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामासाठी महसूल विभागाची ५० एकर जमीन संपादनासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे आमदार श्री. बोरसे यांनी सांगितले.

०००