मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पाहणी

इंदू मिल येथे नियोजित पुतळा उभारला जाणार

नवी दिल्ली, दि. १९:  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ज्येष्ठ मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेस भेट देऊन मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५० फूट भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली.

यावेळी मूर्तिकार सुतार, त्यांचे पुत्र अनिल सुतार, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित होते. मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगतीचा आढावा घेऊन मूर्तिकार सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. आज राम सुतार यांचा १०० वा वाढदिवस असून मंत्री शिरसाट यांच्या उपस्थितीत तो साजरा झाल्याने आनंद द्विगुणीत झाल्याची भावना यावेळी सुतार कुटुंबियानी व्यक्त केल्या.

तत्पूर्वी महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही  पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख,  महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भावना मेश्राम उपस्थित होत्या.

०००