जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेणार नाही – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

चंद्रपूर, दि. १९ : नैसर्गिक संपत्तीचे वरदान असलेला चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा, सिमेंट व इतर उद्योगांचे विस्तृत जाळे पसरले आहे. त्यातून लोकांना रोजगार निर्मिती होते. तसेच जल, जंगल, जमीन याचे रक्षण करून वनौपजावर आधारित उद्योगातून नागरिक आपला उदरनिर्वाह करीत असतात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सामान्य नागरिकांना त्रास होईल, किंवा शासन – प्रशासनाची बदनामी होईल, अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

नियोजन सभागृह येथे कोळसा खाण बाधित क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. उईके बोलत होते. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. या खाणींमधून कोळशाचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी गावकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला दिल्या. मात्र 15-20 वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. त्यांचे योग्यरित्या पुनर्वसन झाले नाही.  त्यातच कोळशाची अवैध वाहतूक, शासकीय आदेशाला न जुमानता अवैध उत्खनन, गावकऱ्यांसोबत दमदाटी करणे, कोणालाही विश्वासात न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, स्थानिकांचा नोकरीत समावेश न करणे, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी.

चंद्रपूर जिल्हा हा राज्याच्या टोकावर असून तेलंगणा राज्याची सीमा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी, गुटखा तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीला पोलीस प्रशासनाने त्वरित आळा घालावा. सोबतच दारूबंदी असलेले वर्धा आणि गडचिरोली हे जिल्हे चंद्रपूर जिल्ह्याला लागून असल्यामुळे अवैध दारू तस्करी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील दारू तस्कर, वाळू माफिया यांच्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावे.  अवैध धंदे करणाऱ्या कोणालाही प्रशासनाने पाठीशी घालू नये. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिला.

बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

०००